दिवाणखाना सजवण्याच्या साहित्यांमध्ये हल्ली झाडांचे महत्व वाढू लागलेले आहे. विविध जातीच्या रंगांच्या पाना फुलांच्या कुंड्याच्या माध्यमातून सजावटीकडे कल वाढत आहे. फुलांची झाड असो किंवा शोभेची, लकी बांबू असो बहुतांश घरात त्याबद्दलचे आकर्षण प्रामुख्याने दिसू लागले आहे
घरात झाडे लावणे हे जितके आनंदाचे आणि उत्साहाचे प्रतीक आहे. तितकेच या झाडाची जोपासना करणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे काम आहे. घरात झाडे लावणे व त्यांची जोपासना करणे यासाठी खर्या अर्थाने मेहनत करावी लागते. झाडे घराची शोभा वाढवतात हे खरे असले तरी ती सुदृढ आणि सुरेख असली तरच सुंदर वाटतात. अन्यथा मरगळलेली किंवा पानझडीला सामोरे जाणारी झाडे ही अल्पावधीत अडगळीची होऊ लागतात.
ही झाडे अथवा बाग टवटवीत ठेवण्यासांठी काय करावे तर आपण आणलेली झाडे ही कमी उन्हाची आहेत किंवा नाही? सावलीत ठेवल्यास जगतील कां? याचा अभ्यास करायला हवा. कोणत्याही जातीचे झाड घरात वाढवायचे असेल तर त्याला आठवड्यातून एकदा मशागतीसाठी उन्हात ठेवावेच लागतात.त्याचे प्रत्येक पान स्वच्छ धुवावे, माती स्वच्छ करावी, घट्ट झालेली माती कोरून भूसभूशीत करावी, त्या मातीला गरज असणार्या खतांचा अर्थात शेणखत व गांडूळ खतांचा शिडकावा करावा,
प्रत्येक पानाला स्वच्छ पाण्याने पुसून झाडाला मुबलक पाणी देऊन किमान एक दिवस पूर्ण ऊन दाखवणे गरजेचे आहे. असे आठ दिवसांतून एकदा करणे गरजेचे आहे. फूल झाडे असतील तर त्यांच्या एका बहरानंतर शेंडा कापावा. अन्यथा फुलांनी डवरलेलं झाड देखील अल्पावधीत मरगळलेले दिसू लागेल.
इंडोअर झाडांचे प्रकारात प्रामुख्याने प्रामुख्याने आरेका पाम, स्नेक प्लांट, जामीचा पाम, जेट प्लांट, लकी बांबू, रेडमचेरा, अँग्लोनिमा, साँगऑफ इंडिया, ग्राफिक्स, करेल, जनाडू, डायफाम, देखिया बिकिया, यासारख्या तीस ते पस्तीस जातीच्या झाडांची लागवड करता येते त्यासोबतच नागफणी, बालस, निरेनियम, हायड्रोपोनिया याच्ंयासह फूल झाडांची ही मागणी मोठ्या प्रमाणात होत असते.
हल्ली घराची बाल्कनी असो किंवा टेरेसच्या छताचा पाईपला हँगिंग कुंड्या लावल्या जातात. त्यात प्रामुख्याने फिलिया, मनी प्लांट, सिसकोलिया, सिडम, जेट प्लांट, ऑफिस टाईम यासारखी झाडे लावली जातात. फूल झाडांमध्ये भारतीय बनावटीची विविध जातीची फूलझाडे विशेष पसंत केली जातात. त्यात गुलाबाच्या दहा ते बारा जाती, मोगर्याच्या चार ते पाच प्रकार, परसबाग असेल तर चार ते पाच प्रकारचे चाफा विशेष करून नागरिक पसंत करीत आहेत
एकदा झाड आणले झाड लावले म्हणजे ते आपोआप वाढते ही कल्पना करणे चुकीचे आहे. त्याच्या मशागतीकडे लक्ष दिल्यास छोट्या घरातही मोठ्या जिवंत उद्यानाचा आनंद घेता येणे सहज शक्य होणार आहे
रवींद्र केडिया