सटाणा | प्रतिनिधी Satana
साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली पाडा विसरवाडी, ता. नवापूर हे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
अमली पाडा येथील पती पत्नी दुचाकी (एम एच ३९ ए एफ २८ ४०) वरून सटाणा येथून ताहाराबाद कडे जात असताना पाठीमागून येणार्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात संदीप गावित व त्याची पत्नी आशा गावीत हे गंभीररित्या जखमी होवून जागीच ठार झाले.
अपघातानंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले आहे. घटनेचे वृत्त समजताच सटाणा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई निंबा खैरनार व गणेश गरुड घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने एका खासगी रुग्णवाहिकेतून मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले.
सटाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातानंतर वाहनासह फरार झालेल्या चालकाचा शोध घेतला जात आहे.




