Friday, May 24, 2024
Homeमुख्य बातम्या...तर पाणीकपातीचा निर्णय

…तर पाणीकपातीचा निर्णय

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराच्या पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणाचा पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याने व पावसाची शक्यता दुरावल्याने पाणी कपातीचे संकट घोंगावत आहे. चार दिवसात पावसाचे संकेत न मिळाल्यास नाशिककरांवर पाणी कपातीचा भार टाकावा लागणार असल्याचे प्रभारी मनपा आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी सूतोवाच केला.

- Advertisement -

राज्य शासनाने अल निनो व बिपरजॉय या दोन वादळांच्या पार्श्वभूमीवर पाऊस लांबण्याची शक्यता व्यक्त करुन पाणी कपातीबाबत नियोजन सादर करण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीत नाशिक महानगरपालिकेने सुरेख नियोजन सादर करून, राज्यासाठी आदर्श नियोजन पद्धत दाखवून दिली होती.

नाशिक महानगराची सादर केलेल्या कृती आराखड्याची माहिती घेऊन राज्याने कृती आराखडा बनवण्याच्या सूचना राज्य शासनाने इतर सर्व महानगर पालिकांना देत नाशिकच्या नियोजनाचे कौतूक केले होते.

दुर्दैवाने आदर्श आराखडा देऊनही प्रशासनाने ठोस भूमिका ंन घेतल्यामुळे धरणातील पाणी कमी होऊन जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी आता चर खोदण्यावर खर्च करण्याची वेळ आली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नव्याने प्रभारी आयुक्तपदाचा पदभार घेतलेल्या भाग्यश्री बानायत यांनी याबाबत चिंता व्यक्त केली व येत्या चार दिवसात पावसाचे संकेत न मिळाल्यास नाशिक शहराच्या पाणीकपातीचा निर्णय जाहीर केला जाईल असा सूतोवाच केले.

खरीप हंगामाबाबत चिंता

जिल्ह्यात पूर्व मान्सूननेही फिरविलेली पाठ आणि पडत असलेले तीव्र ऊन यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे.जून महिना संपत आला असून शेवटचे सात दिवस बाकी आहे.जिल्ह्यात रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्र कोरडेच गेले असून गुरुवार (दि.22)पासून सुरु झालेल्या आद्रा नक्षत्रालाही कोरडाच प्रारंभ झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये खरीप हंगामाबाबत चिंता आहे.आद्रा नक्षत्राच्या उर्वरित कालावधीत पाऊस येईल,असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. हा पाऊस पडल्यानंतर खरीप पेरण्यांना वेग येणार आहे.मात्र,या पेरण्यांना आधीच उशीर झाल्याने खरीप हंगाम लांबणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या