अंबासन । वार्ताहर Ambasan
मद्याच्या नशेत बस चालवित असलेल्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बस वीजेच्या खांबाला धडकून खांब तोडत फरशी पुलावरील पाईपावर धडकल्याने बसचे पुढील दोन्ही चाक निखळून पडल्याने थांबल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात बसमधील 19 प्रवाशी किरकोळ जखमी झाले तर एक वृध्दा गंभीर जखमी झाली. नामपूर-सटाणा रस्त्यावरील दोधेश्वर फाट्यालगत प्रवाशांच्या अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, मद्याच्या नशेत चालक बस चालवत असल्याचे उघडकीस आल्याने या घटनेची गंभीर दखल घेत साक्री आगारात सेवेत असलेल्या बस चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सटाणा आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांनी दिली.
नामपूर-सटाणा रस्त्यावरील दोधेश्वर फाट्यालगत सटाणा येथून नामपूरकडे भरधाव वेगात येत असलेल्या नाशिक-साक्री बस क्र. एम.एच.-40-एन-9919 वरील चालक महेंद्र रमेश भामरे हा मद्याच्या नशेत होता. दोधेश्वर फाट्यालगत चालक भामरे याचे नियंत्रण सुटल्याने बसने वीजेच्या खांबाला धडक दिली. बसच्या वेगामुळे धडक बसताच खांब तुटून तो बसबरोबर शंभर फूट फरफटत गेला. सदर अनियंत्रीत बस मोरीवरील पाईपाला जावून धडकल्याने पुढचे दोन्ही चाक निखळले. मात्र पाईपात बस अडकल्याने ती थांबून मोठा अनर्थ टळला. बस थांबताच किरकोळ जखमी झालेले भयभीत प्रवाशी तात्काळ बसमधून बाहेर पडले. तर वरचे टेंभे येथील मिराबाई वाघ ही वृध्दा गंभीर जखमी झाल्याने त्यांना नामपूर ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागले.
बस चालक महेंद्र भामरे हा मद्याच्या नशेत वेगात बस चालवत होता. नशेमुळे त्याचे नियंत्रण सुटल्याने बस वीजेच्या खांबाला व नंतर मोरीच्या पाईपाला जावून धडकली. पाईपामुळे बस थांबली नसती तर मोठा अनर्थ घडला असता अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त करत चालकाच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात बस वाहक मनिषा अनिल गावीत (27) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक महेंद्र रमेश भामरे (रा. मालपुर, ता. साक्री) याच्याविरूध्द प्रवाशांच्या दुखापतीस व बसच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवा. देवरे हे अधिक तपास करीत आहेत.