Monday, July 8, 2024
Homeनगरजिल्हांतर्गत की आंतर जिल्हापैकी कोण बाजी मारणार?

जिल्हांतर्गत की आंतर जिल्हापैकी कोण बाजी मारणार?

जिल्हा परिषद || जिल्ह्यातील गुरुजींच्या बदली प्रक्रियेकडे लागल्या नजरा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

आधी लोकसभा निवडणुकीच्या अचारसंहितेत आणि आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेकडे जिल्ह्यातील गुरूजींचे लक्ष लागले आहे. सध्या जिल्हा परिषदेत जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांच्या संघटना यांच्या बदली प्रक्रिया आणि नेमणुकांवर याविषयी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या रस्सीखेचमध्ये आपल्या सोयीचा निर्णय व्हावा, यासाठी अनेकांना ‘मोहाची भूरळ’ घालण्यात येत आहे. यामुळे आधी बदल्या की नेमणूक यात यशस्वी होऊन वरचढ ठरणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मागील महिन्यांत राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुधारित शासन निर्णय काढत शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, राज्यातील काही जिल्हा परिषदांनी या आदेशाला बाजूला ठेवत ऑफलाईन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली असून ग्रामविकास विभागाच्या आदेशात ऑनलाईन बदल्या यंदा की पुढील वर्षी कराव्यात याबाबत स्पष्टता नसल्याने काही ठिकाणी शिक्षकांच्या मागणीनुसार ऑफलाईन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. यामुळे नगर जिल्हा परिषदेत संभ्रम अवस्था असून यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार की आचारसंहितेपूर्वी आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांना नेमणुका मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

यंदा लोकसभा निवडणुकीमुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांसह प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. दुसरीकडे आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात मोठ्या संख्येने शिक्षक बदलून आलेले आहेत. त्यांना नेमणुका देणे बाकी आहे. अशा शिक्षकांची संख्या 160 असून त्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 28 शिक्षकांची भर पडलेली आहे. हे शिक्षक देखील आधी लोकसभा आणि त्यानंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकले आहेत. दुसरीकडे नगर जिल्ह्यात यंदा 3 हजार 800 शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केलेेले असून जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांपैकी जवळपास 35 ते 40 टक्के शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्याने प्रशासनाने तोंडात बोट घातले आहे. दरवर्षी साधारणपणे जिल्ह्यात 300 ते 500 पर्यंत शिक्षकांच्या बदल्या यापूर्वी झालेल्या आहेत. यामुळे आलेल्या 3 हजार 800 जागांपैकी किती शिक्षकांच्या बदल्या होणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

राज्यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर यासह अन्य पाच ते सात जिल्हा परिषदांनी ऑनलाईनऐवजी ऑफलाईन शिक्षकांच्या बदल्या केलेल्या असून नगर जिल्हा परिषदेला ऑफलाईनचे का वावडे आहे?, असा प्रश्न बदली पात्र शिक्षकांमधून विचारण्यात येत आहे. तसेच आंतर जिल्हा बदलीने आलेले शिक्षक देखील बदल्यांच्या आधी त्यांना नेमणुका मिळाव्यात यासाठी ‘सक्रिय’ झाले आहेत. यातून दोघांमध्ये सध्या मोहाची स्पर्धा दिसत आहे. यात आता कोण बाजी मारणार, आधी बदल्या आणि त्यानंतर आंतरजिल्ह्यावाल्यांना नेमणुका यापैकी आधी काय होणार यासाठी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभागाकडे याबाबत विचारणा केली असता, बदल्यांसाठी तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. बदली पात्र शिक्षकांची माहिती तयार असून धोरणात्मक निर्णय झाल्यावर बदल्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

अनेक नेत्यांचा उदय
आधी बदल्यांची प्रक्रिया व्हावी, तर दुसरीकडे आधी आंतरजिल्हा शिक्षकांना नेमणुका मिळाव्यात, यासाठी प्रत्येक शिक्षक संघटनेत नव्या दमाच्या नेत्यांचा उदय झाला आहे. हे नेते आपापल्या तालुक्यात, गटातील आंतरजिल्हा शिक्षकांना नेमणुका मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत. यातून जिल्ह्यात अनेक नव्या शिक्षक नेत्यांचा उदय झाल्याची चर्चा आहे. आधीच जिल्ह्यात शिक्षक नेत्यांची गर्दी असताना रात्रीतून नेते या गटातून त्या गटात उडी मारत असताना, आता बदली अथवा नेमणूक मिळवून देण्यासाठी तयार झालेल्या नेत्यांची दाळ कधी शिजणार?असा प्रश्न आहे.

शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया करण्यासाठी माहिती तयार करण्यात आलेली आहे. वरिष्ठांशी चर्चा करून त्यांच्या निर्णयानुसार प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यात आदिवासी भाग (पेसा) मधून बाहेर येणार आणि रिक्त होणार्‍या जागांचा विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे.

– राहुल शेळके उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग

- Advertisment -

ताज्या बातम्या