Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याजुनी पेन्शन लागू होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न : तांबे

जुनी पेन्शन लागू होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न : तांबे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यभरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी व नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शासकीय व निमशासकीय सेवकांना 2005 पूर्वीची जुनी पेन्शन योजना ( Old Pension Scheme )लागू करावी यासाठी आपला प्राधान्याने लढा आहे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित तांबे ( Nashik Graduate Constituency Candidate Satyajit Tambe)यांनी केले आहे.

- Advertisement -

नाशिक येथे शिक्षक व पदवीधर कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी तांबे बोलत होते. राज्यभरात सुमारे 17 लाख कर्मचारी पेन्शन योजनेपासून वंचित आहेत. या सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मागणी न्याय आहे. यासाठी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत स्वतंत्र अभ्यासगट निर्माण करावा, अशी मागणी प्रत्येक वेळी त्यांनी अधिवेशनात केली. जुन्या पेन्शन योजनेबाबत विधिमंडळात सातत्याने आग्रही मागणी केली आहे, असे तांबे म्हणाले.

सरकारने लागू केलेल्या नवीन पेन्शन योजनेमध्ये ग्रॅच्युटी, फॅमिली पेन्शन योजनेचा समावेश नाही. या योजनेबाबत सर्व कर्मचार्‍यांमध्ये साशंकता आहे. देशभरात छत्तीसगड, हिमाचल प्रदेश ,राजस्थान ,पंजाब या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. छत्तीसगडसारखे छोटे राज्य पेन्शन योजना लागू करू शकते तर महाराष्ट्र का नाही? म्हणून याबाबत आपण तज्ञ लोकांचे शिष्टमंडळ घेऊन छत्तीसगड व राजस्थान येथील पेन्शन योजनेचा अभ्यास करून तो अहवाल शासनाकडे देऊ. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनाला भाग पाडू, असे तांबे यांनी सांगितले.

राज्यभरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी व नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे. याचबरोबर 2005 पूर्वी जे कर्मचारी अनुदानावर नव्हते व त्यांना नंतर अनुदान मिळाले त्यांनी अनेक वर्ष विनावेतन काम केले आहे. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे न्याय ठरणार आहे. त्यातील काही अनुदानित शाळांमधील तुकड्या अंशतः अनुदानावर होत्या. या कर्मचार्‍यांनादेखील जुनी पेन्शन योजना लागू करावी, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. या निर्णयाला अनुसरून शासनाने निर्णय केला पाहिजे, असेही तांबे यांनी म्हणाले.

आ. डॉ. तांबे यांच्याकडून पाठपुरावा

राज्यभरातील सर्व शासकीय-निमशासकीय कर्मचार्‍यांना 2005 पूर्वीची पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सातत्याने विविध मोर्चे,आंदोलने यात सहभाग घेतला. विधानपरिषदेत आवाज उठवून शासन दरबारी कायम पाठपुरावा केला आहे.

योजनेसाठी अभ्यास गट

राजस्थानचे मुख्यमंत्री व छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. या राज्यांनी लागू केलेल्या जुन्या पेन्शन योजनेबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी राज्यातील तज्ञ मंडळींचा अभ्यास गट तेथे घेऊन जाऊ. या योजनेबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून शासनाला ही योजना लागू करण्यात भाग पाडू.

- Advertisment -

ताज्या बातम्या