आज वाहनांच्या रचनेत, तंत्रज्ञानात अमुलाग्र बदल घडत आहेत. त्यामुळे रिचार्ज करता येणार्या बॅटर्या आणि त्याची पुरवठा केंद्रे हा एक नवीन उपव्यवसायही वेगाने फोफावत आहे. आज अस्तित्वात असणारी हायब्रीड टेक्नॉलॉजीसुद्धा फार तर दशकभर चालेल. त्यानंतर ड्रायव्हिंग करताना आपले हात अन डोळे आणि मन अथवा बुद्धी ड्रायव्हिंगच्या प्रक्रियेपासून विलग करून गाडी सुरळीत चालू राहील…
आज वाहनांच्या रचनेत, तंत्रज्ञानात अमुलाग्र बदल घडत आहेत. त्यामुळे रिचार्ज करता येणार्या बॅटर्या आणि त्याची पुरवठा केंद्रे हा एक नवीन उपव्यवसायही वेगाने फोफावत आहे. आज अस्तित्वात असणारी हायब्रीड टेक्नॉलॉजीसुद्धा फार तर दशकभर चालेल. त्यानंतर ड्रायव्हिंग करताना आपले हात अन डोळे आणि मन अथवा बुद्धी ड्रायव्हिंगच्या प्रक्रियेपासून विलग करून गाडी सुरळीत चालू राहील…
तंत्रज्ञानाच्या ज्या टप्प्यावर आज आपण आहोत तो आहे इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट आणि बॅटरी या इंधनपर्यायी व्यवस्थेचा. अर्थातच यामुळे वाहनांच्या रचनेत तंत्रज्ञानात अमुलाग्र बदल घडत आहेत. यापुढील काळात आमच्या वाहनांचे ‘दिसणे’देखील बदलणार आहे. रिचार्ज करता येणार्या बॅटर्या आणि त्याची पुरवठा केंद्रे हा एक नवीन उपव्यवसाय सध्या वेगाने फोफावत आहे. पूर्वी जेवढ्या मोठ्या क्षमतेचे इंजिन तेवढी गाडीची प्रतिष्ठा जास्त असायची. पण आता गाडीमध्ये इंजिनच राहणार नाही. कारण पेट्रोल या इंधनाचा शक्तीमध्ये परिवर्तीत करणारा तंत्रज्ञानाचा भागच वगळला जात आहे. पूर्वी कंपन्या शक्तीशाली इंजिन बनवायच्या. त्यातली सफाई, शक्तीशालीपणा यावर त्या वाहनाची विश्वासार्हता बाजारात ठरत असे. पण आता गाडीमध्ये इंजिनच नाही.
यातला विनोदाचा मुद्दा सोडून द्या. पण एक नवी व्यवस्था या नव्या तंत्रज्ञानामुळे रुजत आहे. आणि भारतीय बाजारपेठेला त्याची सवय होत आहे. ग्राहक मानसिकतेतला हा बदल नुसता मनोहारी नाही तर क्रांतीकारक आहे. त्यात बाविसाव्या शतकातल्या वैयक्तिक प्रवास व्यवस्थेची बीजे रोवलेली आहेत. आज तरी रिचार्ज होणार्या बॅटर्यांच्या पुरवठ्यामध्ये दक्षिण कोरियाने आघाडी घेतली आहे. करोनाकाळात सेमी कंडक्टर चीपचा तुटवडा कार कंपन्यांच्या उत्पादनांच्या वर्मी घाव घालून गेला. त्यामुळे तशी हॉस्पिटल्स आता स्वत:चे ऑक्सिजन प्लांट टाकत आहेत. तसेच कार उत्पादक स्वत:च्या चीप उत्पादनाच्या व्यवस्था उभारत आहेत. यापुढच्या काळात बॅटर्यांच्या बाबतीतही ही परिस्थिती येणार हे उघड आहे. निकेल या धातूच्या काहीशा किचकट बॅटर्या केव्हाच हद्दपार झाल्या. सध्या वापरल्या जाणार्या बॅटर्यांमध्ये लिथियम या धातूच्या प्लेट वापरल्या जातात. पण हे देखील दोन-पाच वर्षे टिकणार आणि एक पूर्ण नवीन प्रकारची प्रणाली अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. हे सगळे इतक्या वेगाने चालू आहे की ऑटोमोबाईल क्षेत्रात पूर्वीचा अनुभव उपयोगी पडेल असे वाटत नाही. आजच अमेरिकेतल्या अनेक कार उत्पादक कंपन्यांमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरपेक्षा सॉफ्टवेअर इंजिनिअरची संख्या जास्त आहे. हा बदल लक्षणीय आहे. अनेक प्रकारची तंत्रज्ञान एकत्र येऊन आता वाहने बनत आहेत. ही तंत्रज्ञानाच्या प्रगतीची एक अवस्था आहे. याचाच अर्थ जे आत्ता आहे ते सार्वकालिक सर्वोत्तम नाही. तर आजच्या काळासाठी सर्वोत्तम आहे.
