Friday, November 22, 2024
HomeनाशिकMaharashtra Assembly Elections: मालेगाव बाह्यच्या निकालाची उत्कंठा शिगेला

Maharashtra Assembly Elections: मालेगाव बाह्यच्या निकालाची उत्कंठा शिगेला

मालेगाव | हेमंत शुक्ला
राजकीयदृष्ट्या जिल्ह्यात संवेदनशील अशी ओळख ठेवून असलेल्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात यंदा ‘हाय व्होल्टेज’ तिरंगी लढत रंगली. पालकमंत्री दादा भुसे यांचा विजयाचा पंच रोखण्यासाठी उबाठा शिवसेना उपनेते अद्वय हिरे तसेच भुसे यांचे पूर्वाश्रमीचे जवळचे सहकारी बंडुकाका बच्छाव हेदेखील ताकदीनिशी रिंगणात उतरल्याने यंदाची लढत अत्यंत चुरशीची झाली. तसेच मतदानदेखील विक्रमी नोंदवले गेल्याने निकालाकडे जिल्हाच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.

मालेगाव बाह्य मतदारसंघात १ लाख ९८ हजार १९१ पुरुष तर १ लाख ८२ हजार ३७६ महिला व इतर नऊ अशा ३ लाख ८० हजार ५७६ मतदारांपैकी महिला १ लाख २२ हजार ८७६ व पुरुष १ लाख ३४ हजार १८१ व इतर १ अशा २ लाख ५७ हजार ५८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क ३५१ केंद्रांवर बजावला. गत पंचवार्षिक निवडणुकीत ३ लाख ४० हजार ९११ इतके मतदार होते. त्यात नवीन ३५ हजार ३४६ मतदारांची भर पडली आहे. हे नवमतदार कुणास कौल देतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

- Advertisement -

गत पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे दादा भुसे यांनी मताधिक्क्य घेत विजयाचा चौकार मारला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे डॉ. तुषार शेवाळे यांचा पराभव केला होता. सेना-भाजप महायुतीच्या भूसेंविरोधात हिरेंसह सर्व विरोधक एकवटले असतानादेखील भुसे यांनी जनसंपर्क व विकासाच्या मुद्यावर यश संपादन करत तालुक्यावर प्रभुत्व सिद्ध केले होते.

या निवडणुकीतदेखील जनसंपर्कासह रस्ते, गिरणा-मोसम नदीवरील बंधारे, महिला बाल रुग्णालय, कृषी विज्ञान संकुल, नार पार योजनेस मंजुरी, ७१ हजार निराधारांना सुरू केलेला पगार, पोखरा योजना, कामगारांना साहित्यवाटप इत्यादी विविध विकासकामांची जोड देत भुसे पुन्हा पाचव्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. विविध समाजाचे आर्थिक विकास महामंडळ राज्य सरकारने स्थापन केले. या पार्श्वभूमीवर भुसे यांचा समाजांनी स्वयंस्फूर्तीने मेळावे घेत सत्कार केला होता. त्यामुळे सर्व समाजात आपली विकासाची भूमिका मांडण्याची संधी भुसे यांना मिळाली होती. जनसंपर्काच्या जोरावर गावागावांत त्यांनी केलेल्या प्रचाराच्या योग्य नियोजनामुळे महायुतीचा झंझावात तालुक्यात दिसून आला होता.

भुसे पुन्हा विजयी झाल्यास त्यांना कॅबिनेट मंत्रिपदच मिळणार असल्याने त्याचा लाभ शहरासह तालुक्याला मिळेल या जनमानसात रुजलेल्या भावनेचादेखील त्यांना लाभ मिळाल्याचे दिसून आले आहे. प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या सभा झाल्या; परंतु संपूर्ण प्रचाराचा किल्ला भसे यांनी एकहाती लढवला होता. त्यांच्या व पत्नी अनितामाई भुसे, पुत्र अजिंक्य व आविष्कार यांच्या प्रचार रॅलींनादेखील अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता. यामुळे शहरासह तालुक्यात झालेले अभूतपूर्व मतदान भुसे यांचा विजय निश्चित करणारे असल्याचा विश्वास समर्थक व कार्यकत्र्यांना असल्याने मतदान होताच त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

भुसे यांचा विजयी रथ रोखण्यासाठी शिवसेनेत बंड होऊन राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर उमेदवारीचा धोका ओळखून अद्धय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित झाली. हिरेंनी महाविकास आघाडीची मोट बांधत तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या बाजार समितीत एकतर्फी विजय मिळवत भुसे समर्थकांची सत्ता संपुष्टात आणली. मात्र जिल्हा बँक थकितप्रकरणी दाखल गुन्ह्यात त्यांना आठ ते नऊ महिने तुरुंगवास सोसावा लागला. उच्च न्यायालयातून जामिनावर सुटताच हिरे यांनी तालुका भ्रष्टाचार व भयमुक्त करण्यासाठी भुसेंचा पराभव करण्याची शपथ घेतली व ती पूर्ण करण्यासाठी ते निवडणुकीच्या मैदानात उतरले व त्यांनी निकृष्ट विकासकाम व भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भुसेंविरुद्ध तोफ डागली. हिरे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेत्या सुषमा अंधारे व खासदार अरविंद सावंत यांच्या सभा घेण्यात येऊन वातावरण निर्मिती केली गेली.

भुसे हिरे या पारंपरिक लढतीत बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक बंडुकाका बच्छाव यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरत सभा घेत भुसे व हिरेंविरुद्ध टीकास्त्र सोडताना आपल्या दहा वर्षांच्या समाजकार्याची माहिती जनतेसमोर ठेवली. बच्छाव यांना भाजप नेते सुनील गायकवाड यांनी भुसे यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचे आरोप करत समर्थकांसह समर्थन दिले. यामुळे ही निवडणूक तिरंगी व रंगतदार झाल्याचे दिसून आले.

भुसे यांच्याविरोधात दंड थोपटताना बच्छाव यांनी भुसे विरोधातील नेते, पदाधिकाऱ्यांची मोट बांधली. सुनील गायकवाड, निखिल पवार, गुलाब पगारे आदी नेत्यांनीदेखील सभा घेत भुसे व हिरें विरुद्ध टीकेची तोफ डागत निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. भुसे-हिरे व बच्छाव या तिघा मातब्बर उमेदवारांमुळे निवडणूक चुरसपूर्ण झाली. भुसे हे पाचव्यांदा निवडणूक लढवत असले तरी अद्वय हिरे व बंडुकाका बच्छाव प्रथम तालुक्यात स्वतःसाठी नशीब आजमावत आहेत. तिघांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने तसेच अभूतपूर्व मतदान झाले असल्याने कोण विजयी होतो याची उत्कंठा मतदारांमध्ये शिगेला पोहोचली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या