Friday, May 3, 2024
Homeअग्रलेखघरे लखलखली, मनेही उजळा

घरे लखलखली, मनेही उजळा

सगळीकडे दिवाळीच्या आनंदाचा माहोल आहे. घरे दारे आकाशकंदील, पणत्या आणि रोषणाईने उजळली आहेत. दसरा आणि दिवाळीच्या आधी घरादाराची लख्ख स्वच्छता करण्याची अघोषित परंपरा पाळली जाते. किंबहुना तसे लोकांनी करावे अशी पूर्वसुरींची अपेक्षा असणार. ‘स्वच्छता असे तिथे लक्ष्मी वसे’ असे समाज मानतो. वर्षातून एकदा तरी घराची साफसफाई करण्याचा संस्कार पिढीदरपिढी जाणीवपूर्वक पुढे नेला जात आहे. त्या स्वच्छतेमुळेही रोषणाईचा प्रकाश घराच्या कानाकोपऱ्यात फाकला आहे. त्या स्वच्छतेचे कितीतरी दिवस आधी नियोजन केले जाते. तुटक्या-फुटक्या वस्तू, गळकी आणि खराब झालेली भांडी, रंग जाऊन विटलेले कपडे, तुटलेले फर्निचर म्हणजे थोडक्यात अडगळ बाहेर काढली जाते. काढायलाही हवी. त्याशिवाय घर मोकळा श्वास घेऊ शकत नाही. तशी मनातील अडगळ देखील काढायला हवी. घराच्या स्वच्छतेइतकीच किंबहुना त्यापेक्षा थोडीशी जास्तच मनाची स्वच्छता महत्वाची आहे.

क्षणभर शांत बसून विचार केला तर मनात किती अडगळ साठली आहे हे कदाचित सुजाण लोकांच्या तरी लक्षात येऊ शकेल. वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य जगतांना कळत-नकळत मनात माणसे अनेक प्रकारचा कचरा साठवतात. वर्षानुवर्षे वैरभावना बाळगतात. अभिनिवेश आणि अस्मिता जोपासतात. द्वेष, चिंता, संताप, हतबलता, अती काळजी, दुःख, वियोग, भीती, अस्वस्थता, चंचलता, मत्सर, अहंकार, गर्व, अती घाई असे कितीतरी दुर्गुण माणसाच्या मनात ठासून भरलेले असतात. नातेसंबंधांतील ताणतणावाच्या गाठी सोडवण्याऐवजी माणसे त्या अधिकाधिक घट्ट करतात. म्हणूनच मन आजारी पडले की त्याचे एकूणच आयुष्यवर विपरीत परिणाम होतात. तथापि या दुर्गुणांची माणसांना इतकी सवय होते की ते दुर्गुण आहेत हेच पटेनासे होते. त्याला सहजभाव आणि स्वाभाविक मानले जाते. काळजी तर वाटतेच ना.. चिंता तर होतेच ना.. दुःख होणार नाही का.. माणूस आहे कधीतरी निराशा दाटेलच ना.. त्याने माझा अपमान केला मग राग येईलच ना.. असे त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने समर्थन देखील केले जाते.

- Advertisement -

त्यामुळे माणसांना निराश वाटू लागते. मन सतत कोणत्या ना विचारात व्यग्र आणि अस्वस्थ राहाते. हीच निराशा आणि अस्वस्थता वाढत गेली तर अनेकांना जगण्यात काही अर्थ नाही असे वाटू शकण्याचा धोका असतो. माणसे एककल्ली, एकलकोंडी होऊ शकतात. काही जण जगाचा नेहमीच रागराग करतात. त्यांना सद्गुण दिसणे अशक्य होऊ शकते. माणसे आणि समाजातील दोषच त्यांना जाणवू शकतात. यामुळे सहजभाव, संवेदनशीलता, सामाजिकता, समता, बंधुता, प्रामाणिकपणा, बांधिलकी, प्रेम, आपुलकी हा मूळ मानवी स्वभाव झाकोळतो. संकटे आणि आव्हानांचा सामना करण्याच्या क्षमतेचा विसर पडतो. तथापि जग आणि आयुष्य सुंदर आहे याची जाणीव माणसांना नव्याने होण्याची गरज आहे.

मन उजळायचे असेल तर, हे जग बदलायचे असेल तर विचार, कृती आणि भावनामध्ये शुद्धता यायला हवी. शुद्ध विचार करता आला तर गोष्टी सोप्या होऊ शकतात. जगणे सहज होऊ शकते. स्वतःविषयी असुरक्षिततेची भावना बाळगली नाही तर नकारात्कमकतेचा त्रास होत नाही. याशिवाय मन शुद्ध करण्याचे अनेक मार्ग समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकातून, संतांनी त्यांच्या साहित्यातुन, योगाचार्यांनी योगसाधनेतून सांगितले आहेत. त्यांचे श्रवण, मनन, चिंतन आणि अनुसरण करण्याची आवश्यकता आहे. जगणे सुंदर होण्यासाठी घराची बाह्य स्वच्छता तशी मनाची आंतरिक स्वच्छता अत्यंत गरजेची आहे. ती गोष्ट किती महत्वाची आहे हे सांगताना शांताराम आठवले लिहितात, जो वळखीतसे औक्ष म्हणजे मोटी लढाई, अन हत्याराच फुलवानी घाव भी खाई, गळ्यामंदी पडल त्याच्या माळ इजयाची, तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची, मन सुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची.. यातील मर्म माणसे लक्षात घेतील का?

- Advertisment -

ताज्या बातम्या