मनमाड । प्रतिनिधी Manmad
काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय रेल्वे स्टेशन वरील प्रवाशांना आला, धावती ट्रेन पकडण्याच्या नादात खाली पडून रेल्वे खाली जाणार्या दोन महिलांसह एका चार वर्षाच्या बालकास दोन रेल्वे पोलिसांनी समय सूचकता दाखवून त्यांना मृत्यूंच्या दाढेतून बाहेर काढत जीवदान दिले. वेळीच या पोलिसांनी त्यांना पकडून बाहेर ओढले नसते तर या तिघांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला असता. दोघा महिलांसह बालकांचे प्रसंगावधान राखत प्राण वाचविणार्या दोन्ही पोलिसांनी दाखविलेल्या धाडसाचे प्रवाशांनी कौतुक करून अभिनंदन केले.
रेल्वे प्रशासनातर्फे धावती ट्रेन पकडू नये अशी वारंवार सूचना देण्यात येत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करून प्रवासी आपला जीव का धोक्यात घालतात असा प्रश्न सर्वाना पडला आहेल याबाबत अधिक वृत्त असे की, आसिफा अहमद, मोहम्मद अनस (वय 4 वर्ष) शकील अहमद आणि शकिला कासीम (रा.मालेगाव) या चौघाना मुंबई -नांदेड तपोवन एक्सप्रेसने जालना येथे जायचे होते त्यामुळे ते प्लॉट फार्म क्र.चार वर येऊन थांबले होते.
मात्र गाडी प्लॉट फार्म क्र 6 वर असल्याचे त्यांना कळताच त्यांनी प्लॉट फार्म 4 वरून 6 वर धाव घेतली मात्र तो पर्यत गाडी सुरु झाली होती गाडी जात असल्याचे पाहून पुरुषाने धावती ट्रेन पकडली मात्र दोन महिला आणि चार वर्षाचा बालक ट्रेन पकडत असताना त्यांचा तोल गेला आणि तिघे खाली पडून ट्रेन खाली जात असताना ड्युटीवर तैनात असलेले रेल्वे पोलीस माधव दासरे आणि विठ्ठल वाघ या दोघांनी समय सूचकता दाखवून तातडीने धाव घेऊन गाडी खाली जाणार्या तिघांना बाहेर ओढून काढत त्यांना जीवदान दिले. जर या दोघा पोलिसांनी क्षणाचाही विलंब केला असतात तर चार वर्षाच्या बालका सोबत दोन्ही महिलांचे प्राण संकटात सापडले असते दोघा पोलिसांनी दाखविलेल्या धाडसा बद्दल उपस्थित प्रवाशांनी त्यांचे कौतुक केले.
पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती पंडित पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी या दोन्ही पोलिसांचे अभिनंदन केले प्रवाशांनी धावती ट्रेन पकडून स्वतःचे जीव धोक्यात घालू नये असे आवाहन रेल्वे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी केले आहे.
धावती गाडी पकडताना जेंव्हा आम्ही खाली पडून ट्रेन खाली जात असताना आता आपण वाचणार नाही मात्र अल्लाहने आमच्यासाठी फरिश्ते म्हणून दोन पोलीस भावांना पाठविले त्यांनी आमचे प्राण वाचवले त्यांचे आभार कसे मानावे यासाठी आमच्याकडे शब्द नाही आम्ही अल्लाहकडे एकच दुवा करतो की आमच्या या दोन्ही पोलीस भावांना नेहमी सुखी आणि समाधानी ठेव.
-आसिफा अहमद