Sunday, October 27, 2024
Homeभविष्यवेधम्हणूनच चातुर्मासात विष्णू शयन करतात

म्हणूनच चातुर्मासात विष्णू शयन करतात

चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढाचे 20 दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तूळ राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे. चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात, अशी कल्पना आहे. ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो.

एका कथेनुसार ह्या चातुर्मासचा संबंध देव विष्णुच्या वामन अवताराशी आहे. असुरराज बळीने विश्वजीत यज्ञ करून देवराज इंद्र यांना पराजित केले आणि तिन्ही लोक ताब्यात घेतले होते. ऋषी कश्यप आणि त्यांची अर्धांगिनी अदिती हे आपले पुत्र देवराज इंद्र यांना मदत मिळावी यासाठी श्री विष्णूंकडे गेले आणि फलस्वरूप श्री विष्णूंनी अदिती देवींना आश्वासन दिले की ते त्यांचे पुत्र होऊन जन्म घेणार आणि असुरराज बळीला पराजित करणार. आणि झाला असं श्री विष्णू यांचा पांचवा अवतार म्हणजेच वामन अवतार. असुरराज बळी दान-पुण्य करण्यात खूप विश्वास ठेवत असे आणि ब्राम्हणाचा आदर करत असे. एकदा असुरराज बळी यज्ञ करत असताना श्री विष्णू वामन अवतारात त्याठिकाणे पोहचले. ब्राह्मणाला बघून बळीने त्यांना विचारले की तो त्यांची काय सेवा करु शकतो. तेव्हा श्री विष्णूंनी दानमध्ये 3 पावले भूमीची मागणी केली.

- Advertisement -

मागणी स्वीकार करुन श्री विष्णूंच्या लहान वामन शरीराचे विस्तार होऊ लागले आणि त्यांनी तीन पावले भूमीमधून एका पावलात पूर्ण धरती, दुसर्‍यात पावलात स्वर्ग घेतले आणि जेव्हा कोणतीही जागा उरली नाही तेव्हा त्यांनी बळीला विचारले की आता तिसरा पाऊल कुठे ठेवू. तेव्हा बळीने स्वतःचे डोकं पुढे केलं आणि म्हणाला, तिसरा पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. बळीचे हे उत्तर ऐकून वामन प्रसन्न झाले आणि विष्णूंच्या स्वरूपात प्रकट होऊन बळीला वरदान दिले की तो पाताळलोकावर राज्य करू शकतो. असं मानलं जातं की, बळीने श्री विष्णूंना त्याचसोबत पाताळलोकात राहाण्याचा अनुरोध केला. विष्णूंने हे स्वीकारले पण देवी लक्ष्मी सह सर्व देवतांना काळजी वाटली. देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंना पाताल लोकातून मुक्त करण्यासाठी युक्ती केली आणि एक गरीब स्त्री बनून राजा बळीकडे जाऊन त्याला आपला भाऊ मानून राखी बांधली आणि त्या बदल्यात भगवान विष्णूंना पाताळातून मुक्त करण्याचे वचन मागितले. भगवान विष्णूंना आपल्या भक्ताला निराश करायचे नव्हते, म्हणून त्यांनी बळीला वरदान दिले की तो आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत पाताळ लोकात निवास करेल, म्हणून या चार महिन्यांत भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये राहतात.

चातुर्मासात विवाह मुहूर्त नसतात. या काळात हिंदू धर्मांत अनेक व्रत-उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णित संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार, विवाह, दीक्षा ग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभ कर्म केली जात नाहीत. चातुर्मासाला पौराणिक कथेचा संदर्भ आहे. काळात शेषशायी विष्णू जलाशयात निद्रा घेतात असा समज आहे.

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संत दर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत महत्त्व आहे. नवसृष्टी निर्मिती हे ब्रम्हदेवाचे कार्य चालू असताना पालनकर्ता श्रीविष्णू निष्क्रिय असतात आणि म्हणूनच चातुर्मासात विष्णू शयन करतात असे म्हणतात. या काळात श्रीविष्णू क्षीरसागरात शयन करतात, असे समजले गेले आहे. आषाढ शुद्धे एकादशीला विष्णू शयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो.

देवशयनी काळात म्हणजे निद्राकाळात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी या दरम्यान व्रत, पूजा, आचरण केले जाते.

धार्मिक शास्त्रानुसार चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे. पावसाळा असल्यामुळे स्थलांतर शक्य नसतेे म्हणून चातुर्मास व्रत एकास्थानी राहूनच करण्याची पद्धत पडली असावी. तसेच या दरम्यान शरिरातील पचनादी संस्थांचे कार्य वेगळ्या पद्धतीने सुरू असल्यामुळे कांदे, वांगी, लसूण, मांसाहारी पदार्थ इत्यादी खाद्यपदार्थ वर्ज्य करण्यास सांगितले आहेत.

अनेक लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. एखादा नियम धरतात जसे पर्णभोजन म्हणजे पानावर जेवण करणे, नक्त म्हणजे एक वेळेस जेवणे, अयाचित म्हणजे न मागता मिळेल तेवढे जेवणे, एकवाढी म्हणजे एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे, मिश्रभोजन म्हणजे सर्व पदार्थ एकत्र मिसळून जेवणे इत्यादी. अनेक स्त्रिया चातुर्मासात अनेक प्रकारची व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसर्‍या दिवशी उपवास, असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर राहतात. काही एकभुक्त राहतात.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या