Sunday, November 3, 2024
Homeशब्दगंधसुखी संसारासाठी

सुखी संसारासाठी

ललित फिरके

प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष, अडचणी व समस्या असतातच. कुणाच्या आयुष्यात कमी तर कुणाच्या आयुष्यात जास्त प्रमाणात असतात. या समस्यांना आपल्याला तोंड द्यावेच लागते. त्यालाच जीवन संघर्ष म्हणतात. परंतु बर्‍याच वेळा संकटे एकामागोमाग आली की, माणूस खचून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अशा परिस्थितीत त्याची मानसिक स्थिती भक्कम करण्याची नितांत गरज असते.

- Advertisement -

एवढेच नाही तर आपल्या जोडीदाराबरोबर संसार करत असताना अनेकवेळा एकमेकांशी खटके उडतात, काहीवेळा भांडणेही होतात. परंतु यातही तडजोड करून आयुष्याची गाडी पुढे चालवत नेणे उचित असते. अशावेळी एकमेकांमधील गैरसमज दूर करून भांडणानंतर लागलीच दोघांनी समजूतदारपणाची भूमिका घ्यायची असते. मात्र अनेकवेळा ही परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे वाद वाढत जावून विकोपाला जातात. अशावेळी या परिस्थितीला कसे सामोरे जावे? एकमेकांशी कसा समन्वय साधावा? घरातील व्यक्तींशी कसे वागावे? अशा एक ना अनेक बाबींवर भांडणाच्या पलिकडे जावून विचार करणे गरजेचे असते. हेच महत्त्वपूर्ण कार्य प्रा.देवबा शिवाजी पाटील यांनी सुखी संसारासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे.

प्रा.देवबा शिवाजी पाटील हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध विषयांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यात धार्मिक स्तोत्रे, संत चरित्र, काव्यसंग्रह, देशभक्ती काव्यसंग्रह, युवा काव्यसंग्रह, विज्ञान काव्यसंग्रह, प्रेम काव्यसंग्रह, कथासंग्रह, शैक्षणिक, वैज्ञानिक लेखसंग्रह, युवा लेखसंग्रह, सामाजिक व वैचारीक लेखसंग्रह, अभ्यासक्रमिक, बालकुमार साहित्य, शालोपयोगी बालकाव्यसंग्रह, देशभक्ती बालकाव्यसंग्रह, विज्ञानकोडी बालकाव्यसंग्रह, किशोर काव्यसंग्रह, विज्ञान किशोर काव्यसंग्रह, कुमार काव्यसंग्रह, बालकुमार काव्यसंग्रह, विज्ञान बालकुमार कथासंग्रह, समीक्षाग्रंथ अशा नानाविध प्रकारच्या ग्रंथांचा समावेश आहे. त्याबद्दल त्यांना अनेक संस्था व संघटनांतर्फे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. ते शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही कार्यरत असून समाजप्रबोधनपर लेखनावर त्यांचा भर आहे.

सुखी संसारासाठी या पुस्तकाचे मुखपृष्ठ बरेच काही सांगून जाते. सूत्रे व समीकरणाच्या माध्यमातून सुखी संसार सांगितला आहे. आळसाला शून्य करून संशयाला वजा केले आणि संयमाला अधिक केले तर संसार सुखी होतो. तसेच सुखी संसारासाठी श्रद्धा, शील, आनंद व समाधान यांची बेरीज केली पाहिजे. नात्यांतून मत्सर वजा करावा. कष्टाला मनोरंजनाने भागावे. सुस्वभावाला सदाचाराने गुणावे. प्रयत्नांचा व सद्गुणांचा वर्ग करावा. प्रेम व नम्रता सोबत घेवून चालावे. तसेच विचार व चिंतनाचा घन करावा. अशा सगळ्या बाबी केल्यास सुखी संसार होत असल्याचे गणितीय सूत्रातून मुखपृष्ठाद्वारे पटवून देण्यात आले आहे.

