सुरेखा बोऱ्हाडे
भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.
यशस्वी पुरुषाच्या मागे स्री असते असे म्हटले जाते. स्त्रियांच्या भक्कम पाठिंब्यामुळे पुरुषांनी पराक्रम गाजवल्याची अनेक उदाहरण आहेत. स्री स्वतः मागे राहते पण आपला पती व मुलगा यास कायम प्रोत्साहन देत असते. परंतु इतिहासात अशी काही उदाहरणे आहेत की पत्नीच्या योग्य मार्गदर्शनामुळे तसेच परखड व स्पष्टवक्तेपणामुळे अद्वितीय अशी व्यक्तिमत्त्वे उदयास आली. यामध्ये कविश्रेष्ठ कालिदास यांची पत्नी राजकुमारी विद्योत्तमा हिचे नाव प्रकर्षाने पुढे येते. या महान कवीने भारतवर्षातील अद्वितीय अशा काव्यसाहित्याची निर्मिती केली. न भूतो न भविष्यती अशा वाङ्मयाची रचना त्यांनी केली. या त्यांच्या कार्यामागे त्यांच्या पत्नीची भूमिका मोठी होती, असे म्हटले जाते. याबाबत लोकपरंपरेने आलेल्या कथा आहेत. त्या जाणून घेणे रोचक आहे.
राजा शारदानंद यांची अतिशय विद्वान आणि शास्त्रर्थाचे आगाध ज्ञान असलेली कन्या विद्योत्तमा होती. विद्योत्तमाने आपल्या विद्येने आणि वाक्चातुर्याने अनेक विद्वानांना पराजित केले होते. तिचे सौंदर्य आणि विद्वत्तेमुळे अनेकजण तिच्याशी विवाह करण्यास उत्सुक होते. परंतु तिने प्रतिज्ञा केली होती की जो कोणी तिला शास्त्राच्या वादविवादात हरवेल त्याच्याशी ती विवाह करेन. विद्योत्तमाशी विवाह करण्याच्या हेतूने अनेक विद्वान पंडितांनी तिच्याशी वादविवाद केला. तिला हरवण्यासाठी आपल्या विद्येचा कसून उपयोग केला. परंतु राजकुमारी विद्योत्तमाच्या पंडित्यापुढे, ज्ञानापुढे कोणाचाही टिकाव लागला नाही. या अपमानाने अनेक विद्वान क्रोधित झाले आणि विद्योत्तमाचा बदला घेण्याचे त्यांनी ठरवले.
ते जंगलामध्ये एकत्र जमले होते व विद्योत्तमाचा विद्येचा गर्व कसा उतरवता येईल या विषयावर चर्चा करत होते. कशाही प्रकारे तिचा बदला घेण्याविषयी ते विचार करत होते. तेव्हा त्यांचे लक्ष एका व्यक्तीकडे गेले. ती व्यक्ती झाडाच्या फांदीवर बसून तीच फांदी तोडत होता. त्याच्याशी बोलल्यावर हा व्यक्ती मूर्ख आणि अशिक्षित आहे असे त्यांना वाटले. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कालिदास होते. अशा मूर्ख व्यक्तीबरोबर विद्योत्तमाचा विवाह करून द्यावा या हेतूने विद्वानांनी त्यास तयार केले. त्यांनी कालिदासाला सांगितले की, विद्योत्तमाच्या प्रश्नांची मूकपणे उत्तरे द्यायची. कालिदास मूढबुद्धी असला तरी दिसायला अतिशय सुंदर होता. त्यांनी कालिदासची ओळख खूप बुद्धिमान, श्रेष्ठ विद्वान अशी करून देत विद्योत्तमासमोर हजर केले. विद्योतमा मौन भाषेत त्यास गुढ प्रश्न विचारू लागली. कालिदास त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या कुवतीनुसार मूकपणाने हातवारे करत देऊ लागला. तिला वाटले तो आपल्या मूक गुढ प्रश्नांची उत्तरे गुढपणे मूक राहून देत आहे. विद्योत्तमाने त्याच्यावर खूश होत शेवटचा प्रश्न विचारला. या प्रश्नात तिने त्याला मोकळ्या हाताचा पंजा दाखवला. कालिदासाला वाटले की, ती आपल्याला या हाताने थप्पड मारणार आहे म्हणून उत्तरादाखल त्याने आपला राग डोळ्यांद्वारे दाखवला. विद्योत्तमला वाटले पाच इंद्रिय जरी वेगळी असली तरी त्यांचे कार्य एका मनाद्वारे चालवले जाते व नियंत्रित केले जाते. हेच योग्य उत्तर तो देतो आहे. त्याच्या उत्तराने विद्योत्तमाचे समाधान झाले. कालिदास आणि विद्योत्तमाचा विवाह थाटामाटात झाला.
