धुळे – Dhule – प्रतिनिधी :
येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोवीड सेंटरमधून कोरोनाची बाधा झालेली 55 वर्षीय वृध्द महिला अखेर जुन्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये सापडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून या महिलेचा शोध सुरु होता. मंगळवारी रात्री उशिरा याबाबत खात्री झाल्याने तिचे नातेवाईक व रुग्णालय प्रशासनाचा जीव भांड्यात पडला.
पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथील 55 वर्षीय महिलेला मधूमेहाचा आजार असल्याने तिचा धुळ्यातील एका खासगी डॉक्टरकडे उपचार सुरु आहे. नेहमीप्रमाणे ती धुळ्यात तपासणीसाठी आली असता यावेळी या महिलेला कोरोनाची चाचणी करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे 6 ऑगस्ट रोजी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात स्वॅब दिल्यानंतर दुपारी याच ठिकाणी दाखल करण्यात आले.
दुसर्या दिवशी रात्री 11 वाजता या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र 8 तारखेला मनपाच्या यंत्रणेने तिच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधून ही माहिती दिली. या वृध्देचा जावई, मुलगा, नातू हे दिमतीला होते. दि.9 ऑगस्ट रोजी सायं.4 वाजेनंतर जेवणाच्या डब्यासाठी ते तेथून बाहेर पडले असता परत आल्यावर त्यांना ही वृध्दा कोरोना वार्डात नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी या महिलेला शिंदखेडा कोवीड सेंटरला हलविल्याची नोंद एका रजिस्टरमध्ये सापडली. कुुटुंब सदस्यांनी धुळे जिल्ह्यातील सर्वच कोवीड सेंटरमध्ये जावून तपास केला. मात्र त्या नावाची महिला कोणत्याही सेंटरमध्ये आढळून आली नाही.
अखेर शोध संपला
हिरे रुग्णालयाच्या कोवीड सेंटरमध्ये सारखे नाव आणि वय असलेल्या दोन महिला दाखल होत्या. नावातील साधर्म्यामुळे गडबड होवून हा घोळ झाला. बरीच शोधाशोध केल्यानंतर जुन्या सिव्हील हॉस्पिटलमधील रजिस्टरमध्ये मंगरुळच्या या वृध्द महिलेची नोंद आढळून आली. तसेच मंगळवारी रात्री उशिरा ही महिला याच ठिकाणी कोरोना वार्डात उपचार घेत असल्याचेही निदर्शनास आल्याने सार्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.