अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 26 तारखेला मतदान होत आहे. हळूहळू या निवडणुकीत रंगत भरत असली तरी ही निवडणूक वेगळी आहे. या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार हे संगमनेर तालुक्यात असून त्या खालोखाल कोपरगाव आणि राहाता तालुक्यात आहेत. या तालुक्यातील शिक्षक मतदार हे नगर जिल्ह्यात निर्णायक ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात 20 मतदान केंद्रे आहेत. यात संगमनेर आणि नगर शहरात सर्वाधिक प्रत्येकी 3 केंद्रे असून राहाता व कोपरगावमध्ये प्रत्येकी 2 मतदान केंद्र आहेत. उर्वरित तालुक्यांसाठी प्रत्येकी 1 केंद्र आहे. जिल्ह्यातील 17 हजार 392 मतदारांपैकी संगमनेर, कोपरगाव, राहाता आणि नगर या चार तालुक्यांतच निम्मे मतदार आहेत. वरील तालुक्यातील नगर शहर वगळता उर्वरित ठिकाणी 2 हजारांपेक्षा अधिक शिक्षक मतदार असून अकोले, श्रीरामपूर, नेवासा, राहुरी आणि नगर शहरात 1 हजार ते 1 हजार 600 मतदार आहेत. या तालुक्यात जो उमेदवार वर्चस्व सिध्द करेल त्यांना नगर जिल्ह्यातून आघाडी मिळणार आहे.
नाशिक मतदारसंघात नाशिकसह नगर, धुळे, जळगाव व नांदूरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यांतून 64 हजार 802 मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात 23 हजार 597, धुळ्यात 8 हजार 88, जळगावमध्ये 13 हजार 56, नंदुरबार जिल्ह्यात 5 हजार 419 तर नगर जिल्ह्यात 17 हजार 392 मतदार आहेत.मतदान मतपत्रिकेवर होणार आहे. उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम मतदारांना नोंदवायचा आहे. निवडणुकीसाठी आणि मतदानाच्या वेळी प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षांसह दोन सहायक मतदान केंद्र अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई असे पाच कर्मचारी निवडणूक कामकाज सांभाळणार आहेत. याव्यतिरिक्त फिरत्या पथकात एक व्हिडिओग्राफर, व्हिडिओ निरीक्षक व दोन पोलिसांचा समावेश राहणार आहे.
मतदार संख्या व कंसात मतदान केंद्र
अकोले 1 हजार 27 (1), संगमनेर 2 हजार 459 (3), राहाता 2 हजार 151 (2), कोपरगाव 2 हजार 207 (2), श्रीरामपूर 1 हजार 28 (1), नेवासा 1 हजार 152 (1), शेवगाव 817 (1), पाथर्डी 947 (1), राहुरी 1 हजार 15 (1), पारनेर 729 (1), नगर 1 हजार 627 (3), श्रीगोंदा 909 (1), कर्जत 641 (1), जामखेड 349 (1).
जिल्ह्यातून 9 उमेदवार
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातून युवा नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्यासह शिक्षक प्रा. भाऊसाहेब कचरे, अमृतराव उर्फ आप्पा शिंदे यांच्यासह 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापूर्वी या मतदारसंघात 1987 ला नगर जिल्ह्याला रा.हा. शिंदे यांच्या रुपाने आमदार मिळत मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. यामुळे यंदाच्या निवडणुकीत सर्वाचे लक्ष नगर जिल्ह्याकडे लागले आहे.