Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात पावसाचा अनेक वर्षांचा विक्रम मोडीत

जिल्ह्यात पावसाचा अनेक वर्षांचा विक्रम मोडीत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून पावसाची संततधार ( Rain ) सुरु आहे. यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहे. गंगापूर धरणातून काल सकाळी 11 वाजता 5 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु होता. सायंकाळी सहाला तो साडेसात हजारपर्यंत करण्याची वेळ आली. आतापर्यंत जिल्ह्यात 115 टक्के पाऊस झाला असून अनेक वर्षाचा विक्रम यंदाच्या पावसाने मोडला आहे. विशेष म्हणजे जायकवाडी धरणाला नाशिकमधून 93 टीएमसी पाणी गेले आहे.

- Advertisement -

यंदा जुलैपासून दररोज पाऊस सुरु आहे. कालपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असल्याने गंगापूर धरणातून काल सायंकाळी 7 वाजता 7000 क्युसेसपर्यंत विसर्ग वाढवण्यात आला. पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

नदीची पातळी वाढल्याने गोदामाई पुन्हा खळाळली आहे. दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पाणी लागले आहे. सध्या होळकर पुलाखालून 6 हजार 298 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदाघाटावर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात सरसारी 933 मिलीमीटर पाऊस होतो. यंदा मात्र तो 1068 मिलीमीटर झालाआहे. त्यामुळे सर्वच धरणे तुडुंब भरली आहे. त्यातून पाणी सोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. नदीच्या काठावर सकाळी बाहेरगावाहून येणार्‍या भाविकांच्या गाड्या नदीच्या काठावर पार्किंग केल्या होत्या.पाण्याची पातळी वाढणार असल्यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांकडून ध्वनी क्षेपणाच्या सहाय्याने सर्वांना आपली वाहने येथून काढून घ्यावीत, नदीकाठी असलेल्या दुकानांना व झोपडीतील नागरिकांना सूचना देऊन बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

त्यावेळी महिला कर्मचारी भाविकांना व नागरिकांना वारंवार सूचना देऊन सुद्धा नागरिकांना पुराचा धोक्याची भीती वाटत नव्हती. यावर्षी गोदावरीला बर्‍याचवेळा पूर येऊन गेल्यामुळे पूर बघणार्‍यांची गर्दी यावेळी गाडगे महाराज पुलावर कमी होती. मात्र वाहनधारकांनी आपली वाहने चक्क पुलावर उभी करून खरेदीस जाणे पसंत केले. त्यामुळे गाडगे महाराज पुलावर नवीन पार्किंग सुरू झाल्याचे चित्र होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या