नाशिक | प्रतिनिधी Nashik
प्रत्येक उन्हाळ्यात, रिसर्च सायन्स इन्स्टिट्यूट (RSI) साठी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT), अमेरिका येथे जगभरातील माध्यमिक शाळांतील सर्वांत निपुण व बुद्धिमान असे 80 विद्यार्थी वेगवेगळ्या चाचण्यांमधून निवडले जातात. RSI हा विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित (STEM) यांतील संशोधनाशी संबंधित अतिशय उच्च पातळीचा कोर्स असून निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य असतो.
नाशिक येथील ‘भास भामरे अकादमी’ (Bhas Bhamre Academy) मधील पार्थ चव्हाण व सार्थ चव्हाण हे जुळे बंधू ( Parth Chavhan & Sarth Chavhan ) या कोर्ससाठी निवडले गेले आहेत. २७ जून पासून MIT, अमेरिका येथे त्यांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. पूर्णपणे संशोधन प्रक्रियेवर आधारित असा हा ६ आठवड्यांचा प्रशिक्षण वर्ग आहे. या वर्गास •जगभरातून निवडल्या गेलेल्या 80 विद्यार्थ्यांपैकी नाशिक शहरातील २ विद्यार्थ्यांची निवड होणे ही खरोखरच भूषणावह गोष्ट आहे. यासाठी पार्थ व सार्थ यांना ‘भास भामरे अकादमी’चे तसेच ऑयलर सर्कलचे सायमन यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तसेच बोस्टन युनिवर्सिटीतर्फे १९८९ पासून घेतल्या जाणाऱ्या PROMYS या ६ आठवड्यांच्या गणित प्रशिक्षण वर्गास जगभरातून ६० शालेय विद्यार्थी निवडले जातात… PROMYS- २०२२ साठी एकट्या नाशिक शहरातून पार्थ चव्हाण, सारा अहिरे व स्मिताली ‘भंडारी यांची या वर्गास पूर्ण शिष्यवृत्ती (सुमारे १९,००,००० प्रत्येकी) मिळवत निवड झाली आहे. अतिशय आव्हानात्मक प्रवेश पात्रतेला सामोरे जात या विद्यार्थानी हे यश संपादन केले आहे. हे तिन्ही विद्यार्थीसुद्धा भास भामरे अकादमी’चे आहेत.
यासोबत PROMYS for Teachers हा शिक्षकांसाठीचा उच्च स्तरीय प्रशिक्षण वर्ग बोस्टन युनिवर्सिटीतर्फे १९९३ पासून घेतला जातो. जगभरातून फक्त ३० शिक्षक दरवर्षी • यासाठी निवडले जातात. याकरिता नाशिक येथील ‘भास भामरे अकादमी ‘ चे संचालक व शिक्षक . भास भामरे यांची निवड सलग दोन वर्षे झाली आहे. शालेय स्तरावर उत्तम गणिती बुध्यांक असलेल्या विद्यार्थ्याना विशेष रीतीने कसे मार्गदर्शन करावे याचे प्रशिक्षण त्यांना मिळणार आहे. यामुळे नाशिकस्थित गणितात उच्च स्तरीय काम करू इच्छिणाऱ्या शालेय विध्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होईल असा विश्वास शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला. नाशिकचा लौकिक सातसमुद्रापार पोहोचविणाऱ्या ‘भास भामरे अकादमी ‘ चे कौतुक अनेक मान्यवरांनी केले.
२ जुलै रोजी भास भामरे व त्यांची विद्यार्थिनी स्मिताली हे बोस्टन येथे रवाना होत आहेत. समाजातील सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
भास भामरे यांचे मनोगत
१९९७ पासून शालेय स्तरावरील निवडक मुलांसोबत काम करत आहे. आजपर्यंत अकादमीचे विद्यार्थी अनेकविध परीक्षांत उत्तुंग यश मिळवित आलेले आहेत. महाविद्यालयीन शिक्षणानंतर उच्च शिक्षण घ्यायला शेकडो विद्यार्थी जगभरातील पहिल्या ५० मानांकन असलेल्या विद्यापीठांत जातच असतात. याचा अभिमान आणि आनंद कायम आहे. मात्र आता शालेय स्तरावरचे विद्यार्थी अशा विद्यापीठांच्या विविध प्रशिक्षण वर्गास निवडले जात आहेत. अशा ठिकाणी फक्त परीक्षार्थी असून चालत नाही. म्हणून परीक्षेतील यशानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा आताचा आनंद वेगळा आहे. आणि सोबतच मलाही आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन काम करायची संधी मिळतेय. यामुळे
शाळकरी मुलांना परीक्षार्थी बनविण्यापेक्षा त्यांच्यातील संशोधक जागृत करण्याचे काम अधिक परिणामकारकरित्या करता येईल असा मला विश्वास वाटतो.