धुळे, Dhule (प्रतिनिधी)
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर (Palasner) येथील अपघात ही अतिशय दुदैवी घटना आहे. या अपघातात 10 व्यक्तींचा मृत्यु झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 15 जण येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तर 3 जण सिध्देश्वर हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
या जखमींची आज संध्याकाळी राज्याचे ग्रामविकास पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांनी रुग्णालयात जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच नातेकांना धीर दिला. पळासनेर येथे कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने आज सकाळी अपघात झाला आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये वाहनचालक, क्लिनरसह शाळकरी मुलांचाही समावेश असून मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासनामार्फत उपचार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.
जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात येणार असून या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांचेसमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अशि्वनी पवार, महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अधिष्ठाता डॉ अरुण मोर्य, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, अनुप अग्रवाल आदि उपस्थित होते.