विवाहानंतर लवकरच तिला कालिदासचा मूढपणा लक्षात आला.आपल्याला फसवले गेलेय हे तिच्या लक्षात आले. अज्ञानी नवर्याशी संसार करणे तिला आवघड वाटत होते. तेव्हा विद्योत्तमाने कालिदासाचा परखड शब्दांत धिक्कार केला आणि त्याला अस्वीकार केले. तिने कालिदासाला कठोरपणे सांगितले की, तू जर विद्वत्ता आणि प्रसिद्धी प्राप्त करून आलास तरच मी तुझा पती म्हणून स्वीकार करेन. कालिदास मूढ होता तरी पत्नीच्या या तीव्र वाक्बाणांनी त्याचे अंत:करण विव्हळ झाले. त्याला पत्नीने केलेल्या अपमानाची, अवहेलनेची बोच लागली. कालिदास पत्नीच्या या निर्भेत्सनेने खूप दुःखी झाला. आपण ज्ञान प्राप्त केले पाहिजे असे त्याला प्रकर्षाने वाटू लागले. या दु:खात तो वन-वन भटकला.
ज्ञानप्राप्तीसाठी अनेक ठिकाणी फिरले. शेवटी ज्ञानप्राप्तीच्या लालसेने ते कालीमातेच्या मंदिरात आले. त्यांनी कालीमातेची मनोभावे उपासना केली. तेथे राहून त्यांनी खडतर ज्ञानोपासना केली. अखेर ज्ञानप्राप्तीसाठी केलेल्या कठोर परिश्रमाने आणि स्वयंअध्यनाने कालिदास महान ज्ञानी व विद्वान झाले. ज्ञानप्राप्ती करून कालिदास घरी आले. आपल्या घराचा दरवाजा खटखटवत म्हणाले,
कपाट्म उद्धाय्य सुन्दरी । (दरवाजा उघड सुंदरी)
विद्योत्तमा या स्पष्ट सुंदर वाणीने आश्वर्यचकित होऊन म्हणाली, अस्ति कश्चिद् वाग्विशेष: (दरवाजावर कोणी विद्वान आला आहे.)
पुढे विद्योत्तमाला कालिदासांनी कायमच आपला मार्गदर्शक गुरू मानले. पत्नीच्या वरील वाक्यांना त्यांनी आपल्या काव्यातही मोठ्या मानाची जागा दिली. आपल्या जीवनकाळात त्यांनी कुमारसंम्भव, रघुवंश, मेघदूत अशा अमर काव्यकृतींची रचना केली. भारतातील पौराणिक कथा आणि दर्शन याच्या आधारावर त्यांनी अनेक साहित्यरचना केल्या. या साहित्यरचना भारतीय जीवन आणि दर्शन यांची विविध रूपे आणि त्यातील मूलतत्त्वांचे दर्शन घडवतात.
भारतवर्षाला ही महान काव्यविभूती प्राप्त झाली ती विद्वान विद्योत्तमामुळेच ही गोष्ट विसरून चालणार नाही. राजा विक्रमादित्यच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न म्हणून पुढे त्यांचा नावलौकिक झाला. कृष्ण कुमार यांनी 1984 मध्ये कालिदास का विवाह हे नाटक लिहिले. हे नाटक कालिदासचा विवाह या लोकप्रिय कथेवर आधारित आहे.
पती कालिदास ज्ञानसाधनेला लागला आणि पुढेही पत्नीला कायमच गुरुरूपात त्यांनी पाहिले. या कारणांमुळे एका सामान्य स्रीसारखा तिचा संसार झाला नाही. जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण!