Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविरोधकांचे रडीचे डाव जनताच उधळेल : भुसे

विरोधकांचे रडीचे डाव जनताच उधळेल : भुसे

वडनेर गणातील गावांत विकासकामांच्या मुद्यावर महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

आपण गेली 20 वर्षात काय केले व कुणाला काय दिले याची माहिती जनतेला आहे. आपण कृषि, सिंचन, उद्योग, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी केलेल्या विविध विकासकामांच्या मुद्यावर निवडणुकीत उतरलो आहोत. मात्र, विरोधक उमेदवारांकडे विकासाचे मुद्देच नसल्याने प्रचाराला काहीही नाही. त्यामुळे आपल्यावर ते खालच्या पातळीवर टीका करत अफवा पसरवित बदनामी करू पाहत आहेत. परंतू याचे मला वाईट वाटत नाही. कारण सरळ मार्गाने ते आपले काही बिघडू शकत नसल्यानेच त्यांनी बदनामी सुरू केली आहे. विरोधकांचे हे रडीचे डाव माहित असल्याने शहरासह तालुक्यातील जनता त्यांना भीक घालत नाही. यामुळेच विकासासाठी मतदार धनुष्यबाणाचे बटन दाबून आम्हाला भरभरून आशीर्वाद देतील, असा विश्वास मालेगाव बाह्य मतदार संघातील महायुतीचे उमेदवार पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

तालुक्यातील वडनेर गणातील वळवाडे, गारेगाव, पोहाणे, कजवाडे, रामपुरा, चिंचवे, लुल्ले, विराणे, वळवाडी, खाकुर्डी, वडनेर, सावतावाडी या गावांना प्रचारानिमित्त पालकमंत्री दादा भुसे यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधत शहरासह तालुक्यात विविध क्षेत्रात केलेल्या विकासकामांसह केंद्र व राज्य शासनाच्या मतदार संघात राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थ व महायुतीचे पदाधिकरी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना भुसे यांनी विरोधक उमेदवारांवर टिकेची झोड उठविली.

संपूर्ण मतदार संघात आपल्या प्रचारदौर्‍यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी स्वयंस्फुर्तीने ग्रामस्थ, महिला व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचार अभियानात सहभागी होत महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी सक्रिय झाले आहेत. यामुळे आपला विजय जनतेनेच निश्चित केला असल्याचे स्पष्ट करत भुसे पुढे म्हणाले, काटवन भागातील वडनेर गणातील गावांमध्ये आज प्रचारदौर्‍यात मिळालेला अभुतपुर्व प्रतिसाद महायुतीच्या विजयाची साक्ष देत आहे. जनतेचे उत्स्फुर्तपणे मिळत असलेले हे प्रेम पाहूनच समोरचे उमेदवार अस्वस्थ होवून आपली बदनामी करत खालच्या पातळीवर टिका करत सुटले आहेत. परंतू विरोधकांनी कितीही कोल्हेकुई केली तरी जनता त्यांना भिक घालणार नाही व 20 तारखेला विकासासाठी धनुष्यबाणाचे बटन दाबत आपल्याला भरभरून आशिर्वाद देतील असा विश्वास भुसे यांनी पुढे बोलतांना व्यक्त करत शहरासह तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. महायुतीचे सरकार जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा येणार असल्याने विविध योजना मार्गी लावत तालुक्याला विकासाच्या शिखरावर नेण्याचे काम आपण करणार असल्याचे सांगितले.

तालुक्यातील जनतेचा माझ्यावरील विश्वास आणि प्रेम हेच आपल्या आजपर्यंतच्या कामाची पोहचपावती आहे. कुणी काहीही बोलत असले तरी मायबाप जनता सर्व जाणते. तुम्ही माझे कुटूंब आहात आणि माझ्या कुटूंबीयांची मान कायम अभिमानाने उंचावत राहिल यासाठी माझ्या मालेगावात कशाचीही कमी पडणार नाही हे बघणे माझे कर्तव्य आहे व ते पार पाडण्यासाठी मी कायम कटिबध्द राहिल, अशी ग्वाही भुसे यांनी पुढे बोलतांना दिली.

यावेळी मार्गदर्शन करतांना अनेक मान्यवरांनी पालकमंत्री दादा भुसे यांनी एक ना अनेक कामे आमच्या गावात केली आहेत. खर्‍या अर्थाने गाव सुजलाम्-सुफलाम् झाला असेल तर तो भुसे यांनी केलेल्या कामामुळेच त्यामुळे विरोधक म्हणतात आणीबाणी परंतू दादा भुसे राजकारणातील शांत, संयमी व सुसंस्कृत नेतृत्व असल्याचे आम्ही पाहिले आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही अफवा पसरविल्या, टिका केल्या तरी आम्ही त्यांच्या भुलथापांना बळी न पडता पुन्हा एकदा दादा भुसे यांच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी जोमाने काम करू, असा निर्धार व्यक्त केला.

वडनेर गणातील गावांमध्ये प्रचार दौर्‍यानिमित्त पालकमंत्री दादा भुसे यांचे आगमन होताच त्यांना आशिर्वाद देण्यासाठी ज्येष्ठ नागरीक, महिला, तरूण व ग्रामस्थ या प्रचार दौर्‍यात मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. फुलांची उधळण करीत भुसे यांचे गावागावात स्वागत करीत त्यांना निवडून देण्याचा विजयी निर्धार देखील व्यक्त केला जात असल्याने गावागावात महायुतीचा झंझावात निर्माण झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या