Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यापार्किंगमध्येच थाटली दुकाने

पार्किंगमध्येच थाटली दुकाने

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

सिडको ( CIDCO )या गृहनिर्माण संस्थेने सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत सिडकोच्या 1 ते 6 योजना अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीच्या मध्यावर निर्माण केल्या. मात्र वाढत्या लोकसंख्येसोबतच येथे अतिक्रमण वाढले आणि यामुळे वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न भेडसावू लागला.

- Advertisement -

सध्याच्या नवीन नाशिक परिसरात त्रिमूर्ती चौक, पवननगर, शिवाजीचौक शॉपिंग सेंटर, दत्तचौक, महाजननगर आदी परिसरात भाजी मार्केट आहेत. यातील त्रिमूर्ती चौक परिसरात टपरीधारकांना सिडको प्रशासनाच्या वतीने गाळे देण्यात आले. कालांतराने येथे भाजी व्यवसायासोबतच इतर व्यवसायदेखील सुरु झाले. मुख्य रहदारीचा परिसर म्हणून या परिसराची ओळख आहे. याठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात न आल्याने येथे वाहनांची कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याठिकाणी काही व्यावसायिकांनी तर आपला गाळा सोडून बाहेरच आपले दुकान थाटले आहे. व त्याच्या पुढे वाहनांची पार्किंग होते. परिणामी अर्धा रस्ता हा वाहनांनी भरला गेल्याने वाहतुकीची कोंडी होते.

पवननगर येथील जिजामाता भाजी मार्केट च्या पार्किंगच्या जागी फळ विक्रेते व अन्य व्यावसायिकांनी आपले दुकाने थाटल्याने वाहनचालकांना आपली वाहने रस्त्यावर लावावी लागल्याने येथे दररोजच वाहतुकीचा खोळंबा होत असतो. या प्रश्नाकडे मनपा अतिक्रमण विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथे भाजी मार्केटसाठी सिडको प्रशासनाने पक्के गाळे बांधून दिले असले तरी सकाळच्या व सायंकाळच्या वेळी लेखानगरच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रेते बसलेले असतात.

शनिवार व रविवारी या रस्त्याला तर जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. यामुळे सदरहू रस्त्यावरून मार्गक्रमण करणे फार कठीण असते. महाजन नगर येथे महावितरणच्या अति उच्च दाबाच्या लाईनच्या खालीच धोकेदायक पद्धतीने भाजी बाजार दररोजच थाटला जातो.याठिकाणी तर पार्किंगची कुठलीही व्यवस्थाच नसल्याने भाजी बाजारात आलेले ग्राहक रस्त्यावरच आपली वाहने लावल्याने सायंकाळच्या वेळी येथे वाहतुकीची कोंडी होत असते. संपूर्ण नवीन नाशिकचा विचार केला असता पार्किंगच्या ठिकाणी काही ना काही अतिक्रमण झाल्याचे दिसते तर भाजीबाजार परिसरांत रस्त्यावरील पार्किंगमुळे होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी मनपा अतिक्रमण विभाग व वाहतूक शाखेने संयुक्तिक कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या