महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत जबर पराभव पत्करावा लागल्यानंतर पक्षातील गळती थांबण्याचे नाव घेत नाही. विशेषतः शिवसेना (ठाकरे गट) सातत्याने अडचणीत सापडत असून, आता आणखी एक धक्का बसला आहे.
मुंबईच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका संजना घाडी यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला असून, त्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिंदे गटाने महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
संजना घाडी या शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून कार्यरत होत्या आणि पक्षातील सक्रिय नेत्या मानल्या जात होत्या. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या प्रवक्त्यांच्या यादीत त्यांना सुरुवातीला वगळण्यात आलं होतं. नंतर त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं, मात्र त्यामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात होतं.
आता त्यांनी अधिकृतपणे ठाकरे गट सोडण्याची घोषणा केली असून, लवकरच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या शिंदे गटात प्रवेश करतील. विशेष म्हणजे, त्यांचे पती संजय घाडी यांनीदेखील ठाकरे गटाचा राजीनामा दिला असून, तेही शिंदे गटात दाखल होणार आहेत. या घडामोडींमुळे ठाकरे गटासाठी अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.