असे असले तरी पेट्रोलपासून इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिकपासून हैड्रोजन (म्हणजे पाण्यावर चालणारी गाडी) हा ‘बेस्ट टेक्नॉलीजा’चा नव्हे तर ‘नेक्स्ट टेक्नॉलॉजी’चा आविष्कार आहे. मग कसे असेल उद्याचे कार मार्केट? फोर्ड कंपनीचा वार्षिक अहवाल वाचला तर 2030 पर्यंत फोर्डउत्पादित 50 टक्के गाड्या या इलेक्ट्रिक असणार आहेत, असे दिसते. जगातल्या इतर प्रमुख कार उत्पादकांचे उत्पादनाचे आकडे जवळपास असेच आहेत. इलेक्ट्रिक गाडी आली की दर सहा महिने, वर्षांनी पीयुसी करून घ्यायच्या झंझटीतून ग्राहकांची मुक्तता होणार आहे. आजच दिल्लीमध्ये सीएनजीवर चालणार्या सार्वजनिक वाहतुकीचा जम बसला आहे. नागपूरमध्ये गडकरींनी इलेक्ट्रिसिटीवर चालणार्या बसेस आणल्या. इतर सर्व महानगरपालिकांना याच मार्गाने जावे लागणार. इलेक्ट्रिक बॅटरी अथवा चार्जिंग पॉईंटवर अवलंबून असणार्या पब्लिक ट्रान्सपोर्टची किंमत पेट्रोल, डिझेल आदी वाहनांपेक्षा कमी आहे. नवी पिढी या बाबत प्रचंड उत्साही आहे. 2010 ते 2020 या काळात जन्मलेली पिढी स्वत:ची गाडी घेईल तेव्हा ती इलेक्ट्रिक अथवा हायड्रोजनवर चालणारी असेल. त्यांच्यासाठी पेट्रोल अथवा डिझेलवर चालणारी गाडी इतिहासजमा असेल. कधी तरी एकदा म्युझियममध्ये जाऊन पहावी अशी. फिनलंडसारख्या छोट्याशा देशात लँडलाईन फोन कधी आलेच नाहीत. इथे थेट मोबाईल फोन्सच आले. तसेच काहीसे या पिढीचे होणार आहे.
