Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकातील स्मशानभूमींची सुविधांअभावी अवस्था बिकट

नाशकातील स्मशानभूमींची सुविधांअभावी अवस्था बिकट

नाशिक | टीम देशदूत Nashik

शहरातील महानगरपालिकेच्या सर्वच स्मशानभूमींचे अद्ययावतीकरण बाकी असून निधीअभावी दुरुस्तीचे काम रखडलेले आहे. पार्किंग, वाहतूककोंडीमुळे स्मशानभूमीवर जाणार्‍या लोकांना सुविधा नसल्याने मरणानंतरचीही वाट बिकट असे म्हणण्याची वेळ आली आहे. स्मशानभूमींची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नाशिककर करत आहेत.

- Advertisement -

दफनविधीसाठी जागा अपुरी

जुने नाशिक

मागील दहा- वीस वर्षांमध्ये नाशिक शहराचा झपाट्याने विकास झाला. त्यामानाने शहराची लोकसंख्यादेखील वाढली असून यामध्ये मुस्लीम समाजाची संख्यादेखील वाढल्यामुळे समाजाला आता नव्या कब्रस्तानची गरज भासत आहे. सध्या जे कब्रस्तान आहे ते शेकडो वर्षे जुने आहे. त्यामुळे तेथे दफनविधीसाठी जागा अपुरी पडत आहे. वडाळा गावात सुमारे सहा एकर तर नानावली भागात सुमारे दीड एकर जागा कब्रस्तानसाठी राखीव असतानादेखील प्रशासनाने अद्याप दफनविधी करण्यासाठी ती जागा समाजाला दिलेली नाही. त्यामुळे समाजाकडून सतत मागणी होत असून ही जागा समाजाला मिळाल्यास दफनविधीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

नाशिक शहरात करोनाचा कहर असताना मृतांचा आकडा खूप वाढला होता. त्यानंतर शहरात मुस्लीम समाजाच्या ज्या जुन्या दफनभूमी (कबरस्तान) आहेत त्या पूर्ण भरल्या असून नवीन दफनविधीसाठी जागादेखील मिळत नाही. शासनाने त्वरित उपाययोजना करून ज्या ठिकाणी कब्रस्तानसाठी जागा आरक्षित आहे त्या जागा समाजाच्या हातात देऊन दफनविधीची परवानगी द्यावी, अशी मागणी मुस्लीम बांधवांनी केली आहे. कब्रस्तान जागेचा प्रश्न वेळीच न सोडवल्यास दफनविधी कोठे करावा, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. म्हणून प्रशासनाने कब्रस्तानासाठी राखीव जागा लगेच उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, मागील काही वर्षांत शेकडो मुस्लीम बांधवांचे मृत्यू झाले असून त्यांचे जुन्या नाशकातील विविध कब्रस्तानामध्ये दफनविधी करण्यात आले. मागील काही दिवसांपासून शहरातील जुन्या नाशकात व वडाळारोड परिसरात असलेल्या कब्रस्तानमध्ये सतत दफनविधी करण्यासाठी शव येत आहेत. तर दुसरीकडे जहांगीर मशीद कब्रस्तान, रसूलबाग कब्रस्तानमध्येदेखील अशीच स्थिती आहे. शहरातील खडकाळीतील रसूलबाग कब्रस्तान, चौक मंडईतील जहाँगीर कब्रस्तान, द्वारका येथील काझी कब्रस्तान, वडाळागावातील गौसीया मस्जिद कब्रस्तान येथे दफनविधीचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी आता जागा शिल्लक राहिली नसल्याचे चित्र आहे.

एकट्या जहॉगीर मशिद कब्रस्तान येथे मागील लॉकडाऊनच्या काळात जवळपास सहाशे जणांचे दफनविधी करण्यात आले होते. तर आता कब्रस्तानमध्ये जागा नसल्याने नवीन कबर खोदण्यास अडचणी येत आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता रिझवान खान यांनी दिली आहे.

