नाशिक | सारिका पूरकर-गुजराथी | Nashik
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा (Eco Friendly Ganeshotsav) आग्रह दरवर्षी धरला जातो. शाडू माती मूर्ती (Shadu Clay Idol) आणि मूर्तिदान हे उपक्रम त्यासाठीच दरवर्षी जोमाने राबविले जात आहेत. असे असले तरी शाडू मातीच्या मूर्तीच्या किंंमती अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसल्यामुळे गणेशभक्त पीओपी गणेश मूर्तींंनाच (POP Ganesha Idols) पसंती देत असल्याचे चित्र आहे.
शाडू मातीच्या मूर्तीचा आग्रह एकीकडे धरला जात असताना प्रयत्न करुनही आवश्यक त्या प्रमाणात मूर्ती निर्मितीच शक्य होणार नसेल आणि या मूर्तीच्या किंमतीच कमी होणार नसतील तर ठराविक प्रमाणातच शाडू माती मूर्ती बसविण्याचे प्रमाण कायम राहणार आहे. त्यातच आता मूर्ति दान उपक्रमामुळे पीओपी मूर्ती बसवून आपण कोणतेही पर्यावरण नुकसान करत नसल्याचीही भावना सर्वसामान्यांमध्येे बळावत चालली आहे. दुसरीकडे पाण्यात विरघळवलेली शाडू माती मूर्ती झाडांना (Trees) देखील टाकून उपयोग नसल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मग पीओपीची मूर्तीच काय वाईट? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
कमी किंमतीत चांगली फिनिशिंग
कोणतीही गोष्ट सर्वसामान्यांच्या आवाक्यात असेल तरच तिचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. शाडू माती मूर्तीबाबत देखील हाच निकष आहे. या मूर्ती महाग मिळतात. उदाहरणार्थ शाडू मातीची दीडफूट उंचीची गणेश मूर्ती जर २१०० रुपयांना मिळत असेल तर पीओपीची त्याच आकाराची गणेश मूर्ती ही केवळ १५०० रुपयांत उपलब्ध होते. हीच किंमतीतील तफावत अन्य आकारातील गणश मूर्तीबांबतीतही आढळते. शिवाय तुलनेत पीओपीच्या मूर्तीला सुंदर फिनिशिंग, आकर्षक रंगकाम, दागिन्यांची कलाकुसर अधिक प्रमाणात केेलेली दिसून येते. म्हणूनच मग सर्वसामान्य पीओपी गणेश मूर्ती घेऊन मोकळे होत आहेत.
शाडू माती मूर्ती भविष्यातही महागच मिळणार
भविष्यात मूर्तीच्या किंमती कमी करुन ती खरेदी करण्याचे प्रमाण वाढवता येईल का? या प्रश्नावर शहरातील विक्रेत्यांनी नकारार्थी मान हलवली आहे. शाडू माती मूर्ती कधीच स्वस्त मिळणार नाही अशी स्पष्टोक्तीच त्यांनी देऊन टाकली आहे. याची कारणमीमांसा म्हणजे शाडू माती ही गुजरातमधून पेण-पनवेलमध्ये आणली जाते. ही माती देखील काही वेळेस योग्य प्रमाणात उपलब्ध होत नाही. शाडू मातीची मूर्ती ही पीओपीसारखी संपूर्णपणे साच्यात तयार होत नाही. मूर्तीला हात व इतर बारकावे नंतर मूर्तीकार हाताने घडवतात. शिवाय या मूर्तीचे नंतर सॅण्डिंग, रंगकाम हे देखील सोपे नसते. त्यामुळे फिनिशिंगही सोपे नसते. यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे या मूर्ती पेण-पणवेलमधून नाशिक व इतर शहरात ट्रान्सपोर्टने आणताना होणारे नुकसान जास्त असते. या प्रवासात अनेक मूर्ती भंग पावतात, या मूर्ती गणेशभक्तांना विकता येत नाहीत. त्यामुळे हे आर्थिक नुकसान विक्रेत्यांना सहन करावे लागते. याचा विचार करता भविष्यातही या मूर्ती स्वस्त दरात उपलब्ध होणार नसल्याचे सूतोवाच शहरातील विक्रेत्यांनी करुन टाकले आहे.
व्यापक प्रमाणात निर्मितीच शक्य नाही
भविष्यात जरी शाडू माती गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणावर, घरोघरी पोहोचवायचे ठरवले तरी तेवढी निर्मितीच शक्य होणार नाही, असेही वास्तव आहे. कारण एक पीओपी गणेश मूर्ती तयार करण्यासाठी जेव्हढा वेळ लागतो, तेव्हढ्याच वेळात १० पीओपी गणेश मूर्ती तयार होतात. शिवाय शाडू माती गणेश मूर्ती वाळायला पंधरा दिवस लागतात, त्या तुलनेत पीओपी मूर्ती झटकन वाळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मूर्ती बनवणे सहज शक्य होते. शाडू माती मूर्तीबाबत हे शक्य होणार नाही त्यामुळे पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा कितीही आग्रह धरला तरी शाडू माती मूर्ती मर्यादित स्वरुपातच उपलब्ध राहणार आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
गेल्या ३२ वर्षांपासून शाडू माती मूर्ती विक्री व्यवसाय आम्ही करीत आहोत. शाडू माती मूर्ती ३५० रुपयांपासून ३००० रुपयांपर्यत उपलब्ध असते. परंतु या मूर्तीची फिनिशिंग व पीओपी मूर्तीचे फिनिशिंग यात फरक पडतोच. पीओपीचे रंगकाम स्प्रे पद्धतीने होते, तर शाडू मातीला हाताने प्लेन करावे लागते. मनुष्यबळ, निर्मितीशुल्क याबाबतही शाडू माती मूर्ती निर्मितीसाठी जास्त असतात. त्याचा परिणाम मग या मूर्तीच्या किंंमतीवर होतो. मूर्ती निर्मितीही काही शहरांपुरतीच मर्यादित असल्यामुळे देखील शाडू माती मूर्ती प्रमाण पीओपीच्या तुलनेत कमीच राहते. म्हणनूच विक्रेतेही पीओपीच्या मोठ्या आकारातील पीओपी मूर्ती ठेवून त्यांचे स्टॉल आकर्षक करण्याचा प्रयत्न करतात. कारण सर्वसामान्यांना गणपती बाप्पाचे दागिन्यांनी सजलेले, आकर्षक रंगातील वस्त्र परिधान केलेले रुप पाहायची सवय असते. शाडू माती मूर्तीत यावर मर्यादा येतात. त्यामुळे आजही ठराविक मर्यादेपर्यंतच शाडू मातीची मूर्ती खरेदी केली जात आहे.
विजय पाटील, शाडू माती गणेश मूर्ती विक्रेते, नाशिक