अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना नोकरी व पदोन्नतीसाठी टीईटीची परीक्षा सक्तीची केल्याने यंदा नगर जिल्ह्यातून 13 हजार 500 शिक्षकांनी टीईटी परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. यातील 50 टक्के शिक्षक हे सध्या कार्यरत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. टीईटी परीक्षेबाबत सर्वोच्च आदेशानंतर नगरसह राज्यातून ही परीक्षा देणार्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढली असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 23 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जाणार आहे. 9 ऑक्टोबरच्या मुदतीत राज्यातील चार लाख 76 हजार 164 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यभरातून टीईटीसाठी एक लाख 18 हजार अर्ज अधिक आले आहेत. त्यात नोकरीवरील सुमारे एक लाख शिक्षक असल्याची बाब समोर आली आहे. फेब्रुवारी 2013 पासून शिक्षक भरतीसाठी पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक करण्यात आली. त्यापूर्वी मात्र टीईटीची अट नव्हती.
तरीपण, सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने 52 वर्षांपर्यंतच्या सर्वच शिक्षकांसाठी टीईटीचे बंधन घातले. त्यावेळी टीईटीची अट नसताना आता आम्ही ती परीक्षा का द्यायची, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. त्यावर शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्र्यांनाही निवेदने दिली. मात्र, अजूनही पुनर्विचार याचिका दाखल झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी टीईटीची तयारी करीत परीक्षेसाठी अर्ज केले आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 23 नोव्हेंबरला होणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकार्यांकडून परीक्षा केंद्रांची माहिती मागविली आहे. राज्यभरातून चार लाख 76 हजार 164 उमेदवारांनी अर्ज व परीक्षा शुल्क भरले आहे. आणखी काहीजणांचे परीक्षा शुल्क भरायचे बाकी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास एक लाख अर्ज अधिक आले, असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यावतीने देण्यात आली.
टीईटी विरोधातील लढाईसाठी गंगाजळीचे संकलन
नगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात लढा देण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी शिक्षकांकडून निधीचे संकलन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी या लढाईत आपला वाटा म्हणून 500 रुपयांपासून पुढे योगदान देण्यास सुरूवात केली आहे. शिक्षकांच्या व्हॉटअप गु्रपवर याबाबतचा तपशील शिक्षक संघटनांकडून सादर करण्यात येत आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबरला आदेश दिल्यानंतर याप्रकरणी पुनर्विचार याचिकेसंदर्भात कार्यवाही झालेली नाही. सुप्रिम कोर्टाचा निर्णय अंतिम असतो. त्यावर राज्य सरकार वेगळी भूमिका घेऊ शकत नाही, असे सांगण्यात येत असल्याने आता राज्यातील शिक्षकांनी टीईटीसाठी अर्ज केले असल्याचे सांगण्यात आले.
यंदा नगरमध्ये वाढले चार हजार अर्ज
नगर जिल्ह्यात यंदा टीईटी परीक्षेसाठी 13 हजार 500 शिक्षकांचे अर्ज आलेले आहे. मागील वर्षी ही संख्या 9 हजार 500 होती. या वर्षी जिल्ह्यात सुमारे 4 हजार शिक्षकांचे अर्ज टीईटी परीक्षेसाठी वाढले आहेत. यंदा दाखल अर्जात कार्यरत शिक्षकांची संख्या ही 50 टक्के असून उर्वरितमध्ये नोकरीची प्रतिक्षा असणारे अथवा डीएड्, बीएड झालेल्या शिक्षकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.