नवविवाहितच नव्हे तर पालकांसाठीही हे पुस्तक दिशादायी, बहुपयोगी, वैचारीक, उद्बोधक व प्रेरणादायक आहे. चैतन्यप्रद लेखसंग्रह म्हणून प्रा.देवबा शिवाजी पाटील यांनी या पुस्तकाला उपशीर्षक दिले आहे. प्रत्येक प्रकरणातून खर्‍याअर्थाने चैतन्य प्रदान करण्याचे काम हे पुस्तक करते. अगदी शुभविवाहापासून ते पालकांच्या भूमिकेपर्यंत यात प्रकरणांची क्रमनिहाय मांडणी केली आहे. वैवाहिक समस्या उद्भवल्यास मतभेदाचे रूपांतर मनभेदात होवू नये यासाठी मानसशास्त्राच्या सिद्धांतानुसार या पुस्तकातील प्रत्येक लेख हा मोकळ्या मनाने, शांत चित्ताने व एकाग्रतेने दररोज किमान एक वेळा वाचावा, त्यावर चिंतन करावे म्हणजे तुमचे मन स्वच्छ होईल आणि जोडीदाराविषयीचा तुमच्या मनात झालेला गैरसमज दूर होवून मतभेदही निवळतील याची पूर्ण खात्री असल्याचे प्रा.देवबा शिवाजी पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे.

एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व विशद करताना जिव्हाळा व आपुलकी एकत्र कुटुंबपद्धतीमुळे मिळत असल्याचे ते सांगतात. एकत्र कुटुंबपद्धतीत मुलांवर चांगले संस्कार होतात. त्यामुळे घरात ज्येष्ठांची आवश्यकताही प्रतिपादन केली आहे. चांगल्या नात्यांमुळे आयुष्याला ऊर्जा मिळते. वैवाहिक जीवनातील विसंवाद दूर करण्यासाठी एकमेकांनी एकमेकांना एकमेकांच्या गुणदोषांसह स्वीकारायला हवे. त्याकरीता पतीपत्नीत सुसंवाद साधण्यासाठी उपायही सांगितले आहे. तसेच आपल्या जोडीदाराकडून कामजीवनातील आनंदाचा योग्य रितीने उपभोग घेण्याचा दोन्हींनाही हक्क असतो. त्यामुळे कामजीवनात नैराश्य येणार नाही याची दोघांनीही काळजी घेतली पाहिजे. घरात सतत कटकटी नकोत. घराला घरघर नको. नाहीतर घरातील सुख, समाधान हरवल्याशिवाय राहणार नाही. प्रेम म्हणजे आपुलकी. माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे. रा.ग. गडकरी यांनी सांगितल्यानुसार क्षण एक पुरे प्रेमाचा । वर्षाव पडो मरणाचा ॥ यानुसार पतीपत्नीच्या आयुष्यात तर एकमेकांसाठी स्वतःला विसरून जाणे हाच खरा प्रेमाचा आत्मा आहे. घराचे सौंदर्य हे बाह्य सजावटीपेक्षा घरातील माणसांच्या आचार व विचारांच्या सौंदर्यावर अवलंबून असते. कोणतेही गणित विचारपूर्वक व पायरीपायरीने सोडवले तर उत्तर कधीच चुकत नाही. प्रा. देवबा शिवाजी पाटील लिखीत सुखी संसारासाठी या पुस्तकाची जळगाव येथील प्रा. ए. के. नारखेडे यांनी सुखी संसाराची गीता म्हणून पाठराखण केली असून कृष्णायन प्रकाशन पुणे यांनी सदर पुस्तक प्रकाशित केले आहे. हे पुस्तक म्हणजे नवदांम्पत्यासाठी किंबहुना गृहस्थाश्रमात असणार्‍या प्रत्येकासाठी एक मार्गदर्शक तथा समुपदेशक म्हणून भूमिका बजावणार आहे. त्यामुळे प्रत्येक घरात संग्रही असावा असा हा एक ग्रंथच आहे.

मो.नं.9421523840

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या