वॉशिंग्टन –
दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच कोरोना संक्रमित आढळल्यांतर अमेरिकेचाही एक टेनिसपटू या व्हायरसच्या संपर्कात आला आहे. अमेरिकेतील फ्रान्सिस टियाफो या टेनिसपटूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
कोरोना चाचणीनंतर, जॉर्जियात खेळल्या जाणार असलेल्या ऑॅल अमेरिका टीम कपमधून फ्रान्सिसने माघार घेतली. जागतिक क्रमवारीत ८१ व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सिसने शुक्रवारी सैम क्वेरीचा पराभव केला होता. कोरोनानंतर प्रेक्षकांसह खेळवली जाणारी अमेरिकेतील ही पहिली स्पर्धा आहे.
फ्रान्सिस हा पॉझिटिव्ह आढळणारा पाचवा टेनिसपटू आहे. गेल्या महिन्यामध्ये गिगोर दिमित्रोव्ह, बोर्ना कोरिक आणि व्हिक्टर ट्रॉकी यांनाही संसर्ग झाला आहे.
कोरोना संक्रमित आढळल्यानंतर, दहा दिवसांमध्ये जोकोविचची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. जोकोविचची पत्नी जेलेनाही कोरोनामुक्त झाली आहे. सर्बिया आणि क्रोएशिया येथे आयोजित केलेल्या अॅड्रिया टूर प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेदरम्यान जोकोविचला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना १० दिवस क्वारंटाईन करण्यात आले.
अॅड्रिया टूरमध्ये भाग घेतल्यानंतर कोरोनोव्हायरसची लागण झालेल्या टेनिसपटूंमध्ये जोकोविच हा पॉझिटिव्ह असणारा चौथा खेळाडू होता. बेलग्रेड येथे झालेल्या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हे स्टेडियम प्रेक्षकांनी भरले होते. या कठीण काळात स्पर्धा घेण्याच्या निर्णयाबद्दल किर्गिओसने निराशा व्यक्त केली होती.
डेनवर नगेटसकडून खेळणारा एनबीए खेळाडू निकोल जोकिक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. जोकिकने जोकोविचसोबत वेळ घालवला होता. तर, माजी विम्बल्डन चॅम्पियन आणि जोकोविचचे प्रशिक्षक गोरान इव्हानिसेव्हिक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.