अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यंदा शिक्षक सभासदांचा घटलेला लाभांश, अहवालात अनावश्यक करण्यात आलेल्या वेगवेगळ्या लाखोंच्या तरतुदी, बँकेने गेल्या महिन्यांत नियुक्त केलेले एमडी (व्यवस्थापक) यासह नव्याने प्रस्तावित केलेल्या भरतीवर शिक्षक बँकेच्या सभेत खडाजंगी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या वेळी सत्ताधारी विरोधकांच्या प्रश्नांना कसे तोंड देणार? दरवर्षीची गांधळलाची परंपरा यंदाही कायम राहणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. दरम्यान, सत्ताधारी गुरूमाऊलीमधील एका गटा विरोधात सर्व विरोधी मंडळांनी विरोधाचा सूर आवळला असून विरोधकांची ही धार कायम राहणार की सत्ताधारी विरोधकांना गळाला लावणार हे सभेनंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, आजच्या सभेसमोर येणार्या बँकेचा अहवाल हा गेल्या वेळच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्या कार्यकाळातील असून आताचे नूतन पदाधिकारी जुन्या पदाधिकार्यांचे नावाने गेल्या वर्षभरातील कारभाराची पावती फडत त्यांना अडचणीत आणणार की आपला अजेंडा सभे पुढे मांडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी मंडळाकडून सत्ताधार्यांवर करण्यात आलेल्या आरोपात डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत ठेवीवर रामेश्वर चोपडे चेअरमन असताना ठेवीवरचे व्याजदर 8.10 व 8.60 दिले. तर कर्ज वाटपाला बँकेत पैसे नव्हते, म्हणून जवळजवळ 295 कोटी ठेवी नूतणीनकृत, तसेच जमा केल्यामुळे बँकेला 2024-25 या आर्थिक वर्षात ठेवींवर व्याज 103.71 कोटी व कर्जातून मिळालेले व्याज 91.31 कोटी म्हणजे जवळजवळ 12 कोटी 40 लाख रुपये ज्यादा व्याज द्यावे लागले, म्हणून नफा कमी झाला, असे सांगण्यात आले.
तर हीच तूट अगोदरच्या वर्षात 3.10 लाख रुपये होती. माजी चेअरमन बाळासाहेब सरोदे, रमेश गोरे यांनी काटकसर करून तरतुदीपेक्षा 2 कोटी 31 लाख खर्च कमी करून इतर गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाल्यामुळे 7 कोटी रुपये नफा मिळवू शकलो व सभासदांना त्यांच्या कायम ठेवीवर 7 टक्क्यांनी व्याज देऊ शकलो. दुसरीकडे आज सभासदांचा लाभांश हा दोन टक्क्यांनी कमी झालेला असून सत्ताधार्यांनी गरज नसताना मार्चअखेर नंतर तरतुदींमध्ये 2 कोटी 50 लाख रुपये अतिरिक्त तरतूद टाकण्याचा निर्णय घेतला. यामध्ये धर्मदाय निधी सारख्या निधीमध्ये रक्कम खर्ची घालण्यात आली आहे. मात्र, जमाखर्चामध्ये खर्चाच्या सर्व तरतुदी करूनही नफ्यातून 2 कोटी 50 लाख रुपये कशासाठी काढले तर सर्व सभासदांना लाभांश कमी का केला याचे उत्तर सत्ताधार्यांनी द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासह यापूर्वी सत्ताधार्यांनी बँकेच्या कर्मचार्यांच्या भरतीची गरज नाही, असा सूर आवळा होता. मात्र, हीच मंडळ रिर्झव्ह बँकेचे नाव पुढे करून भरतीचा घाट घालत आहेत. यावरून बँकेत संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षक बँक ऑनलाईन करण्याबाबत वल्गना करणार्यांनी 10 महिन्यांपूर्वी घाईघाईने फक्त सॉफ्टवेअर खरेदीसाठी व त्यातून अतिरिक्त पैसा कमावण्यासाठी मोठा कार्यक्रम एका आलिशान हॉटेलमध्ये शिक्षक बँकेच्या खर्चातून घेऊन कसलीही तयारी न करता सॉफ्टवेअर खरेदी केले होते.
त्यासाठी आवश्यक असणारे संपूर्ण डाटा त्या खात्यांना स्विच अशा अनेक किचकट प्रक्रिया असतात. ज्या कंपनीचे सॉफ्टवेअर घेतले ते कोल्हापूर शिक्षक बँकेत ही आहे. त्यांना देखील ते सॉफ्टवेअर सुरू करण्यासाठी पूर्ण एक वर्ष लागले होते, ही वस्तुस्थिती असताना आपणच घेतलेले सॉफ्टवेअर हे कशा प्रकारचे आणि दर्जाचे आहे याचे आत्मचिंतन विद्यमान सध्याच्या सत्ताधार्यांनी करणे आवश्यक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यामुळे सत्ताधारी मंडळी विरोधकांच्या आरोपाला कशा प्रकारे उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.




