Saturday, November 2, 2024
Homeब्लॉगआधी बीज रुजले मनात!

आधी बीज रुजले मनात!

वाढते तापमान आणि त्याचा परिणाम याविषयी थोडीफार माहिती आपल्याला सर्वांनाच झाली आहे. यावर सामान्य माणसे काय करु शकतील असा विचार मनात सुरु झाला होता. त्याचे उत्तर सापडले देशी वृक्षांचे बीजगोळ्यांमध्ये. देशी वृक्षांचे बीजगोळे तयार करुन त्याचे वाटप करणे संस्थेच्या माध्यमातून शक्य आहे असे वाटू लागले. त्याचा शुभारंभ यावर्षी झाला. असंख्य हातांनी जवळपास एक लाख बीजगोळे तयार केले. त्याचे वाटप पंंढरपुरला जाणार्‍या पालख्यांमध्ये सहभागी झालेल्या दिंड्यांमध्ये करण्यात आले. त्या अनुभवाविषयी..

वाढत्या जागतिक तापमानाचा विचार करताना भावी पिढीला निर्माण होणारा धोका अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे यावर फक्त चर्चा, विचारविनिमय आणि तात्पुरती उपाययोजना काढून चालणार नव्हते. करोनाच्या आधीपासूनच हा विचार चालू होता. परंतु त्या दरम्यान काही करता आले नाही. सगळे वातावरण खुले झाल्यावर वेळ न दवडता लगेच त्यावर कृती करावी या विचाराने देशी झाडांचे संगोपन आणि संवर्धन हा विषय चर्चेत आला. वृक्षारोपण आणि संगोपन काही प्रमाणात शहरामध्ये होतही होते. परंतु तुलनात्मकदृष्ट्या त्याचे प्रमाण बघता ते सर्व समावेशक होत नव्हते.

कारण भारत देश हा खेड्यांचा बनलेला आहे. त्यामुळे हा गंभीर विषय खेडोपाडी-गावागावात चांगल्या पद्धतीने समजावून तो कृतीत आणायचा असेल तर देशी वृक्षांचे बीजे गोळे बनवून त्याचे योग्य पद्धतीने वाटप व त्या माध्यमातून जनजागृती करता येऊ शकते असे विचारांती ठरले. त्यातूनच एक लाख आठ हजार बीजगोळे बनविण्याचा संकल्प श्री. स्वामी बहुउद्देशीय संस्थेने ठरवला. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद दादा बाळकृष्ण मगर आणि सर्व पदाधिकार्‍यांनी तो संकल्प कृतीत देखील आणला.

- Advertisement -

बीज गोळे कसे बनवायचे? ते देशीवृक्षांचेच का बनवायचे? याची शास्त्रीय माहिती घेतली. बीजगोळे बनवताना शेतीची माती, गांडूळ खत आणि शेणखत याचा वापर प्रामुख्याने करावा असे ठरवले. तसेच जी देशी झाडे जमिनीची धूप थांबवणे आणि मुळाद्वारे पाणी भूगर्भापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात अशा प्रकारच्या झाडांच्या बियांचे गोळे बनवायचे होते. कामाचे पहिलेच वर्ष होते. त्यामुळे ज्या देशी वृक्षांच्या बिया सहज आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील त्याच वृक्षांची निवड करण्यात आली. उदाहरणार्थ वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, करंज, बेल वगैरे.

सुरुवात केली तेव्हा बिया कुठून मिळवायच्या याचा शोध घ्यायला सुरुवात झाली. या क्षेत्रात काम करणार्‍या अनेक संस्थांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात बिया त्यावेळी उपलब्ध नव्हत्या. म्हणून व्यक्तिगत पातळीवर काही निसर्गप्रेमी लोकांशी संपर्क केला. त्यांच्यासमोर बीज गोळे बनवण्याची संकल्पना मांडली. तेव्हा नक्की काय करायचे? इतके कसे शक्य आहे? अशा अनेक शंका निर्माण केल्या गेल्या होत्या. परंतु बियाही मोठ्या प्रमाणात जमल्या. आणि जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात झाली तेव्हा त्यातील आनंदही मिळू लागला.

