नवी दिल्ली – New Delhi
आय-लीग फुटबॉल स्पर्धेचे 14 वे पर्व 9 जानेवारी 2021 पासून सुरू होणार आहे. सर्व सामने कोलकात्यात रंगणार आहेत.
9 जानेवारीपूर्वी 15 दिवस सर्व 11 संघांना बायो सेक्युअर बबलमध्ये प्रवेश करावा लागणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना करून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. लवकरच स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण 1 स्पोर्ट या वाहिनीवर केले जाईल. ऑॅक्टोबर महिन्यात आय-लीगसाठी पात्रता फेरी घेण्यात आली होती. यासाठी पश्चिम बंगाल सरकार, भारतीय फुटबॉल संघटना आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने एकत्र येऊन सामन्यांचे आयोजन केले होते.
स्पर्धेच्या पहिल्या भागात सर्व अकरा संघ एकमेकांविरोधात प्रत्येकी एक सामना खेळतील. त्यातून टॉप सहा संघ निवडले जातील. हे सहा संघ पुन्हा एकमेकांविरोधात प्रत्येकी एक सामना खेळतील. जो संघ सर्वांत जास्त गुण जमा करेल तो आय-लीगचा विजेता म्हणून घोषीत केला जाईल. कोरोनाची स्थिती पाहता सर्व सामने केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून खेळवले जाणार आहेत.