छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar
सातत्याने आर्थिक फसवणुकीच्या बातम्या येत असताना देखील अनेकांना जास्तीचा नफा मिळेल अशा भाबड्या आशेने हजारो रुपयांना गमवावे लागत आहे. एका लष्करी जवानाला मोठ्या नफ्याचा मोह चांगलाच महागात पडला. पै-पै करून जोडलेले दहा लाख रुपये त्यांना गमवावे लागले.
डीमॅट खाते उघडून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ती रक्कम डॉलरमध्ये परावर्तित करून नफा कमवण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी लष्करी जवानाला ९ लाख ८९ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार २९ एप्रिल ते २४ ऑगस्ट या काळात छावणी भागात घडला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुदीप कुमार दीक्षित आणि सुनील सोलंखे, अशी भामट्यांची नावे आहेत. महेंद्रकुमार रंगबाज सिंग (३८ रा, छावणी) हे फिर्यादी आहेत. ते महाराष्ट्र एनसीसी बटालियन, उस्मानपुरा येथे जुलै २०२२ पासून हवालदार या पदावर कार्यरत आहेत. २९ एप्रिल रोजी त्यांना आरोपी सुदीप कुमार दीक्षित याने व्हॉट्स अपवर शेअर मार्केटमध्ये एफएक्स प्लस ५०० या कंपनीमध्ये डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी लिंक पाठवली होती. महेंद्रकुमार यांनी त्याला फोन करून, तू अगोदर तुझे आधार कार्ड, पॅन कार्ड पाठव, नंतरच मी तुझ्याकडून डीमॅट खाते उघडून घेईन, असे सांगितले. त्यानंतर सुदीप कुमारने लगेचच आधार कार्ड, पॅन कार्डचे फोटो व्हाट्स अपवर पाठविल्याने महेंद्रकुमार यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यांनी त्याला पॅन कार्ड, आधार कार्ड पाठवून डीमॅट खाते उघडले.
डीमॅट खाते उघडल्यावर २९ एप्रिल रोजी सुदीपकुमारने दिलेल्या कंपनीच्या खात्यावर महेंद्रकुमार यांनी ७६ हजार पाठविले. त्यावर १५६ डॉलर बोनस मिळाले. महेंद्रकुमार यांच्या खात्यावर ७७९ डॉलर जमा झाले होते. महिनाभरात दररोज ३० ते ३५ डॉलर नफा मिळत होता. खात्यावर १२६८ डॉलर जमा झाले. त्यांनी ६०० डॉलर विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला असता विड्रॉल झाले नाही. त्यानंतर सुदीपकुमारने वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेली. तसेच मॅनेजर सुनील सोलंखे मार्गदर्शन करतील, असे सांगितले. सोलंखेने आणखी पैसे भरावे लागतील, असे सांगून ९ जूनला ७० हजार, ३ जूनला १ लाख ७१ हजार, ४ जूनला १ लाख ७२ हजार, असे चार लाख १३ हजार उकळले. त्यानंतरही महेंद्रकुमार यांचे पैसे विड्रॉल झाले नाहीत. यावरून आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.