Friday, November 22, 2024
Homeनगरशिक्षिकेच्या पगारातून पावणेदोन लाखांचा अपहार

शिक्षिकेच्या पगारातून पावणेदोन लाखांचा अपहार

संस्था चालक व मुख्याध्यापिका यांच्याविरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

संस्थाचालक व मुख्याध्यापिकेच्या संगनमताने एका शिक्षिकेची 1 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुख्याध्यापिकेविरोधात एक महिन्यापूर्वीच लाचलुचपत विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला होता.

- Advertisement -

शहरातील सुभद्राबाई बाबुराव गायकवाड शाळेत सुनंदा बारकू शेळके या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. यांच्या नावे 26 एप्रिल 2023 रोजी वरिष्ठ वेतन श्रेणीची रक्कम 2 लाख 7 हजार 230 रुपये जमा झाली होती. ही रक्कम संस्थेच्या मुख्याध्यापिका संगीता पवार यांनी शिक्षिका सुनंदा शेळके यांच्या नावे क्रेडिट सोसायटीची कसल्याही प्रकारची बाकी नसताना, 1 लाख 7 हजार 230 रुपये कपात केले व ते पैसे संस्थेच्या खात्यावर वर्ग करून अध्यक्ष शंकरराव गायकवाड व मुख्याध्यापिका संगीता पवार यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरले, तसेच सप्टेंबर 2019 ते डिसेंबर 2023 सोसायटीच्या नावाने कपात करून सुमारे 68 हजार 400 रुपये काढून अपहार केला, असा सुमारे 1 लाख 75 हजार 630 रुपयांचा अपहार केला.

याप्रकरणी प्राथमिक शिक्षिका सुनंदा शेळके यांच्या फिर्यादीवरून संस्था चालक शंकरराव गायकवाड व मुख्याध्यापिका संगीता पवार यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका शिक्षकाची वेतनश्रेणीची खात्यामध्ये जमा झालेली फरकाची रक्कम मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला म्हणून 45 हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापिका संगीता पवार यांना लाचलुचपत विभागाने 12 जून 2025 रोजी रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या