सध्या महाराष्ट्रातील बरेच शेतकरी फूल शेतीकडे वळत आहेत. फुलांच्या अनेक वेगळ्या प्रकारच्या जातींची लागवड केली जाते. परंतु, मोगरा शेती हा फूल शेतीतील शेतकर्यांना उत्तम प्रकारचा पर्याय आहे. या परिस्थितीचा साकल्याने विचार करत नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील श्रीमंत आदिवासी सेंद्रिय शेतकरी गटाने मोगरा शेतीचा प्रयोग प्रत्यक्षात आणला आहे. या गटात शेकडो आदिवासी शेतकरी समाविष्ट झाले असून मोगरा शेतीतून त्यांना श्रीमंत होण्याची जणू वाटच सापडली आहे, अशी भावना आदिवासी शेतकरी बांधव व्यक्त करत आहेत.
या शेतकर्यांकडून हातसडी तांदूळ, ब्राऊन तांदूळ, इंद्रायणी, नागली, गहू, वरई, भगर, कुळीद, उडीद, दाळ, आंबा आदी पिके सेंद्रिय पद्धतीने पिकविण्याचे काम आधीपासून होत आहे. जिल्ह्यात अन्नधान्य, फळे, भाजीपाला उत्पादन विपूल आहे. त्यातून जादा भाव किंवा नफा मिळणे अवघड आहे. हे जाणून गटाने मोगरा फुलशेतीचा अभ्यास केला. इतर पिकांच्या तुलनेत ती फायदेशीर ठरू शकते, हे लक्षात घेत मोगरा रोपे लागवडीचा मार्ग स्वीकारल्याचे श्रीमंत शेतकरी गटाचे अध्यक्ष यशवंत गावंडे यांनी सांगितले.
पेठ तालुक्यात आदिवासी शेतकर्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली एक गुंठा ते अर्धा एकरांपर्यंत मोगरा लागवड केली आहे. नाशिक बाजारपेठेत गणेशोत्सव ते लग्नसराईपर्यंत मोगर्याला चांगला दर मिळतो. फुलशेतीमुळे आदिवासी शेतकर्यांच्या जीवनात अर्थकारणाचा सुगंध दरवळू लागला आहे.
सन 2016 मध्ये श्रीमंत आदिवासी सेंद्रिय शेतकरी गटातील सदस्यांनी पारंपरिक पिकांना पर्याय जाणून घेण्यासाठी जव्हार येथील मोगरा फुलशेतीचा अभ्यास केला. इतर पिकांच्या तुलनेत ती फायदेशीर ठरते, हे लक्षात घेत मोगरा लागवडीचा मार्ग स्वीकारला. गटाने इच्छुक शेतकर्यांची नोंदणी करून मोगर्याच्या ‘बेंगलोर’ जातीची रोपे उपलब्ध करून दिली. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असल्याने किमान एक गुंठ्यापासून ते जास्तीत जास्त 20 गुंठ्यांपर्यंत मोगरा लागवड शेतकर्यांनी केली आहे.
मोगरा शेतीचा प्रयोग गटाच्या कार्यक्षेत्रातील 20 गावांत करण्यात आला असून, शेकडो शेतकर्यांनी यामध्ये सहभागी आहे. मोगरा फुलशेती आदिवासी शेतकर्यांना श्रीमंत करण्याच्या मार्गावर आहे. कृषी विभागाचे पाठबळ कृषी विभागाच्या मदतीने श्रीमंत आदिवासी सेंद्रिय शेतकरी गटाने मोगरा लागवडीसाठी शेतकर्यांना प्रोत्साहित केले.
मोगरा उत्पादक गावे
पेठ तालुक्यातील शिंगदरी, गायधोंड, गावंधपाडा, आड, शिंदे, पातळी, उभी धोंड, करंजाळी, गांगुडबारी, गडदुणे, उस्थळे, जांबविहीर, हरणगाव, निरगुडे, खरपडी, देवगाव, कोहोर, गोंदे, जळीतहोड आदी गावांमध्ये मोगरा शेती आहे.
...अशी आहे बाजारपेठ
मोगर्याचा दर हा दादर, मुंबई बाजारावर अवलंबून असून त्याप्रमाणे नाशिकमध्ये दर निघतो. नाशिकच्या बाजारात मोगरा कळी दुपारी 12 वाजेच्या आत पोहोचविली तर दर चांगला मिळतो. त्यामुळे शेतकरी त्यानुसार नियोजन करतात. दैनंदिन दर बदलत असले तरी मागणी वाढल्यास दर टिकून राहतो. पेठ तालुक्यातील शेतकर्यांना मोगरा विकण्यासाठी नाशिक, मुंबईसह गुजरातमधील सुरत मार्केट जवळ आहे. मात्र नाशिक बाजारात विक्रीला शेतकर्यांची पसंती आहे. गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी लग्नसराई हा मुख्य बाजाराचा काळ असतो.