या प्रवासात भेटले बडदे काका. देशी वृक्षांच्या बियांचा शोध सुरुच होता. घरात काम करणार्‍या रूपालीला सहजच विचारले कोणी आहे का असे बिया मिळवून देणारे तेव्हा तिनेच बडदे काकांचे नाव सुचविले. बडदे काका हे एक सामान्य व्यक्तिमत्त्व, पण केवळ देशी बियांच्या गोळ्या करून त्याचे रोप बनवून विनामूल्य वाटून देणे हा एकच छंद ते गेली 50 वर्षे जोपासतात. त्यांच्याच माध्यमातून बिया मिळायला सुरुवात झाली. नंतर श्री माणिक धर्माधिकारी यांच्यासह बिया देणारे अनेक जण जोडले गेले आणि हा जगन्नाथाचा रथ पेलण्याची उभारी मिळाली.

बीजगोळेच तर बनवायचे, ते काय सोप्पे आहे. असे वाटले होते पण बीजगोळे बनवताना येणार्‍या अडचणी समजल्या. त्यावर मात करण्यासाठी प्रयत्नही झाले. बीजेगोळी बनवायला सुरुवात मातोरी गावातील एका मळ्यातून झाली. यानिमित्ताने त्र्यंबकेश्वर येथील तळवडे शेतातही जाता आले. जसजसे अनेकांना या उपक्रमाविषयी समजत होते तसे लोक सहभागी होत होते. बीजगोळे करण्याच्या निमित्ताने शाळकरी मुले माती खेळण्याचा आनंद घेत होते तर दुसरीकडे त्यांच्या आयांचा सहभाग रोज वाढतच होता.

सातपूर येथे महिलांनी स्थापन केलेल्या श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ अक्कलकोट या संस्थेतही मोठ्या प्रमाणात बीजगोळे बनवण्यात आले. तेथे दोन वर्षाच्या मुली पासून 70 ते 80 वयोगट असलेले सर्व स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन नामस्मरण प्रार्थना करत बीजगोळे बनवले. मखमलाबाद येथे तर रोज एक ते चार या दरम्यान 3000 गोळे बनविण्याचा आनंद तेथील महिला घेत होत्या. चमत्कार घडावा अशाप्रकारे बघता बघता एक लाख आठ हजार बीजगोळे पूर्ण झाले.गोळे बनवून तर झाले पण वाटपाचे काय करायचे? यावर सर्वांनी आपली मते मांडली.

हा विषय लाखो लोकांपर्यंत एकाचवेळी पोहोचवण्यासाठी दिंड्यांमध्ये वाटप करण्याची कल्पना मिलिंद दादा मगर यांनी मांडली. तोपर्यंत आषाढी एकादशीनिमित्त निघणार्‍या दिंड्यांचे वारे वाहू लागले होते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या निमित्ताने पुणे येथे सर्वच दिंड्या दोन दिवस मुक्कामाला थांबतात. त्यावेळी आपल्याला हा उपक्रम राबवायचे ठरले.

गोळे वाटपासाठी पर्यावरणपूरक पिशव्या वापरण्याचीही दक्षता आम्ही घेतली.संत श्री ज्ञानेश्वर माऊली देवस्थान आळंदी, जगद्गुरु संत श्री तुकोबाराय देवस्थान देहू यांनीही सक्रिय मदत केली.

वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी जिथे स्थिरावतील तेथे दिंडी प्रमुखांच्या माध्यमातून सर्वांना बीजे गोळ्याचे महत्त्व काय आहे? देशी वृक्षांची लागवड आणि जोपासना का करायची? निसर्ग साखळी का जपायची? हे कार्यकर्त्यांनी समजावून सांगितले आणि बीजगोळे त्यांच्या सुपूर्द केले. गोळे शेताच्या बांधावर, सार्वजनिक ठिकाणी, शाळांमध्ये, देवस्थानांमध्ये लावून त्याचे संगोपन आणि संवर्धन करावे असे आवाहन त्यांना केले.

वारकर्‍यांची संपर्क क्रमांक, दिंडीचे नाव गाव तालुका याची सविस्तर यादीही बनवली. त्यांच्या संपर्कात राहून या उपक्रमाची फलश्रुतीदेखील शोधायची असेही ठरवले आहे. वारकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. स्थानिक लोकही त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. अनेकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आम्ही आमच्या गावी हा उपक्रम नक्कीच राबवू आणि तुमच्या संपर्कात राहू याची ग्वाही दिली. या उपक्रमात श्री अटल सेवा प्रतिष्ठान पुणे, धरती फाउंडेशन संगमनेर तसेच बाल तरुण मित्रमंडळ, सद्गुरू पिठले महाराज देवस्थान यांचेही सहकार्य मिळाले.

यापुढे दरवर्षीच हा उपक्रम राबवायचे ठरवले आहे आणि तसे लगेच कामही सुरू झाले आहे.

सुनीता कैलास आव्हाड

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या