राजेंद्र पाटील
जळगाव – Jalgaon
निसर्गाच्या सान्निध्यात असणार्या पहिल्यावहिल्या पक्षाची आपली ओळख म्हणजे चिमणी. कधीकाळी चिमण्यांच्या चिवचिवाटाने होणारी घराघरातील सकाळ आता केवळ आठवणीतील एक अनुभूती झाल्याची स्थिती आहे. आपल्या प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणींशी जोडली गेलेली चिऊताई काळाच्या ओघात दिसेनाशी झाली.
आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळच. कविता, बडबडगीते यातच चिमणी शिल्लक राहते की काय अशी भिती वा़टू लागली आहे. या चिऊताईला वाचवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत, तिचे पुनर्वसन व जनजागृतीचे कार्य करणार्या मुंबई येथील ‘स्पॅरोताई फाऊंडेशन’ने आगळावेगळा उपक्रम राबविला असून त्यांनी 2021 या नवीन वर्षातील दिनदर्शिकेत सचित्र चिमणी संवर्धनाचा संदेश दिला आहे.
दिनदर्शिकेतील ती सर्व चित्रे रेखाटली आहेत ‘राज्य शासन विशेष शिक्षक पुरस्कार’ प्राप्त जळगाव येथील नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयातील सेवानिवृत्त कलाशिक्षक लीलाधर झिपरू कोल्हे यांनी. त्यांनी रेखाटलेली चित्रे अर्थपूर्ण व सुंदर असल्याने ही दिनदर्शिका बोलकी झाली असून प्रत्येक कार्यालयात, घराघरातील भिंतीवर झळकताना दिसत आहे, नव्हे नव्हे तर या चित्रांचे सर्वत्र कौतुकही होत आहे. ‘माझ्या नवर्याची बायको’ या मालिकेच्या टीमनेही स्पॅरोताई फाऊंडेशनमध्ये सहभागी होत कौतुक केले. एव्हढेच नाही तर यातील राधिका अर्थात अनिता दाते यांनी या दिनदर्शिकेचे महत्व विषद करत सर्वांना ‘चिमणी वाचवा’चा संदेश दिला.
खान्देशातील खिरोदा ता.रावेर येथील मुळ रहिवाशी व सध्या जळगावस्थित असलेले कलाशिक्षक लीलाधर कोल्हे यांनी आपल्या कल्पनाविष्कारातून कागदावर अवतरणार्या वेगवेगळ्या कलाकृती, कधी रेषांचा खेळ तर कधी रंगाशी नातं जोडत हुबेहूब साकारणारी निसर्ग चित्रे पर्यावरण व प्राणीं संवर्धनाचा संदेश देणारी चित्रे सोशल मिडीयावर झळकताच ती ‘स्पॅरो ताई फाउंडेशन’ला भावली अन् श्री.कोल्हे यांच्याशी संपर्क करत ‘चिमणी संवर्धन दिनदर्शिका 2021’ च्या कार्याला जोड मिळाली. प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक पानावर वेगवेगळ्या स्वरूपात ‘स्लोगन’सह चिऊताईला वाचविण्याचा संदेश या दिनदर्शिकेतून दिला जात आहे.
‘स्पॅरो ताई’ फाउंडेशनने दिलेल्या ‘स्लोगन’वर आधारीत आपल्या कल्पनाविष्कारातून उत्कृष्ट चित्रे रेखाटलेली चित्रे सर्वांच्या मनामनात घर करू लागली आहेत. वडीलांचे सुतार काम बघून लिलाधर कोल्हे यांना मूर्ती घडविण्याचा छंद लहानपनापासून जडला, चवथीत असताना चित्रकलेची आवड लागली. चित्रकला शिक्षणातील गुरू मनोहर चौधरी यांनी दिलेल्या शिकवणीच सोनं करत नंदिनीबाई वामनराव विद्यालयाचे सेवानिवृत्त कलाशिक्षक लिलाधर झिपरू कोल्हे हे आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून विविध विषयांच्या माध्यमातून जनजागृती करत असतात. याबद्दल त्यांचा महाराष्ट्र शासनासह विविध संस्थांनी गौरवही केला आहे. कोरोना काळातही अशीच जनजागृती त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आपल्यातील उपजत कला ओळखून त्यात वाहून घेतले तर मिळणारे फळ हे यशाचे असते हे त्यांनी दाखवून दिले. त्यांची बहुतेक चित्रे ग्रामीण भागातील उंच डोंगर दर्या, घरे, झोपड्या, गाई, म्हशी, शेळ्या, कष्टकरी स्त्रिया, त्यांचे सौंदर्य, शेतकरी यांच्या मूर्त-अमूर्त आकारातून तयार झालेली आहेत. मनमोहक शांत व करडी रंगसंगती त्यांच्या चित्रांचे विशेष आकर्षण असून त्याद्वारे ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडते.
दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर दिला संदेश
दिनदर्शिकेच्या प्रत्येक महिन्याच्या पानावर चिमणी व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी चित्रे : जानेवारीत मकर संक्रांत सण येत असल्याने या सणाला गुजरातसह महाराष्ट्रात पतंग महोत्सव मोठ्या प्रमाणावर खेळला जातो, त्यात पतंगाच्या धाग्यामुळे अनेक पक्षांचा नाहक जिव जातो, हे टाळता यावे यासाठी या महिन्यात – ‘खेळ होतो तुमचा, जीव जातो अमुचा’, फेब्रुवारीच्या पानावर आहे ‘लॉकडाऊन’ कधी कुणी विचारही केला नसेल अशा कोरोना महामारीने सर्व जगाला थांबवले.
मनुष्य आपल्या हौसेखातर पोपटासारख्या पशुपक्षांना पिंजर्यात कोंडून आनंद घेतो, मात्र लॉकडाऊनमध्ये प्राणी, पशुपक्षी मुक्त संचार करत असताना मानवजाती मात्र घरातच कोंडून होते हे याचे बोलके चित्र रेखाटून ‘कोंडून पिंजर्यात, आम्हाला करता त्रस्त…!,
लॉकडाऊन मध्ये अडकलात… घरी वाटतंय का मस्त?’ असा संदेश दिलायं. कडक उन्हापासून बचाव व्हावा यासाठी प्रत्येकजण सावलीचा आधार घेतो मात्र वाढत्या औद्योगीकरण व काँक्रीटीकरणामुळे वृक्षांची सर्रास तोड होते. याचा बोध मार्च महिन्याच्या पानावर आहेे ‘नका तोडू हिरवी झाडे, स्मशानात गेली आमची हाडे’ यातून होतो. एप्रिल मध्ये आहे मराठी वर्षारंभ म्हणजे ‘गुढीपाडवा’ म्हणून ‘गुढी उभारू नव्या संकल्पाची, करूया तयारी चिऊच्या स्वागताची’ असे सांगत घरोघरी गुढीसोबत चिमण्यांची घरे लावण्याचा संदेश दिला आहे. मे महिना म्हणजे जिवाची लाही लाही करणारे कडक उन. या दिवसात चिमणी पाखरांना सावली तर नसतेच पण पाणी सुध्दा मिळेनासे होते, अशा स्थितीत त्यांच्या निवार्यासह अन्न-पाण्याची सोय व्हावी यासाठी ‘वैशाखाचा वणवा, भयंकर ऊन, ठेवाल ना पाणी? जाईन दोन घोट पिऊन’ अशी विनवनी चिऊताई करत आहे. जून- ‘शिकण्यास चिमणीचा धडा, बाळांना शाळेत धाडा’ असे बोलके चित्र आहे. जुलै मध्ये असतो पाऊस म्हणून ‘धो-धो पाऊस, सोसाट्याचा वारा, उडाले घरटे… द्याल ना निवारा?’. दरवर्षी 15 ऑगस्ट ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा होतो, म्हणून ‘मंत्र हा स्वातंत्र्याचा, तुमचा आमचा सर्वांचा’ असे सांगत पक्षांनाही पिंजर्यातून मुक्त करण्याचा संदेश दिला आहे. सप्टेंबर मध्ये आहे श्रीगणेशोत्सव अशा लाडक्या गणरायाला चिऊताई विनंती करते की ‘ देव बाप्पा देव बाप्पा, नवसाला पाव, आमच्या बाळांच्या रक्षणाला धाव’. ऑक्टोबर- ‘देऊनी चिऊताईला आसरा, करूया साजरा सण दसरा’. नोव्हेंबरला आहे दिवाळी या सणाला सर्वचजण फाटाके फोडण्याचा आनंद घेतात मात्र कानठळ्या बसवणार्या या आवाजामुळे, त्यातून निघणार्या धुरामुळे पर्यावरण प्रदुषीत होते, यासाठी ‘ना दिवसाचे सुख, ना रात्रीचा आराम, फटाक्यांच्या आवाजाने, जिणे झाले हराम’ म्हणत प्रदूषण टाळण्याचा दिला संदेश. डिसेंबर – ‘समतोल राखण्यास निसर्गाचा, होऊ दे चिवचिवाट चिऊताईचा’ अशा वर्षातील बारा महिन्याच्या प्रत्येक पानावर वेगवेगळे मनमोहक, आकर्षक, अर्थपूर्ण चिऊताईला वाचविण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा संदेश देऊन जनजागृती केली आहे. त्यामुळे गरज आहे ती आपणही पक्षीमित्र बनण्याची, पाणी आणि अन्नासाठी पक्षांना मदत करण्याची…!
– मो. ९४०३५६६३८१