विक्रीचे आदर्शवत नियोजन
येथील प्रत्येक शेतकर्याचे क्षेत्र मोजके आहे. त्यामुळे दररोज निघणार्या मोगर्याच्या कळ्या मोजक्या प्रमाणात निघतात. त्यामुळे प्रत्येक शेतकर्याला या कळ्या विक्रीसाठी शहरात नेणे परवडणारे नाही. यावर गटाने सामूहिक विक्रीचा तोडगा शोधला. मोगरा उत्पादक शेतकरी तोडलेल्या कळ्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या करंजाळी गावात आणतात. प्रत्येक जण आपला माल मोजून गटाकडे जमा करतो. सर्वांकडून संकलित झालेल्या मोगर्याच्या कळ्या गटातील एक शेतकरी नाशिक शहरातील फुलबाजारात विक्रीसाठी नेतो. बाजारात जो दर मिळेल, त्याआधारे प्रत्येकाला वजनाप्रमाणे पैसे दिले जातात.
असे असते अर्थकारण
मोगरा शेतीबाबत यशवंत गावंडे म्हणाले की, रोपाची लागवड केल्यानंतर 8 ते 10 वर्षे उत्पादन मिळते. वर्षभरात सलग आठ महिने मोगर्याचा हंगाम असतो. चांगले पीक व्यवस्थापन केल्यास मोगर्याच्या एका झाडापासून दररोज 100 ते 150 ग्रॅम कळ्या मिळतात. झाडे सशक्त करण्यासाठी अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा ठेवणे महत्त्वाचे असते. 500 रोपांची लागवड असणार्या शेतकर्याला दररोज 10 किलो कळ्यांचे उत्पादन मिळते. किमान दर मिळाला तरी भाजीपाला, इतर पिकांच्या तुलनेत मोगरा शेती फायदेशीर ठरली आहे. छाटणीवर आगामी उत्पादन अवलंबून असते. बहर चांगला असल्यास प्रति झाड 100 ग्रॅमपर्यंत कळ्या मिळतात. एकरी दररोज सरासरी 20 किलो उत्पादन अपेक्षित असते. मात्र त्यासाठी फुले तोडणी व संबंधित कामांसाठी किमान दहा जण लागतात. ऑगस्ट ते जूनपर्यंत मागणीनुसार प्रति किलोस सरासरी 200 ते 1200 रुपयांपर्यंत दर मिळतो.
असे मिळते उत्पादन
तोडणी-दररोज सकाळी 7 ते 9 पर्यंत, फुले संकलन-सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत, बाजारात पुरवठा- 12 वाजेपर्यंत. प्रति झाड उत्पादन-50 ते 150 ग्रॅम कळ्या, प्रति किलो सरासरी दर-200 ते 1200 रुपये, एक झाडाचा उत्पादन कालावधी -10 ते 12 वर्षे, हंगाम-वर्षभरात सलग 8 महिने, सण-उत्सवाला मागणीत वाढ. गणेशोत्सवापासून मोगर्याची मागणी वाढते. ढगाळ वातावरणात उत्पादन कमी, तर मोकळ्या सूर्यप्रकाशात उत्पादन वाढते. मोगर्याचा उपयोग गजरे, माळनिर्मितीसाठी होतो. त्यानुसार श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, लग्नसराई यांसह इतर सण-उत्सवाच्या काळात अधिक उठाव असतो.
कमी पाण्यात शाश्वत उत्पन्न
मोगरा शेती हा फूल शेतीतील शेतकर्यांना उत्तम प्रकारचा पर्याय आहे. मोगरा शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे, हे पीक एकदा लावले तर कमीत-कमी नऊ ते दहा वर्षे याचे उत्पादन घेता येते. कमी पाण्यात शाश्वत उत्पन्नाचा मोगरा हमखास मार्ग आहे. मोगरा फुलाला बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळे भावही चांगला मिळतो. जर मोगर्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला तर उत्तम. कारण मोगर्याची एकदा लागवड केली तर ते कमीत-कमी दहा वर्षांपर्यंत उत्पन्न देते. त्यामुळे ठिबक सिंचन करता फक्त एकदाच खर्च करावा लागतो. रोपांचा आणि जमीन मशागतीचा खर्च पहिल्याच वर्षी येतो. परत-परत खर्च करायची वेळ येत नाही. त्यामुळे मोगर्याची शेती एक किफायतशीर शेती म्हणता येईल.मोगर्याचा उपयोग मोगर्यापासून विविध प्रकारचे तेलही बनवले जातात. याचा उपयोग अनेक प्रकारचे शाम्पू, साबणात केला जातो. मोगर्याचे झाड साधारणतः 10 ते 15 फूट वाढते. मोगरा हिवाळ्यात बहरतो. मोगर्याची फुले ही बरेच काळ टवटवीत राहतात अगदी उष्ण हवामानात सुद्धा. यासह मोगर्याचा उपयोग औषधी गोष्टीसाठीही होतो. जखम झाली असेल किंवा खरचटणे किंवा फोड आल्यास त्यावर केल्याने त्वरित आराम मिळतो.
विजय गिते