अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अपघातग्रस्त ट्रकवर डल्ला टाकून त्यामधील टायर व साहित्य (तांबे) चोरी करणार्या वांबोरी (ता. राहुरी) येथील टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 3 लाख 60 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईची वांबोरी परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
ओंकार ज्ञानदेव पवार (वय 25), शुभम जनार्धन जाधव (वय 21), मयुरेश शाम मोरे (वय 22), सचिन महादेव शेळके (वय 25), फिरोज अनिस शेख (वय 31), दीपक सुभाष शिंदे (वय 32, सर्व रा. वांबोरी, ता. राहुरी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तामिळनाडू येथील मुर्ती रामस्वामी सेलप्पाकांऊडर (वय 51) यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (8 जुलै) फिर्याद दिली आहे. टीएन 52 एच 4443 क्रमांकाचा ट्रक चेन्नई येथील जैन रिसोर्स रिसायलींग लिमिटेड या कंपनीमधून माल घेऊन अहमदाबाद (गुजरात) येथील मारूती रिसायलींग कंपनीकडे जात असताना, ट्रकचा वांबोरी घाट, डोंगरगण शिवारात अपघात होऊन तो दरीत कोसळला होता. अपघातात ट्रक चालक व सुरक्षा रक्षक जखमी झाले, तर ट्रकमधील काही साहित्य रस्त्यावर पडले होते. याच संधीचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी सहा टायर व इतर साहित्य लंपास केले होते.
दरम्यान, या चोरीप्रकरणाचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत वांबोरी (ता. राहुरी) येथील सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या सर्व संशयित आरोपींनी तपासात गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून ट्रकचे सहा टायर व इतर साहित्य असा एकूण 3 लाख 60 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, प्रभारी उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चौधरी, उपनिरीक्षक मनोज मोंढे, अंमलदार मोहम्मद शेख, अनिल आव्हाड, आदिनाथ पालवे, सुशांत दिवटे, विष्णु भागवत, जयसिंग शिंदे, ज्ञानेश्वर तांदळे, सुरज देशमुख यांच्या पथकाने केली आहे.
दरम्यान, ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघात प्रकरणी चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशोक कुमार मुरगन (रा. 89 किला स्ट्रीट, अकराई पट्टी, अंचतविल, श्रीविल्लीपुथुर, तमिळनाडू) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव असून जखमी गुप्ता बहादुर कांचा गुरंग (वय 43 रा. चिलगलाईन लोकसान नगरकट्टा, जलपाईगुरी, पश्चिम बंगाल) यांनी फिर्याद दिली आहे.




