नंदन रहाणे
भारतीय उपखंडात अक्षरश: हजारो तीर्थक्षेत्रे आहेत. सगळीकडे भक्तभाविकांची रीघ सतत लागलेली असते. पण हा असा महासोहळा कुठेही होत नाही! पालख्यांचे आपापल्या क्षेत्रातून निघणे, ठरलेल्या मार्गाने शेकडो किलोमीटरची वाटचाल शिस्तीने करणे, त्यांचे मुक्काम, जागोजागी होणारी उभी व गोल रिंगणे, रस्त्यांवरच्या गावात होणारी स्वागते हे एक विराट महानाट्य असते आणि त्याचा रंगमंच म्हणजे हा आपला महाराष्ट्र असतो… जळगावपासून बेळगावपर्यंत आणि पालघरपासून गडचिरोलीपर्यंत असे एकही मराठी गावखेडे नाही की जिथला एक तरी वारंकरी आषाढीला पंढरीस पोचत नाही!
बरं, जे 12-15 लाख लोक पंढरपुरात गोळा होतात. त्यांना तरी पांडुरंगाचे दर्शन होते काय? 3-4 लाख भक्तांनांच ते साध्य होते, बाकीचे भाविक नुसत्या कळसाचे दर्शन घेऊन माघारी फिरतात. मात्र, गावी पोचले की त्यांची चरणधूळ मस्तकी घेण्यासाठीही ग्रामस्थ गर्दी करतात इतका महिमा आषाढीच्या वारीचा आहे..
चला… आपणही एक भावदिंडी काढूया! ज्येष्ठ वद्य प्रतिपदेपासून ते आषाढ पौर्णिमेपर्यंत, दररोज संताच्या एकेका अभंगापाशी मुक्काम करु या! त्यांच्या शब्दांतील रसगंगेत स्नान करुन तृप्त होऊ या! कुठल्याही गोष्टींचा प्रारंभ करायचा असला की पहिल्यांदा गणपतीचे स्मरण करावे लागते.
ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी माऊलींनी आणि भागवताच्या सुरुवातीला नाथरायांनी गजाननाला वंदन केले आहे. आद्यसंत असलेल्या नामदेव महाराजांच्या अभंगगाथेचा आरंभही मंगलाचरणाच्या अभंगानीच झालेला आहे. लगोलग बालक्रीडेचे वर्णन सुरु होते. तिथे पहिलाच अभंग गणपती बाप्पांना उद्देशून आहे. त्यांना कृष्णाची, विठ्ठलाची कीर्ती वर्णन करायची आहे. त्यासाठी गणरायाने स्फूर्ती द्यावी, असे त्यांचे मागणे आहे –
चौदा विद्या तुझे कृपेने येतील।
मुके बोलतील । वेदघोष ॥1॥
भक्तवत्सला ऐके पार्वतीनंदना ।
मस्तक चरणा । ठेवीतसे ॥2॥
तुज लंबोदरा शोभे शुंडा दंड ।
करीतसे खंड । दुश्चिन्हांचा ॥3॥
चतुर्भुज आयुुधे बहु शोभताती ।
भक्तां रक्षिताती । निरंतर ॥4॥
नामा म्हणे आता देई मज स्फूर्ती ।
वर्णितसे कीर्ती । विठ्ठलाची ॥5॥
हे गजवंदना, तु सकल ज्ञानाचा स्वामी आहेस. तुझी कृपा झाली की 14 विद्या अडाण्यालाही वश होतील. फार काय सांगू… जे जन्मत: मुके आहेत ते देखील वेदांमधल्या ऋचांचा घोष करु लागतील. पार्वतीच्या सुपुत्रा, मी तुझी स्तुती करीत आहेत. ती ऐकून माझ्यावर कृपा कर. मी तुझ्या पायावर श्रद्धेने डोके टेकवून तुला वंदन करतो आहे, हे देवा, तुझे पोट खूपच मोठे आहे, कारण त्यात ब्रह्याण्डे सामावली आहेत. एखाद्या दंडासारखी तुझी सोंड भक्कम आहे आणि ती जे जे काही अशुभ आहे, दुरित आहे, त्यांच्या चिन्हांचा नाश करीत आहे. तुझे 4 हात व त्यातील शस्त्रास्त्रे खूपच शोभून दिसतात. त्यांच्यामुळे भक्तांचे नेहमीच रक्षण होते. नामदेव महाराज म्हणतात, हे गणेशा, तू मला आता स्फूर्ती दे, माझी प्रज्ञा जागव आणि प्रतिभेला भरती येऊ दे… मला विठ्ठलाचा महिमा वर्णन करायचा आहे!
या अभंगात 14 विद्यांचा संदर्भ आला आहे, जशा कला 64 मानल्या जातात तशाच विद्या 14 आहेत असे उल्लेख प्राचीन ग्रंथामधून आढळतात. त्या 14 विद्या कोणत्या? तर ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे 4 वेद, छंद, शिक्षा, व्याकरण, ज्योतिष, कल्प व निरुक्त ही 6 वेदांगे आणि न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्रे 4 मिळून 14 विद्या होतात. हे सर्व संस्कृत ग्रंथ होेते व सामान्य माणसाला तर संस्कृत शिकण्याची अन् वेद ऐकण्याचीही परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत सर्व समाजच मुका होता! नामदेवराय हे अशा ज्ञानवंचित वर्गातलेच एक… पण त्यांनी वेदघोष करण्याची आकांक्षा मनात धरली होती! पोथ्यापुराणे ऐकुन जे ज्ञान त्यांनी मिळवले ते मराठी भाषेत अभंगांद्वारे त्यांनी व नंतरच्या सर्व संतांनी प्रकट केले. आज महाराष्ट्र या मराठी संतवाङमयाला वेदांप्रमाणे पूज्य मानतो!




