Monday, July 1, 2024
Homeनगरविधान परिषदेसाठी विवेक कोल्हेंकडून चाचपणी

विधान परिषदेसाठी विवेक कोल्हेंकडून चाचपणी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

नुकत्याच पुढे ढकलण्यात आलेल्या विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. अंदाज घेतल्यानंतर त्यांच्या गटाकडून संपर्क अभियान सक्रीय करण्यात आले आहे, असा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. या निमित्ताने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय भूगोलाचा अभ्यास होईल, संपर्क वाढेल अशी प्रतिक्रीया कोल्हे गटातील एका कार्यकर्त्याने ‘सार्वमत’शी बोलताना दिली.

निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या राज्यातील पदवीधर आणि शिक्षक अशा 4 मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम नुकताच पुढे ढकलला. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 10 जून रोजी नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार होती. आता ही निवडणूक जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातील 64 हजारांवर शिक्षक मतदार आहेत. या निवडणुकीत मतदार शिक्षक असले तरी शिक्षण संस्थाचालक जोर लावताना दिसतात.

आता कोपरगाव येथील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी या मतदारसंघासाठी चाचपणी सुरू केली आहे, या चर्चेने जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. यासाठी कोल्हे यांच्या समर्थकांनी शिक्षक मतदारांशी संपर्कास सुरूवात केली आहे. शनिवारी राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना परिसरात अशी चाचपणी झाल्याची वार्ता राजकीय वर्तुळात वार्‍यासारखी पसरली होती.

चर्चा होतच असते !
कोल्हे परिवार काही दशकांपासून राज्याच्या सहकार, समाजकारण, शिक्षण आणि राजकारण क्षेत्रात सक्रीय आहे. त्यामुळे अशा चर्चा होत असतात, अशी प्रतिक्रीया विवेक कोल्हे यांनी दिली. समर्थक, कार्यकर्ते आग्रह करत असतात. मात्र आमच्या पातळीवर असे काही ठरले तर नक्की जाहीर करू, असा दावा त्यांनी केला.

कोल्हेंचे माहितीपत्रक
विवेक कोल्हे यांची सामाजिक, राजकीय कारकिर्द विशद करणारे माहितीपत्र काही ठिकाणी पोहचले आहे. संजीवनी सहकारी साखर कारखाना, कोपरगाव औद्योगिक वसाहत, जिल्हा बँक आणि देशातील मोठ्या सहकारी संस्थांपैकी एक असलेल्या इफकोच्या संचालकपदापर्यंतचा प्रवास पुढे शिक्षक मतदारसंघ आमदारकीच्या निवडणुकीपर्यंत घेवून जाण्यासाठीच या माहितीपत्रकाचा प्रसार सुरू असल्याचा कयास बांधला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या