अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षकांची कामधेनू आणि राजकारणाचा केंद्रबिंदू असणार्या माध्यमिक शिक्षक सोसायटी व प्राथमिक शिक्षक बँकेमधील सत्तांतरणानंतर होणार्या सर्वसाधारण सभांकडे जिल्ह्यातील शिक्षकांसह सर्वाचे नजरा लागल्या आहेत. दरवर्षी शिक्षकांच्या राड्यामुळे गाजणार्या या सभा यंदा मुद्यावर होणार की या ठिकाणी गुद्द्यांची परंपरा कायम राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आज दुपारी 12 वाजता माध्यमिक शिक्षक सोसायटीची सर्वसाधारण सभा नगरमध्ये होणार असून शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा पुढील आठवड्याच्या शेवटी म्हणजेच रविवारी 20 जुलैला होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत प्रा. भाऊसाहेब कचरे यांची अनेक वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावत विद्यमान चेअरमन आप्पासाहेब शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी कचरे यांचा सुपडा साफ केला. या निवडणुकीनंतर माध्यमिक शिक्षकांमधील राजकीय वातावरण थंड होणार असे चित्र असतांना प्रा. कचरे यांनी सोसायटीच्या कारभारावर ताशेरे ओढत सत्ताधारी चेअरमन शिंदे यांच्या गटाला आव्हान दिले आहे. यामुळे माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या राजकारणात संघर्षाचा पुढील अध्याय पुन्हा सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
अशीच परिस्थिती शिक्षक बँकेत झाली असून सत्ताधारी गुरूमाऊली मंडळातील फुटीनंतर शिक्षक बँकेत गुरूमाऊलीचा दुसरा गट सत्तेत आला. त्यानंतर गेल्या वर्षी या ठिकाणी सदिच्छा मंडळ, गुरूकुल मंडळ आणि गुरूमाऊलीतील पहिल्या गटाने नळकत सुरूंग लावत सत्तांतर केले. त्यानंतर साधारण वर्षभर शिक्षक बँकेच्या राजकारणात धुसफूस सुरू होती. सत्ताधारी गटातील 14 संचालक एका बाजूला गेले होते. यातील काही संचालकांना मागील आषाढ महिन्यात (कंदूरीच्या कार्यक्रमात) आणि अन्य ठिकाणी चोपण्याच्या घटना कानावर आल्या होत्या. मात्र, त्यानंतर गुरूमाऊली मंडळाच्या दुसर्या गटातील नेत्यांना पुन्हा सर्व संचालकांना एकत्र आणण्यात यश आले.
या 14 संचालकांपैकी अद्याप चार संचालक नाराज असल्याची चर्चा असून शिक्षक बँकेच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या नूतन पदाधिकारी निवडीत गुरूमाऊलीच्या दुसर्या गटाने पुन्हा बँकेवर वर्चस्व मिळवले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत शिक्षक बँकेच्या राजकारण सत्ताधार्यांसह विरोधी गट शांत असल्याचे दिसत असून सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर झोपलेले विरोधक जागे होणार का? असा प्रश्न जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना पडला आहे. बँकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुमाऊली मंडळातील फुटीवर पडसाद उमटणार की ही सभा केवळ चर्चेवर भागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.
कचरेंच्या पुरोगामी मंडळाचा बहिष्कार
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाने शिफारस केलेल्या लाभांशामध्ये सर्वसाधारण सभा सर्वोच्च असली तरीही कायद्याने सभासदांना त्यामध्ये वाढ सुचविता येत नाही. संस्थेच्या सभासदांनी गेली महिनाभर सुचवूनही संचालक मंडळाने लाभांश वाढीची शिफारस सर्वसाधारण सभेत मांडलेली नाही. त्यामुळे सर्वसाधारण सभेत उपस्थित राहूनही लाभांश वाढवून मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाल्याने पुरोगामी मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांनी एकमताने आजच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलेले आहे. अपेक्षित नफा होऊन सुद्धा मागील संचालकांना दोष जाईल म्हणून मुद्दामहून उत्पन्नातून अवास्तव जास्तीच्या तरतुदी करून निव्वळ नफा कमी राहिल्याने लाभांश कमी देणे, कर्जाची मर्यादा न वाढविणे, कर्जाचा व्याजदर कमी न करणे, सेवानिवृत्तांसाठीच्या कृतज्ञता निधीची वर्गणी वाढवूनही यापुढे वाढ रोखविणे, निवडून आल्यानंतर लगेचच विना टेंडर खरेदी करणे, संचालक मंडळाची सभा संस्थेच्या सभागृहात न घेता मंगल कार्यालयात घेणे, तसेच निवडणुकीत दिलेल्या वचनाम्यावरून सभासदांचीच नव्हे, तर यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र झटणार्या त्यांच्याच कार्यकर्त्यांची दिशाभूल झाल्याची व फसलो गेल्याची भावना झाल्याने या सभेत त्यांचेच कार्यकर्ते त्यांना आक्रमकपणे जाब विचारणार आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त लाभांश देण्याची परंपरा असलेल्या या संस्थेत प्रथमच प्राथमिक शिक्षक बँकेपेक्षाही लाभांश कमी मिळाला आहे व याचीच चर्चा सर्वत्र दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यातच या सत्ताधार्यांकडून सभासदांचा पूर्ण भ्रमनिरास झालेला असून केवळ लाभांश कमी नव्हे तर भविष्यात कर्जावरील व्याजदर वाढीचेही संकेत मिळत आहेत. सत्ताधार्यांकडून होत असलेल्या मनमानी व आडमुठे धोरणामुळे सभेमध्ये गोंधळ झाल्यास त्याचा दोष पुरोगामी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर येऊ नये, म्हणून पुरोगामी मंडळाचे पदाधिकारी बहिष्कार टाकण्याचे पुरोगामी मंडळाचे अध्यक्ष उत्तमराव खुळे, काकासाहेब घुले (कार्याध्यक्ष), जाकीर सय्यद (सचिव), सुभाष चासकर (सहसचिव), वाल्मिक बोठे (खजिनदार), बाळासाहेब पिंपळे, सूर्यभान सुद्रिक, दशरथ कोपनर, कैलास साठे, दिलीप देवकर, कैलास राहणे, अशोक वारुळे, संतोष तावरे, भास्कर कानवडे, अनिल गायकर, संतोष तावरे, पारुनाथ ढोकळे यांनी केले आहे.
सोसायटीच्या सत्ताधार्यांमध्ये दुफळी ?
माध्यमिक शिक्षक सोसायटीत विद्यमान संचालक मंडळात एकमत नसल्याची चर्चा आहे. विरोधी कचरे यांच्याकडे त्यांच्या मंडळाची अद्यापही कायम आहेत. मात्र, सत्ताधारी गटातील काही संचालकांचा वेगच पवित्रा असून त्याचे पडसाद माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत उमटणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हाणामारीचे उगमस्थान
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण सभेत हाणामारी, राडा यांची परंपरा नगर जिल्ह्याने घालून दिलेली आहे. काही वर्षापूर्वी शिक्षक बँकेच्या सभेत सुरू झालेल्या या घटनांचे लोण राज्यभर परसले आणि सर्वसाधारण सभा आणि शिक्षकांचा राडा हे समिकरणच बनले होते. गेल्या काही वर्षात कमी अधिक- प्रमाणात नगरच्या शिक्षक नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रमाणिकपणे ही परंपरा जपलेली असून आज होणार्या आणि पुढील आठवड्यात होणार्या सर्वसाधारण सभेत काय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.




