अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला असून जिल्ह्यातील एकूण 22 हजार 850 नोंदणीकृत उमेदवारांपैकी तब्बल 21 हजार 431 उमेदवारांनी रविवारी (23 नोव्हेंबर) परीक्षा दिली. 1 हजार 419 उमेदवार गैरहजर राहिल्याची माहिती जिल्हा परीक्षा नियंत्रक तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांनी दिली. दरम्यान, अहिल्यानगर शहर व परिसरात परीक्षा केंद्र असल्याने परिक्षा सुटल्यानंतर शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यरत शिक्षकांना आता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक आणि इच्छुक उमेदवारांनी रविवारी ही परीक्षा दिली. राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत टीईटीचे पेपर क्र. 1 (सकाळी 10.30 ते 1) आणि पेपर क्र. 2 (दुपारी 2.30 ते सायंकाळी 5) सुरळीतपणे पार पडले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील परीक्षा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवण्यात आले.
टीईटी परीक्षा दोन वेगवेगळ्या स्तरांवर घेण्यात आली.
पेपर एकसाठी एकुण 9 हजार 609 उमेदवारांनी नोंदणी केली होती. पैकी 9 हजार 37 उमेदवारांनी ही परिक्षा दिली. तर पेपर दोनसाठी 13 हजार 241 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 12 हजार 394 उमेदवारांनी परिक्षा दिली. दोन्ही पेपर मिळून एकूण एक हजार 419 उमेदवार गैरहजर राहिले. अहिल्यानगर शहर व परिसरातील पेपर 1 साठी 25 आणि पेपर 2 साठी 44 परीक्षा केंद्रे कार्यरत होती. केंद्र संचालक, उपसंचालक, पर्यवेक्षक, समवेक्षक यांसह दोन्ही पेपरांसाठी एकूण एक हजार 287 परीक्षा कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. परीक्षेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी प्रत्येक केंद्रावर बायोमेट्रिक उपस्थिती घेण्यात आली. शिवाय प्रत्येक दालनात, मुख्य प्रवेशव्दारावर तसेच नियंत्रण कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.




