भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा तापमान वाढीचा इशारा दिला आहे. गेले दोन तीन दिवस तापमान काहीसे उणावले असे वाटत होते. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. चालू वर्षातील मार्च महिना मागच्या १२२ वर्षांतील सर्वाधिक उष्ण महिना म्हणून नोंदविला गेला. ऊष्णतेची तीव्रता दरवर्षी वाढत जाईल असा इशारा हवामान अभ्यासक देत आहेत. तापमानवाढीने जनता फक्त गरमीने हैराण होते का? तापमानवाढ अनेक प्रश्न बरोबर घेऊन येते. तापमानवाढीमुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढतो. जलसाठ्याची पातळी वेगाने खालावते. परिणामी जनतेला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. राज्यातील अनेक वाड्या-वस्त्यांवर पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे चाळीस हजार लोक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील माणिकपुंज धरण तर मार्च महिन्यातच कोरडे झाले होते. राज्यातील इतर जिल्ह्यातील परिस्थिती फारशी वेगळी नसावी. दरवर्षी वाढत्या उष्णतेच्या लाटांचा सामना करण्यासाठी एका धोरणाची आवश्यकता माजी केन्द्रीय सचिव माधवन नायर राजीवन यांनी माध्यमांकडे व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारचे तसे नियोजन सुरु असावे अशी जनतेची अपेक्षा. पाण्याचे मोल लोकांनाही लक्षात घेऊन पाणी जपून वापरावे लागेल. बेसुमार वापर टाळावाच लागेल. ‘असेल तेव्हा दिवाळी आणि नसेल तेव्हा शिमगा’ असा प्रकार पाण्याच्या बाबतीत मोठया प्रमाणात आढळतो. पाण्याची उधळपट्टी सुरु असते. पाणीटंचाई कमी व्हावी यासाठी लोकसहभागही तितकाच आवश्यक असतो. सामान्यतः उन्हाळ्यात डायरिया आणि शरीरातील पाणी कमी होण्याची समस्या अनेक लोकांना जाणवते. तापमानवाढीने आरोग्याचे प्रश्नही वाढत जातील आणि अनेक आजारांचा धोका वाढेल असे वैद्यकीय तज्ञ म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तापाचा संसर्ग वाढू शकेल. उष्माघात लोकांच्या जीवावर बेतू शकतो. शरीरातील पाणी कमी झाल्याने उलट्याचा त्रास होऊ शकेल. यापासून स्वतःचा बचाव करण्याचे उपाय देखील तज्ज्ञ वारंवार सांगतात. शक्यतो तीव्र उन्हात जाणे टाळावे. जाणे क्रमप्राप्त असेल तर टोपी, स्कार्फ, छत्रीचा वापर करावा. सतत पाणी प्यावे. लिंबू सरबत, ताक प्यावे. हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत. उष्माघाताची लक्षणे तज्ञाकडून समजावून घ्यावीत. जेणेकरून तसा त्रास कोणालाही झाला तर त्यापासून बचाव करणे शक्य होऊ शकेल. उष्णेतच्या लाटासंदर्भात आरोग्याची काळजी कशी घ्यायची? उष्माघात कसा ओळखायचा? उष्माघात झाला तर काय करायचे? अशा रुग्णावर कोणत्या प्रकारे प्रथमोपचार करायचे याचे प्रशिक्षण नागरिकांना सरकार देऊ शकेल. दरवर्षी वाढत जाणाऱ्या उष्णतेच्या लाटांचा सामना करण्यासाठी सरकारी पातळीवर नियोजन केले जाईल. तथापि लोकांनाही खबरदारी घ्यावी लागेल. आरोग्याबाबत जागरूकता वाढवावी लागेल. त्याला पर्याय नाही