Friday, May 3, 2024
Homeअग्रलेखजलसंवर्धनाचे शहाणपण कायमचे यायला हवे

जलसंवर्धनाचे शहाणपण कायमचे यायला हवे

राज्याच्या धरणांत 48 टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा साधारणत: सहा टक्क्यांनी कमी असल्याचे सांगितले जाते. नाशिक जिल्ह्यात एका धरणातील पाणीसाठा तळाशी गेला आहे. दहा धरणांमधील जलसाठा त्यांच्या क्षमतेच्या निम्म्याहून कमी आहे. गंगापूर धरणात (Gangapur Dam) 67 टक्के जलसाठा आहे.

नाशिक शहरवासियांवर पाणीकपातीचे संकट (Crisis of water scarcity) घोंघावत आहे. एप्रिल महिन्यापासून आठवड्यातून एक दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. कमी दिवसात धोधो पडणारा पाऊस, वाहून जाणारे पावसाचे पाणी, पावसाळा संपता संपता अनेक वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई आणि टँकरची वाढत जाणारी मागणी हे दरवर्षीचेच चित्र आहे. यंदाचे वर्षही त्याला कदाचित अपवाद नसेल. यंदाच्या हंगामी पावसाळ्यावर एल निनोचे सावट असू शकेल असा इशारा अमेरिकन हवामान संस्थांनी दिला आहे. भारतीय हवामान खात्याने अद्याप तरी तसा अंदाज व्यक्त केल्याचे ऐकिवात तरी नाही. तथापि आगामी एक-दोन महिने एलनिनोवर चर्चा होत राहील.

- Advertisement -

एलनिनोमुळे पावसाची सरासरी कमी होऊ शकेल असे तज्ञ सांगतात. मार्च ते मे महिन्यादरम्यान महाराष्ट्राच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याची चुणूक फेब्रुवारी महिन्यातच लोकांनी अनुभवली. यंदाचा फेब्रुवारी महिना 123 वर्षातील सर्वाधिक उष्ण महिना ठरल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले होते. वाढत्या उष्णतेने बाष्पीभवनाचा वेगही वाढतो. उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर त्याचाही परिणाम जलसाठ्यावर होण्याचा धोका आहे. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे.

लोकांनीही त्याला साथ देणे अपेक्षित आहे. प्रश्न फक्त संभाव्य पाणीटंचाईचाच नाही. 2025 पर्यंत जगातील निम्मी लोकसंख्या पाणीटंचाईची बळी ठरेल असा भीतीदायक इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. तात्पर्य जलसंवर्धन आणि पाण्याचा विवेकपूर्ण वापर हाच त्यावरचा सध्याचा व्यवहार्य उपाय आहे. त्यातील मर्म लोक लक्षात घेतील का? पाण्याची बेसुमार उधळपट्टी ही देखील मोठीच समस्या आहे. पाण्याचा वाट्टेल तसा वापर केला जातो. अगदी छोट्या छोट्या सवयींमधले बदल पाणी वाचवू शकतात.

वाहने नळी लावून धुतली जातात. पिण्यासाठी घेतलेले पाणी अर्धेअधिक फेकून दिले जाते. खरकटी भांडी नळ सुरु करुन धुतली जातात. पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर समस्येची तीव्रता वाढवतो. प्लास्टिक प्रदुषणात भर पडते. बेसिनचा नळ सुरु ठेवून काही कामे केली जातात. अंगणात बादलीभर पाण्याचा सडा मारला जातो.

स्नानासाठी शॉवरचा वापर पाण्याची नासाडी करतो. अनेकांच्या घरात वर्षानुवर्षे नळ गळके असतात. बागेला नळी लावून पाणी घालतात. या सवयींमधले सकारात्मक बदल शेकडो लिटर पाणी वाचवले जाऊ शकते. पाणी मुबलक मिळते म्हणून त्याची उधळपट्टी नको. पाऊस भरपूर पडला की शहाणपणही वाहून जाते असा नेहमीचा अनुभव आहे. हे शहाणपण फक्त पाणीटंचाईच्या काळात येणे परवडणारे नाही. ते कायमचे यायला हवे. त्यातच समाजाचे जलहित दडलेले आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या