मुंबई । प्रतिनिधी Mumbai
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना ‘युनेस्को’चा ‘जागतिक वारसा’ दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झाले.
शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना ‘जागतिक वारसा’ दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण या दौर्यात करण्यात येईल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारशाचे महत्त्वही अधोरेखित होईल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भू प्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्को’च्या ‘जागतिक वारसा’ स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांत रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. याबाबतचे सादरीकरण पूर्ण क्षमतेने प्रभावीपणे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार शिष्टमंडळ पॅरिसला गेले आहे.
महाराष्ट्र सरकारचे चार सदस्यांचे शिष्टमंडळ 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत पॅरिसला असणार आहे. शिष्टमंडळात शेलार यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तूविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे. ‘युनेस्को’च्या ‘जागतिक वारसा’ स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास, या किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सोबतच सांस्कृतिक वारशाचे जतन सुनिश्चित होईल, असे शेलार यांनी सांगितले.
प्रस्तावातील बारा किल्ले
‘जागतिक वारसा’ स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी युनेस्को’ला सादर केलेल्या प्रस्तावात रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला व तमिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.