नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik
टपरी चालकाशी सिगरेटच्या पैशाच्या वादानंतर जखमी झालेल्या मद्यपीचा उपचारानंतर घरी गेल्यावर मृत्यू झाल्याची घटना घडली मात्र त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबत शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजे संभाजी स्टेडियमच्या मागील बाजूस रस्त्याच्या कडेला असलेल्या अपंग टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे (५९ रा. शिवपुरी चौक) यांची टपरी आहे. बुधवारी (दि. २ एप्रिल) दुपारी दीड वाजेच्या दरम्यान विशाल भालेराव ( ५०) हे मद्यधुंद अवस्थेत सोनवणे यांच्या टपरीवर आले . यावेळी १० रुपयाची सिगारेट ११ रुपयाला दिली याचा राग आल्याने भालेरावने टपरी चालक सोनवणे यांना शिवीगाळ करीत टपरीतील साहित्याची नासधूस केली.
यावेळी टपरी चालकाने भालेरावला काठीच्या सहाय्याने मारहाण केली त्यात भालेरावच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना त्यास खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले त्यानंतर घरी जाऊन आराम करत असतांना त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेत नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी टपरी चालक बापू सोनवणे यांना ताब्यात घेतले आहे.