दुरुस्ती मागणीला केराची टोपली

पंचवटी

पंचवटीतील स्मशानभूमीची गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय वाईट अवस्था झाली आहे. स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार सूचना देऊनही, मागणी करूनही प्रशासनाने सूचनांना व मागणीच्या पत्रांना केराची टोपली दाखवली आहे.

स्मशानभूमीत एकूण नऊ बेड बनवण्यात आले आहेत. त्यापैकी चांगल्या अवस्थेत फक्त चार बेड असून उर्वरित पाच बेडची दुरवस्था झाली आहे. शववाहिनीतून शव आणल्यानंतर बेडवर ठेवताना दोन्ही बाजूंनी फरशा निखळलेल्या असल्याने तोल सांभाळत शव ठेवावे लागते. अनेक वेळा नातेवाईकांना कसरत करावी लागते.

अग्निडाग दिल्यानंतर अस्थी काढण्यासाठी व्यवस्थित उतार नसल्याने व नळ सुरक्षित व व्यवस्थित नसल्याने हाताने राख गोळा करून त्यातून अस्थी गोळा कराव्या लागतात. पाण्याचा प्रवाह सुरळीतपणे जात नाही. त्यामुळे तेथील कर्मचारी व नातेवाईकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

अग्निडाग दिल्यानंतर श्रद्धांजली अर्पण केल्यावर नातेवाईक व आप्तेष्ट यांना घरी परतताना हातपाय, तोंड धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे; परंतु नळांची मात्र दुरवस्था झाली आहे. एका टाकीजवळ तीन नळ बसवण्यात आले होते. त्यापैकी एकच नळ शिल्लक राहिला आहे. दोन तुटलेल्या अवस्थेत आहेत तसेच दुसर्‍या बाजूने अतिशय निकृष्ट दर्जाचे नळ बसवण्यात आल्याने त्या ठिकाणी येणारी माणसे नळ चालू करतानाच ती लगेच तुटतात, अशी तक्रार करत आहेत. या परिसरात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे दिसून येतात; परंतु एकही सीसीटीव्ही कॅमेरा चालू अवस्थेत नाही.

सर्व वायरी तुटलेल्या अवस्थेत असल्याने सीसीटीव्ही फक्त दिसतात. तेही बंद अवस्थेत दिसून येत आहेत. सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे. तिचीदेखील दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर लोखंडी जाळ्या अनेक ठिकाणी तुटलेल्या आहेत. इलेक्ट्रिक दाहिनी बसवण्याचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून ऐकिवात आहे.

परंतु अद्याप कार्यवाही मात्र झालेली नाही. त्यामुळे पंचवटी परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेवटच्या क्षणी आपल्या माणसाला निरोप देताना सर्वांनाच अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते व त्रास सहन करावा लागत आहे. हे पंचवटीकरांच्या दृष्टीने अतिशय दुःखदायक आहे.

पंचवटीतील स्मशानभूमीतील अनेक बेड दुरवस्थेत आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. पाण्याचे नळ व्यवस्थित बसवण्यात यावेत. त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे दुरूस्त करण्यात यावे आणि येथील कर्मचारी वर्गासाठी बांधण्यात आलेल्या खोल्यांची तावदाने बसवण्यात यावीत.

– सुनीता पाटील

अजूनही अद्ययावतीकरण रखडलेले

नवीन नाशिक

विभागीय कार्यालयाच्या अखत्यारित सहा अमरधाम समाविष्ट होतात. यामध्ये मोरवाडी गाव, उंटवाडी, अंबड, कामटवाडे, पाथर्डी गाव, दाढेगाव या ठिकाणी अमरधामची सोय करण्यात आली असून यामध्ये सर्वात मोठे अमरधाम हे मोरवाडी गाव येथे असून, उंटवाडी येथील अमरधाममध्ये सध्या विद्युत दाहिनीचे काम सुरू आहे.

