नाशिक | Nashik
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवार (दि.१५) रोजी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद नाकारण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी काल नाशिकमधील जेजुरकर लॉन्स येथे राज्यभरातील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून भुजबळांनी आपण राज्यभरात जाऊन पुन्हा एकदा ओबीसींचा एल्गार पुकारणार असल्याचे म्हटले.
त्यानंतर आता छगन भुजबळ यांना मंत्रिपद का नाकारण्यात आले याची कारणे समोर आली आहेत. भुजबळ यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केल्यामुळे पक्षातील नेते आणि पदाधिकारी त्यांच्यावर नाराज होते. भुजबळ यांनी बळजबरीने मुलासाठी म्हणजेच पंकज भुजबळ यांच्यासाठी विधानपरिषद आमदारकी पदरात पाडून घेतली. ती पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना आवडली नाही. तसेच छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी पक्षाविरूद्ध जाऊन अपक्ष उमेदवारी भरल्याने मित्रपक्ष नाराज झाले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध महायुतीमधील नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पाहायला मिळत होती.
तसेच नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारानी छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊ नका अशी अजित पवार यांच्याकडे विनंती केली होती. या आमदारांनी अजित पवार यांना भुजबळांना जर मंत्रीपद दिले तर नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार एकत्रित राजीनामा देतील, असा इशारा दिला होता. या सर्व कारणांमुळे त्यांना मंत्रिपद नाकारले गेल्याचे सांगितले जात आहे.