अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे प्राथमिक शिक्षकांना टीईटी परीक्षा सक्तीची करण्यात आलेली आहे. राज्यात टीईटी उत्तीर्ण नसणार्यांचा आकडा मोठा असून नगर जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी ही परीक्षा दिलेली नसल्याची माहिती समोर आली असून यामुळे टीईटी परीक्षेचा गुंता वाढणार आहे. दरम्यान, तालुका पातळीवरून टीईटी उत्तीर्ण नसणार्या शिक्षकांची माहिती न देणार्या 14 तालुक्याच्या गटशिक्षणाधिकार्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने स्मरणपत्र काढत टीईटी परीक्षा दिलेल्या व न दिलेल्या शिक्षकांची माहिती पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
मागील महिन्यांत सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक शिक्षकांना टीईटीची परीक्षा सक्तीची केलेली आहे. या न्यायालयाच्या आदेशानंतर नगरसह राज्यातील शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. दरम्यान, शिक्षक संघटनांनी एकत्र येत टीईटी विरोधातील सर्वोच्च निकालाला आव्हाण देण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी राज्य पातळीवर शिक्षक संघटनांकडून गुरूजींचे संघटन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर राज्याच्या शिक्षण विभागाकडून टीईटीबाबत कोणतेच स्पष्ट आदेश नसल्याने जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग गोंधळात आहे.
नगर जिल्ह्यात 2011 पासून झालेल्या भरतीचा विचार केल्यास व सध्या कार्यरत असणार्या 10 हजार 500 शिक्षकांपैकी सुमारे 30 टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षकांनी ही परीक्षा दिलेली नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मात्र, शिक्षण विभागातील तज्ञाच्या अंदाजनूसार कार्यरत शिक्षकांच्या 50 टक्क्यांच्या पुढे असल्याचे सांगण्यात आले. टीईटी परीक्षेबाबत हा अंदाज असला तरी वस्तूनिष्ठ माहिती प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून आल्यानंतर उजेडात येणार आहे.
गेल्या 10 ते 15 दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने जिल्हा पातळीवरून 14 ही तालुक्याच्या गटविकास अधिकार्यांना पत्र पाठवून टीईटी उत्तीर्ण शिक्षक आणि टीईटी नसलेल्या शिक्षकांची यादी पाठवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावर तालुका पातळीवरून कोणीच हालचाल नसल्याने अखेर शिक्षण विभागाने सोमवारी स्मरणपत्र पाठवत टीईटी शिक्षकांची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
53 प्लस वाचले
न्यायालयाच्या आदेशानूसार प्राथमिक शिक्षकांना नोकरीसह प्रमोशनसाठी टीईटीची परीक्षा सक्तीची करण्यात आलेली आहे. मात्र, या परीक्षेतून 53 प्लस असणारे शिक्षक म्हणजे वयाची 53 वर्षे झालेल्या शिक्षकांना सुटका मिळालेली आहे. मात्र, या शिक्षकांना देखील टीईटीची परीक्षा नसल्यास प्रमोशन मिळणार नसल्याचे सांगण्यात आले.




