दिंडोरी। प्रतिनिधी Dindori
दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेद्वार ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारात शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले तसेच सहकार नेते सुरेश डोखळे यांनी हिरीरीने सहभाग घेवून प्रचारास प्रारंभ केल्याने महाविकास आघाडीचे धाबे दणाणले आहे. दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघात पूर्व आणि पश्चिम भागात किमान एक लाख मताधिक्य मिळण्याची शक्यता जुन्या व नव्या शिवसैनिकांनी बोलुन दाखवले असून घड्याळ्याच्या विजयाचा गजर आजच सुरु झाला आहे.
विरोधकांना ‘काय करु आणि काय नाही’, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चिंत्र दिसून येत आहे. माजी आमदार धनराज महाले व सहकार नेते सुरेश डोखळे यांच्या सक्रियेतेमुळे जुने शिवसैनिक सुध्दा मोठ्या प्रमाणात ना. झिरवाळांच्या प्रचाराला लागले आहे.
दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघात आज एक ब्रेकिंग न्युज फिरत होती. ती म्हणजे माजी आमदार धनराज महाले व सहकार नेते सुरेश डोखळे यांच्या सक्रीय प्रचारास सुरुवात केली. धनराज महाले यांनी शिवसेनेच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या विजयासाठी व महाराष्ट्राच्या विकासासाठी धनराज महाले यांना माघारी घ्यावी लागली होती. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, तालुकाप्रमुख अमोल कदम, ,नंदु बोंबले यांच्यासह मान्यवरांनी प्रचार सुरु केला होता.
तथापि धनराज महाले व सहकार नेते सुरेश डोखळे हे कामकाजामुळे सहभागी होंवू शकले नव्हते. परंतू आज धनराज महाले व सहकार नेते सुरेश डोखळे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारात सहभाग घेतला. महाले व डोखळे यांचे नळवाडपाडा येथे आगमन होताच नव्या आणि जुन्या शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. ‘डोखळे, महाले आगे बढो हम तुम्हारे साथ है, ‘जय शिवाजी जय भवानी’, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, येवून येवून येणार कोण झिरवाळांशिवाय आहेच कोण’, आदी घोषणांनी पुर्ण पश्चिम भाग दणाणून गेला. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सुध्दा या घोषणांनी हादरुन गेले. शिवसेनेच्या सहभागामुळे प्रचंड जोश ना. झिरवाळांच्या प्रचारात आला.
एक लाख मतांच्या फरकाने झिरवाळ विजयी होतील
दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघात मोठी ताकद असलेले माजी आमदार धनराज महाले यांनी पत्रकार परिषदेत महायुतीची भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला विधानसभेच्या निवडणूकीसाठी एबी फार्म दिला होता. परंतू महायुतीच्या व जनतेच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे उमेद्वार ना. नरहरी झिरवाळ यांच्या उमेद्वारीसाठी विनंती करुन माघार घेवून ना. झिरवाळ यांना महायुतीच्या सत्तेसाठी आपल्याला कुठेतरी थांबवावे लागेल, त्यामुळे आम्ही सहकार नेते सुरेश डोखळे, भाऊलाल तांबडे, सुनील पाटील, किशोर कदम या सर्वांनी महायुतीचे उमेद्वार ना. नरहरी झिरवाळ यांना पाठिंबा देवून जास्तीत जास्त मताधिक्यांनी निवडून आणू व या निवडणूकीत शिवसेनेचा ना. झिरवाळ यांना निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा असेल.शिवसेना भाजपा,रिपाई आणि राष्ट्रवादी यामुळे किमान एक लाख मतांच्या फरकाने झिरवाळ विजयी होतील. जुन्या व नव्या शिवसैनिकांच्या सहभागामुळे ना. झिरवाळांचा विजय आजच निश्चित झाला असल्याचे माजी आमदार धनराज महाले यांनी सांगितले.
तुतारीला मतदान म्हणजे दहशतीला मतदान
नळवाडपाडा । तुतारीला मतदान म्हणजे दहशतीला मतदान अशाच भावना मतदारांनी ना. झिरवाळ यांच्याकडे बोलुन दाखवल्या.साहेब आम्हाला पुन्हा दहशत नको आहे.विरोधकांचा पोलीस ठाण्यांवर दबाब नको आहे,तुम्ही आहे, तर सर्व ठिक आहे. तुमचा स्वभाव साधा भोळा आहे,आम्हाला तुमचा आणि समर्थकांचा काहीही त्रास नसतो, दगडापेक्षा वीट मऊ, असे अनेक मतदारांनी ना. झिरवाळांना सांगितले.
