धुळे – शहरानजीक असलेल्या लळींग धबधब्याच्या डोहात काल तीन युवक बुडाले होते. त्यातील दोन जणांचे मृतदेह सायंकाळी काढण्यात आले. परंतू एकाचा मृतदेह उशिरापर्यंत आढळून आला नव्हता. त्यामुळे एसडीआरएफच्या पथकाने आज सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरू केली. काही वेळातच तिसर्या युवकाचाही मृतदेह हाती लागला.
शहरातील तीन महाविद्यालयीन विद्यार्थी काल दि. 22 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास लळींग कुरणातील धबधबा पाहण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान धबधब्याच्या डोहाजवळ रोहित गिरासे याचा पाय घसल्याने तो डोहात पडला. तो पाण्यात बुडत असल्याचे पाहुन त्याला वाचविण्यासाठी शुभम प्रेमराज पाटील, प्रतिक शिंपी, पवन पाटील, शुभम चव्हाण हे पाण्यात उतरले होते. मात्र पाण्याच अंदाज न आल्याने तेही बुडू लागले. त्यामुळे एकाने दिलेल्या काठीच्याा आधाराने इतर बाहेर आले.
मात्र रोहित कोमलसिंग गिरासे (वय 19 रा. अंबाजी नगर, देवपूर, धुळे), शुभम प्रेमराज पाटील (वय 20 रा.पडासदळे ता. अमळनेर) आणि शुभम अनिल चव्हाण (रा अभियंता नगर, धुळे) हे तिघे खोल पाण्यात बुडाले.
त्यानंतर पोलिसांनी आणि आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी शोध मोहिम सुरू केली. सोमवारी सायंकाळपर्यंत शुभम गिरासे आणि रोहित पाटील यांचा मृतदेह सापडला. मात्र एकाचा मृतदेह आढळून आला नाही.
त्यामुळे जवानांनी आज सकाळी पुन्हा डोहात शोध मोहिम सुरू केली. त्यानंतर काही वेळात शुभम चव्हाण याचा मृतदेह सापडला. त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषीत केले.