– अंजली राजाध्यक्ष
आमचा पहिला मुक्काम सिमला येथे होता. सिमला ते सरहान चढताना जे निसर्ग सौंदर्य दिसते ते कॅमेरात, डोळ्यांत व मनात साठवणे अशक्य आहे. जागोजागी नीलमोहर, पिवळ्या रंगाचे गुलमोहर फुलले होते. पांढर्या रंगाच्या जंगली बारीक फुलांची नक्षी तर जागोजागी दिसत होती. सूचीपर्णी वृक्षांची घनदाट झाडी होती. हिवाळ्यात यांच्या माथ्यावर बर्यापैकी बर्फ जमते, असे ऐकले होते. सफरचंदांचा मोसम नव्हता; परंतु त्याची फुले पाहायला मिळाली.
सर्व झाडांवर पातळ आच्छादन केले होते. पुढे किन्नौर जिल्ह्यातील कल्पा व्हॅलीने तर नजरेचे पारणेच फिटले. घनदाट झाडीमधील पॅगोडाच्या ठेवणीची सुबक घरे झाडातून डोकावत होती. वर आकाशातील ढगांचे सतत बदलणारे रंग, त्यातून झाकली जाणारी व मधूनच आपल्या अस्तित्वाची जाण करून देणारी सूर्यकिरणे व त्यात चमकणार्या अगदी नाकासमोर उभ्या ठाकलेल्या हिमाच्छादित गिरीराजी! जसजसे उंचावर जाऊ लागतो, तसतशी हरितसृष्टी विरळ होऊ लागते. आम्ही साडेसात हजार फुटांवरून साडेअकरा हजार फुटांवर प्रथम चित्कूलला गेलो, तर आजूबाजूला फक्त उंच बर्फाच्छादित पहाड, त्यामध्ये रेषा-रेषांनी दिसणार्या, कधीतरी गोठलेल्या हिमनद्या.. त्यापैकी काही वितळून खाली खळखळत्या बास्पा नदीमध्ये एकरूप झालेल्या. रस्त्यांवर फक्त खुरटी झुडूपे! हवेतील प्राणवायूचे प्रमाणही त्यामुळे थोडे कमीच भासले! समुद्रसपाटीवरील आपल्या बाजूला असलेल्या झाडांचे महत्त्व उंचीवर गेल्यावर प्रकर्षाने जाणवू लागते.
स्पिती व्हॅलीचे हे वाळवंटी रूप एका वेगळ्या पद्धतीने मंत्रमुग्ध करते. रस्त्यांसाठी अगदी उंचीपर्यंत दगड फोडलेले आहेत परंतु त्या फोडलेल्या पाषाणांमध्ये कोरीव लेण्यांची जादू आहे. हे कसे? ते स्पिती व्हॅलीला गेल्याशिवाय कळणार नाही. या खडकांमध्ये सिलिकेचे (एक खनिज) प्रमाण जास्त असावे. त्यामुळे दिवसा डोंगरात कायम झगझगाट जाणवतो. फोडलेले पाषाण हिमनद्यांनी वाहून वाहून त्याचे गुळगुळीत गोटे झाले आहेत. या गोट्यांची घसरण होऊ नये व उंचीपर्यंत बांधलेले रस्ते सुरक्षित राहावे म्हणून सरकारने घट्ट तारांमध्ये या गोट्यांभोवती बांधलेली कुंपणे जागोजागी दिसतात. आपल्या जवानां