लोकसभेची चुक विधानसभेला करु नका : डोखळे
ठेपणपाडा । सहकार नेते सुरेश डोखळे यांची फार मोठी ताकद दिंडोरी व पेठ तालुक्यात आहेत. कादवा कारखान्यांमुळे ऊस उत्पादक शेतकर्यांशी मोठा संपर्क आहे.त्यांनी सुध्दा पत्रकार परिषद घेवून ना. नरहरी झिरवाळ यांना पाठिंबा जाहीर केल्याने खेडगाव, वणी, दिंडोरी पूर्व भागात प्रचंड मतांधिक्य राहील, असे चित्र दिसून येत आहे. सुरेश डोखळे यांची भुमिका विधानसभा व लोकसभा मतदार संघात फार महत्त्वाची मानले जाते. जिकडे सुरेश डोखळे तिकडे पूर्व भाग फिरतो. त्यामुळे सुरेश डोखळे यांना ना. झिरवाळांना पाठिंबा देण्यापासून परावृत्त करण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. पण ना. झिरवाळांचा स्वभाव चांंगला आणि झिरवाळ हे देशाचे राजकारण न करता सर्वांना बरोबर घेवून प्रचंड विकासकामे करु शकतात. या मुद्यावर सुरेश डोखळे यांनी ना. झिरवाळांच्या प्रचारात सहभाग घेतला.
सुरेश डोखळे यांच्या सहभागामुळे विरोधी गटात तुतारी बरीच मागे फेकली जाईल आणि घड्याळचे मताधिक्य विजय ठरणार असल्याचे बोलले जात आहे. याप्रसंगी पत्रकार परिषदेत सुरेश डोखळे यांनी सांगितले की, माजी आमदार धनराज महाले यांनी ना. झिरवाळ यांना पाठिंबा दिल्याने झिरवाळांचा अतिशय मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. कारण त्यांनी प्रत्येक गटातील गावात कोट्यावधींचे विकासकामे कामे केले आहे. या विकासालाच जनता मत देवून ना. झिरवाळ यांना निवडून आणतील. तसेच लोकसभेला महायुतीची जी चुक झाली आहे. कारण केंद्रात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीचेच सरकार आपल्याला आणायचे आहे. कारण लोकसभेला जी चुक केली आहे ती चुक आताच्या विधानसभेला जनतेने करु नये व महायुतीचे उमेद्वार नरहरी झिरवाळ यांचाच घड्याळ या निशाणीवर बटन दाबुन जास्तीत जास्त मतांधिक्याने निवडून आणू असे सुरेश डोखळे यांनी सांगितले.
डोखळे, महालेंच्या प्रचारामुळे विरोधक हादरले
खेडगाव । सहकार नेते सुरेश डोखळे आणि धनराज महाले यांची पूर्व आणि पश्चिम भागात प्रचंड ताकद आहे. खेडगाव, वणी, दिंडोरी, मोहाडी गटात शिवसैनिकांची मोठी ताकद असून या सर्वांना बळ देण्याचे काम आतापर्यंत धनराज महाले, सुरेश डोखळे, भाऊलाल तांबडे, सुनील पाटील, अमोल कदम यांनी केले आहे. खेडगाव आणि मोहाडी गट हा शिवसेनेचा बालकिल्ला मानला जातो. या गटात संपूर्ण बांधणी या नेत्यांनी केल्याने शिवसैनिकांची भुमिका या नेत्यांच्या शब्दावर राहते. हे नेते सक्रीय नव्हते, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना मनातून खुप गुदगुदल्या होत होत्या. परंतू आता शिवसेनेचे सर्व नेते सहभागी झाले आणि त्यांनी ना. झिरवाळांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महाविकास नेत्यांचे चेहरे अनेक ठिकाणी उतरलेले दिसले. या गटाच्या सहभागामुळे जुने शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण होवून सहभागी झाले. ना. झिरवाळांच्या विजयाची चर्चा आता गावोगावात व खेडोपाडी व सोशलमिडीया तसेच चावडी-चावडीवर सुरु झाल्याने विरोधकांमध्ये चलबिचल होवून पळापळीचे चित्र दिसत आहे.