करोनाकाळात नवीन नाशिकमधील सर्वच अमरधाम हे 24 तास सुरू होते. तर मुस्लीम धर्मियांसाठी पाथर्डी गाव व खत प्रकल्पाजवळील दफनभूमी सुरू होती. सध्या येथे फक्त पाथर्डी गावाजवळील दफनभूमी सुरू असून उंटवाडी येथे लिंगायत व गोसावी समाजाची दफनभूमी असून महानुभाव व लहान मुलांसाठी मोरवाडी गावातील अमरधामशेजारील जागेत दफनभूमी आहे. यापूर्वी मोरवाडी अमरधाम येथे चार बेडची व्यवस्था होती. मात्र काही दिवसांपूर्वीच अजून दोन बेड वाढवण्यात येऊन त्यांची संख्या सहा झाली आहे.

कामटवाडे गावातील अमरधाम येथे जर कुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यविधीसाठी मोरवाडी अमरधाम येथून नऊ मण लाकूड,दोन पाट्या गोवर्‍या, एक माठ व पाच लिटर डिझेल दिले जाते. यापूर्वी उंटवाडी अमरधाममध्ये सोयीसुविधांचा अभाव होता. मात्र माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी करोना काळातील गरज लक्षात घेत या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करून देण्याकरता प्रशासनाकडे पाठपुरावा करत सदरहू अमरधाम कार्यान्वित केले.

आरक्षित जागा हस्तांतराअभावी पडून

सातपूर

सातपूर परिसरातील नागरिकांच्या अखेरच्या प्रवासासाठी चार अमरधामची उभारणी केलेली असून दोन कब्रस्तानाचे नियोजन केलेले आहे. अग्निडाग देण्यासाठीच्या चार स्मशानभूमीवर सुविधा बर्‍यापैकी असल्या तरी काही प्रमाणात प्राथमिक सुविधांचा अभाव दिसून येतो.

त्यात प्रामुख्याने विद्युत दिवे, सफाई, फुटलेल्या पायर्‍या, अग्निबेड परिसरातील उखडलेले काँक्रिट यांसारख्या किरकोळ दुरुस्त्या करण्याची गरज आहे. सातपूर स्वारबाबानगरातील अमरधाम परिसरात पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. त्यामानाने पिंपळगाव बहुला, गंगापूर व आनंदवल्ली भागात पार्किंग व्यवस्था आहे.

कब्रस्थानाचा प्रश्न गंभीर

सातपूर येथे रजविया मस्जिद व बारदान फाटा असे दोन जुने कब्रस्तान आहेत. त्या ठिकाणी जागाच राहिलेली नसल्याने नवीन जागेची मागणी केली जात आहे. या सोबतच परिसरातील लिंगायत व गोसावी समाजासाठी दफनभूमीची जागा नसल्याने नाशिक येथे दफन करावे लागते. त्यामुळे सातपूर परिसरात दफनभूमीची मागणी करण्यात येत आहे.

अधिग्रहण बाकी

सातपूर परिसरासाठी पिंपळगाव बहुला शिवारात साडेआठ एकरचा भूखंड माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या पाठपुराव्यामुळे 2016 साली आरक्षित करण्यात आला होता. नव्या शहर विकास आराखड्यात ती जागा निर्धारित म्हणून नोंदवण्यात आलेली आहे. मात्र जागामालकाला मोबदला मिळालेला नसल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

मनपाच्या माध्यमातून बारदान फाटा येथेही सुमारे साडेतीन एकरचा भूखंड आरक्षित करण्यात आलेला आहे. या दोन्ही जागा मनपाकडे वर्ग झालेल्या नाहीत. त्याचा मोबदला देणे किंवा त्यांना अतिरिक्त टीडीएस देण्यातून हा प्रश्न मार्गी लागू शकतो. प्रशासनाच्या स्तरावरून टीडीआरसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

पाच वर्षांपूर्वी या जागेवर नोंद झालेली असताना अद्याप मनपाने ती जागा ताब्यात घेतलेली नाही. मनपाने सदरची जागा तातडीने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सर्वधर्मियांचे अमरधाम उभारावे. यात लक्ष न देता टाळाटाळ केल्यास आगामी काळात इतरत्र दफन न करता शव मनपासमोर आणू.

