Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्यामनोरा आमदार निवासाचे आज भूमिपूजन

मनोरा आमदार निवासाचे आज भूमिपूजन

मुंबई |प्रतिनिधी

- Advertisement -

विधानभवनाच्या समोरील बहुप्रतिक्षित मनोरा आमदार निवासचे (Manora Amdar Nivas) आज, गुरुवारी भूमिपूजन होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सकाळी १० वाजता बांधकामाचा शुभारंभ होईल.

साधारणतः तीन वर्षात मनोरा आमदार निवासच्या नव्या इमारती उभ्या राहणे अपेक्षित आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आज विधानसभेत मनोरा आमदार निवासच्या बांधकाम शुभारंभाबद्दल माहिती दिली.

नरिमन पॉईंट (Nariman Point) येथील मनोरा आमदार निवासच्या इमारती धोकादायक बनल्याने त्याच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी जुलै २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले होते.

मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मनोरा पुनर्विकासाचे काम केंद्र सरकारच्या नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनकडून (एनबीसीसी) काढून घेऊन ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले. तसेच मनोरा आमदार निवासच्या इमारतीचा जुना आराखडा रद्द करून नवा आराखडा तयार करण्यात आला. वास्तुविशारद शशी प्रभू यांनी नवीन इमारतींचा आराखडा तयार केला आहे.

मनोरा आमदार निवासाच्या जागेवर पुनर्विकासाच्या माध्यमातून दोन टोलेजंग इमारती बांधण्यात येणार आहेत. यातील एक इमारत २८ मजली, तर दुसरी इमारत ४० मजली असणार आहे. १३ हजार ४२९.१७ चौरस मीटर भूखंड क्षेत्र असलेल्या आमदार निवास जागेवर ५.४ एफएसआयच्या अनुषंगाने प्रस्तावित बांधकाम बिल्टअप ७ लाख २१ हजार ९५६.०६ चौरस मीटर इतके असणार आहे.

त्यानुसार विधीमंडळाच्या सदस्यांसाठी आधुनिक स्थापत्य शैलीनुसार काळाच्या गरजा आणि वास्तूकलेचा वारसा यांचा संगम साधणाऱ्या मनोरा आमदार निवासात अत्याधुनिक सुविधा असतील. नव्याने तयार होणाऱ्या मनोरा आमदार निवासात प्रत्येक आमदाराला एक हजार चौरस फुटाची सदनिका मिळणार आहे.

या नवीन मनोरा आमदार निवासामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी एकूण ३६८ निवासस्थाने विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांसाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे विधिमंडळाच्या सर्व सदस्यांची एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणे शक्य होणार आहे. या इमारतीमधील प्रत्येक कक्षाचे क्षेत्रफळ साधारणतः १००० चौरस फूट प्रस्तावित करण्यात आले आहे. या दोन्ही इमारतींमध्ये ८०९ वाहने एकाचवेळी पार्क करता येतील या पध्दतीचे पोडीयम पार्किंग असणार आहे.

या ठिकाणी विविध स्तरावर स्वयंपाकगृहे, बहुपयोगी हॉल, प्रत्येक मजल्यावर कॉन्फरस रुम, व्हीआयपी लाऊंज, फिटनेस सेंटर, कॅफेटोरिया, बिझनेस सेंटर, बुक स्टोअर, लायब्ररी, क्लब हाऊस, मिनी थिएटर अशा आधुनिक सुविधा असणार आहेत. यासह आमदारांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या