Wednesday, January 7, 2026
Homeनाशिकनाट्यगृहे कथा अन् व्यथा : सातपूरच्या 'टाऊन हॉल'चा वनवास संपणार केव्हा?

नाट्यगृहे कथा अन् व्यथा : सातपूरच्या ‘टाऊन हॉल’चा वनवास संपणार केव्हा?

सातपूर | रवींद्र केडिया | Satpur

सातपूर परिसर (Satpur Area) म्हणजे कष्टकरी, कामगार, शेतकरी, उद्योजक यांचा संमिश्र परिसर आहे. या परिसरात मोठ्या उद्योगांमध्ये हजारो कामगार काम करतात. उद्योजकांच्या संघटनेप्रमाणेच कामगारांच्या संघटनाही कार्यरत आहेत. मात्र या सर्व नागरिकांसाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी मनपाने (NMC) उभारलेले नाट्यगृह ‘टाऊन हॉल’ उभारण्यात आलेला असून त्याची स्थिती म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सातपूर परिसरातील सुमारे दोन ते अडीच लाख नागरिकांच्या वसाहतींसाठी सातपूर मनपा विभागीय कार्यालयालगत ‘टाऊन हॉल’ बांधण्यात आला होता. तत्कालीन सातपूर नगरपालिकेच्या अस्तित्वात असण्यापासून त्याची उभारणी करण्यात आली होती.

- Advertisement -

कालांतराने नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) अस्तित्वात आल्यानंतर या टाऊन हॉलवर कोट्यवधी रुपये खर्च करून विकास व दुरुस्ती करण्यात आली. सातत्याने दुरुस्तीसाठी यावर खर्च करण्यात आला. मात्र कोट्यवधींचा खर्च करूनही या टाऊन हॉलमध्ये एकही कार्यक्रम अथवा नाटक होऊ शकले नसल्याने हे नाट्यगृह कुचकामी ठरले आहे. परिसरात असलेल्या कामगार संघटनांना दरवर्षी वार्षिक सभा, संमेलन घ्यावे लागतात. त्यांना त्यांच्या क्षमतेचा हा हॉल नसल्याने त्याला दुय्यम स्थान दिले गेले.तर सभा संमेलने, स्थानिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध सभागृहांच्या तुलनेत जादा पैसे मोजावे लागत असल्याने नागरिकांनीही त्याकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. टाऊन हॉलच्या मांडणीत त्रुटी असल्याने नागरिक पसंती देत नसल्याचाही सूर ऐकायला मिळत आहे. तर काही अंधभक्तांनी या वास्तूतच दोष असल्याचे सांगितले. या हॉललगत उंच पाण्याची टाकी होती. ती वास्तूनुसार उंच ठरत असल्याने अखेर मनपाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी ती स्थलांतरीतही केली. मात्र टाऊन हॉलची (Town Hall) दुर्दशा थांबवता आली नाही.

YouTube video player

आज सातपूरचा हा टाऊन हॉल सध्या भंगार सामानाचे गोदाम झाला आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाने सर्व साहित्य ठेवण्याचे गोदाम म्हणून त्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या परिसरात अस्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणात घाण, कचरा साठवण्याचे केंद्र बनले आहे. प्रेक्षकांना (Audience) बसण्यासाठी उभारलेल्या खुर्चा जळमटांनी व्यापलेल्या असून त्या उंदरांनी कुरतडून टाकल्या आहेत. कलाकारांसाठी रंगमंचावर उभारलेला लाकडी फळ्याच्या व्यासपीठ पुरता उखडून गेला आहे. पावसाचे पाणी आत येत असल्याने लाकडी फळ्या सडून गेल्या आहेत. प्रकाश योजनेसाठी उभारण्यात आलेली विद्युत प्रणाली सडून गेली आहे, तर लटकवलेले पंखे गंजून गेले आहेत. कलाकारांचे आदराचे स्थान असलेल्या या रंगभूमीची दुरवस्था कधी व कशी संपणार, हा प्रश्न सातपूरकरांना पडला आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...