– सलीम शेख, माजी सभागृह नेते

वीज, पाणी, पार्किंगच्या असुविधांमुळे मृत्यूनंतरही यातना कायम

नाशिकरोड

नाशिकरोड परिसरात असलेल्या विविध ठिकाणच्या स्मशानभूमीतील अपुर्‍या सुविधांमुळे मृत्यूनंतरही यातना कायम असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

नाशिकरोड परिसरात देवळाली गाव, विहितगाव, चेहडी, दसक, पंचक, नांदूर मानूर, आगरटाकळी या ठिकाणी महापालिकेच्या स्मशानभूमी आहेत तर विविध समाजाच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत. त्यामध्ये लिंगायत समाजाची त्याचप्रमाणे गोसावी समाजाची स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत मात्र अपुर्‍या सुविधा आहेत.

मृतदेह पुरल्यानंतर जागा मिळत नाही. त्यामुळे दुसरा मृतदेह आल्यानंतर तो पुरायचा कुठे? असा प्रश्न निर्माण होतो. लिंगायत समाजाची स्मशानभूमी देवळाली गाव येथे स्मशानभूमीशेजारीच आहे. दोन्ही स्मशानभूमी एकाच ठिकाणी आहे तर हिंदू समाजाची जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी येणार्‍या नागरिकांना बसण्यासाठी जागा व्यवस्थित आहे; परंतु शेजारीच असलेल्या स्मशानभूमीत जर एखादी अंत्ययात्रा आली तर तिथे बसण्यासाठी योग्य अशी जागा नाही. त्याचप्रमाणे काही ठिकाणी योग्य वेळी मृतदेहाला जाळण्यासाठी लवकर लाकडे मिळत नाहीत तर काही ठिकाणी पाण्याअभावी नागरिकांचे हाल होतात.

विहितगाव, चेहडी या ठिकाणी असलेल्या समशानभूमींमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे. या ठिकाणच्या फरशा मोठ्या प्रमाणात उखडल्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना उभे राहण्यासाठी अडचण होती. तसेच या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने नदीचे पाणी घ्यावे लागते. परंतु सध्या नद्या कोरड्याठाक झाल्या आहेत. त्यामुळे ऐनवेळेस पाणी मिळत नाही. स्मशानभूमीकडे जाणारे रस्तेसुद्धा खराब असल्याने या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

देवळाली गावात जाणार्‍या स्मशानभूमीकडे नागरिकांचे मोठे हाल होतात. सदरचा मार्ग एकेरी असल्यामुळे या रस्त्यावरून एखादी अंत्ययात्रा जर गेली तर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होते. त्यानंतर अंत्यविधी झाल्यावर पुन्हा नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तर अनेक स्मशानभूमींच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यावरच वाहने पार्किंग केले जातात.

त्यामुळे वाहतूक सर्व ठिकाणी विस्कळीत होते. काही स्मशानभूमीतील पथदीप रात्रीच्या वेळी बंद असतात. त्यामुळे या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरते. परिणामी रात्रीच्या वेळी गर्दुल्ले व भुरटे चोर येऊन बसतात तसेच अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना मोबाईलचा उजेड लावून प्रकाश निर्माण करावा लागतो. अशा अनेक सुविधा नसल्यामुळे अंत्यविधीसाठी येणारे नागरिक त्रस्त असून मृत्यूनंतरही स्मशानभूमीतील यातना कायम राहतात, असे बोलले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या