आज अस्तित्वात असणारी हायब्रीड टेक्नॉलॉजीसुद्धा अल्पजीवीच आहे. फार तर दशकभर चालणारी. त्यानंतर ड्रायव्हिंग करताना आपले हात अन् डोळे आणि मन अथवा बुद्धी ड्रायव्हिंगच्या प्रक्रियेपासून विलग करून गाडी सुरळीत चालू राहील अशा तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत होणार आहे. त्यामुळे एक संपूर्ण पिढी गाडी चालवताना स्टेअरिंग हाती का धरायचे अन् समोरच्या रस्त्याकडे टक लावून का पहायचे असा प्रश्न पुढच्या 10 वर्षांत विचारणार आहे. आजच गुगलने ड्रायव्हरविरहीत गाड्या वापरायला सुरुवात केली आहे. आज हे प्रयोगाच्या पातळीवर आहे, पण उद्या सर्वसामान्य माणसालाही उपलब्ध होणार आहे. अँडी केसलर या अर्थतज्ज्ञाचे अलीकडचे लेख वाचत असताना एक अफलातून संदर्भ आढळला. केवळ इलेट्रिकवर चालणारी प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी 2024 मध्ये आपल्या प्रत्यक्ष सेवेला प्रारंभ करणार आहे. तिचे आजचे बाजारमूल्य अधिक आहे, हे अचिंबत करणारे आहे. येऊ घातलेल्या क्रांतीच्या या पाऊलखुणा आहेत. नेमके हेच चारचाकी प्रवासात देखील घडत आहे. 2030 नंतर जवळपास सर्वच गाड्या इलेक्ट्रिकवर चालणार्या असतील. सॉफ्टवेअरने एकमेकांशी ‘कनेक्ट’ झालेल्या असतील आणि ज्यांना परवडेल अशांच्या गाड्या ड्रायव्हरलेस असतील. म्हणजे त्या चालवण्यासाठी चालकाची गरज नसेल. जिथे जायचे आहे तो पत्ता गाडीच्या संगणकात फीड केला (तोही आवाज सूचनेच्या माध्यमातून) की तुमचा विनाअपघात निर्धोक प्रवास सुरू. हीच ती वैयक्तिक प्रवासाच्या वाहनव्यवस्थेतील पुढची क्रांती, ज्याच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. स्वत:ची गाडी बाळगणे आणि ती बाळगण्यापेक्षा मिरवणे हे आज प्रतिष्ठीतपणाचे लक्षण मानले जाते. सत्तरीच्या दशकात रेफ्रिजरेटर आल्यानंतर बहुतांश घरात तो दिवाणखान्यात एक प्रदर्शनीय वस्तू म्हणून प्रतिष्ठापूर्वक ठेवला जायचा, दाखवला जायचा. पण आज कोणत्याही घरात तो दिवाणखान्यात नसतो तर स्वयंपाकघरात कुठे तरी कोपर्यात असतो. हे त्याच्या उपयुक्तततेचे अवमूल्यन नाही तर प्रदर्शन प्रतिष्ठामूल्य कमी झाल्याचा निदर्शक आहे. स्वत:कडे गाडी असण्याचे प्रदर्शनी प्रतिष्ठामूल्य हे त्या स्वयंपाकघरातल्या कोपर्यातल्या फ्रीजसारखे असणार आहे. ग्राहकाची ही बदलती मानसिकता हळूहळू कंपन्यांच्या लक्षात येत आहे. स्वत:ची गाडी असणे आणि चारचाकीचा प्रवास परवडणे या दोन भिन्न बाबी आहेत आणि त्याचाच फायदा उठवत ‘शेअर्ड मोबिलिटी ट्रान्सपोर्ट’ या संकल्पनेवर आधारित ‘ओला’ आणि ‘उबर’ने वैयक्तिक प्रवासात आघाडी घेतली. उद्या यात आणखी बदल घडणार आहे. भविष्यात तुम्ही गाडी घेऊन कार्यालयात गेलात तर गाडी दिवसभर नुसती उभी असते. त्यातल्या गुंतवणुकीचा कोणताच परतावा तुम्हाला मिळत नाही. मग त्या आठ तासांच्या काळात तुमची गाडी एखाद्या कंपनीने योग्य ती काळजी घेऊन भाड्याला लावली तर… भारतीय मानसिकतेच्या चौकटीत आज हे अशक्य वाटेल. पण लक्षात घ्या, लंडनमध्ये हे सर्रास सुरु आहे. अशा प्रकारे खासगी गाड्या भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करून एक बिझनेस मॉडेल सुस्थापित करत इंग्लंडमध्ये अनेक कंपन्या कार्यरत आहेत. म्हणजे तुम्हाला दररोज कामावर जाण्यासाठी 10 ते 15 किलोमीटर प्रवास करावा लागतो. मग तुमची गाडी तिथे आठ ते दहा तास उभी असते आणि नंतर तेवढाच प्रवास करत तुम्ही घरी परतता. या दरम्यानच्या काळात ती गाडी अशा कंपन्या भाडे तत्त्वावर चालवतात आणि त्याच्या परताव्यातला महत्त्वाचा भाग तुमच्याशी शेअर करतात. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे स्वत:ची गाडी असण्याऐवजी हव्या त्या मॉडेलची गाडी, हव्या त्या वेळी, हव्या तितक्या काळासाठी उपलब्ध होणे. आज आपण त्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत.