अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पवित्र पोर्टलवरून शिक्षकांना नियुक्त्या देताना बदलीपात्र शिक्षकांना बदलीची संधी द्यावी, असे आदेश ग्रामविकास विभागासह शिक्षण विभागानेही दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना विनंती बदलीची संधी देऊन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. यातील पात्र गुरूजींची शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ग्रामविकास विभागाने मे 2024 रोजी सर्व जिल्हा परिषदांना पुन्हा स्मरणपत्र देऊन 11 मार्चच्या पत्राची कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी बदल्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या बदल्यांसंदर्भात वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांकडून होत आहे.
मात्र, त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याआधी सध्या कार्यरत शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार बदलीची संधी द्यावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने मार्च 2024 रोजी काढले होते. शिक्षण विभागाच्या या आदेशाची अंमलबजावणी सर्व जिल्हा परिषदांनी करावी, असे आदेश त्यानंतर ग्रामविकास विभागाने 11 मार्च 2024 रोजी काढले. त्यानुसार अनेक जिल्ह्यात पवित्र पोर्टलनुसार भरती करण्याअगोदर शिक्षकांना बदलीची संधी देण्यात आली. काही जिल्ह्यात तर झालेली भरती प्रक्रिया रद्द करून बदलीला प्राधान्य देण्यात आले.
16 मार्चला लोकसभेची आचारसंहिता लागली. त्यामुळे बदल्यांचा विषय मागे पडला. दरम्यान ग्रामविकासच्या आदेशाने शिक्षण विभागाने बदल्यांच्या प्रक्रियेची तयारी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकार्यांना दिले. त्यानुसार तालुकास्तरावर बदलीपात्र शिक्षकांचे अर्ज जमा करून घेण्यात आले. आता लोकसभेची आचारसंहिता संपली आहे. मात्र, विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता सुरू झाली आहे. 1 जुलैपर्यंत ही आचारसंहिता आहे. त्यामुळेच त्यानंतर जिल्हा परिषदेने बदल्यांची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी रखडले
यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता यामुळे शिक्षकांसोबत जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केलेली असून शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता संपल्यावर शिक्षकांप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचार्यांची बदलीची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
या बदली प्रक्रियेबाबत काय कार्यवाही करायची, याबाबत जिल्हा परिषदेने ग्रामविकास मंत्रालयाकडे मार्गदर्शन मागविले आहे. मात्र, अद्याप त्यावर मार्गदर्शन आलेले नाही. त्यामुळे बदलीचा पेच निर्माण झाला आहे. हे मार्गदर्शन आल्यास जुलैमध्येही बदल्यांची प्रक्रिया होऊ शकते, असे जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांनी सांगितले.