Saturday, November 23, 2024
Homeशब्दगंधविदुषी गार्गी-मैत्रेयी

विदुषी गार्गी-मैत्रेयी

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.

प्राचीन काळात पुरुषांप्रमाणे स्त्रियाही ज्ञान प्राप्त करत असत. ज्ञान प्राप्त करून वेद-जप-तप-अध्ययनात सहभागी होत असत. शिक्षणाच्या अधिकारामुळे स्वतःला ब्रह्मपदी म्हणजे विदुषीपदापर्यंत नेण्याचा अधिकार असलेल्या स्त्रियांच्या सामाजिक अधःपतनाला पुढे उत्तर वैदिक काळात सुरुवात झाली. त्यामुळे स्त्रियांच्या विशेषतः मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि स्रियांवर अनेक बंधने घातली जाऊन त्या ज्ञान, शिक्षणापासून दुरावल्या गेल्या.

- Advertisement -

मात्र, पूर्व वैदिक काळात अनेक स्त्रियांनी ज्ञान, शिक्षण या क्षेत्रात देदीप्यमान अशी कामगिरी केली.वेदांतील कित्येक ऋचा स्त्रियांनी रचलेल्या आहेत. यामध्ये लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी, अपाला ही काही नावे आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेणे उत्सुकतावर्धक आणि प्रेरणादायी आहे.

1) गार्गी – गार्गी या नावाने विख्यात असलेली उपनिषद काळातील प्रसिद्ध ब्रह्मवादिनी ज्ञानी, तत्त्वज्ञ आणि वाक्चातुर्य असणारी विदुषी होती.

गर्ग गोत्रातील म्हणून गार्गी आणि ‘वचक्नु’ ऋषींची कन्या म्हणून ‘गार्गी-वाचक्नवी’ अशा संयुक्त नावाने बृहदारण्यकोपनिषदात तिचा उल्लेख आहे.

मध्वभाष्यात तिचा याज्ञवल्क्यांची भार्या म्हणून उल्लेख आहे. आश्वलायनाच्या ब्रह्मयज्ञांग-तर्पणात ‘गार्गी-वाचक्नवी तृप्यतु’ असा उल्लेख येतो.

बृहदारण्यक उपनिषदाच्या सहाव्या आणि आठव्यात विदेहाचा राजा जनक याने आयोजिलेल्या ब्रह्मसभेच्या वर्णनात तिचा उल्लेख आहे. विदेह देशाच्या राजा जनकाने बहुदक्षिण यज्ञ केला व आवाहन केले की, सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञानी ब्राह्मणाने शिंगांना सोने बांधलेल्या एक हजार गाई न्याव्यात. याज्ञवल्क्य ऋषींनी पुढाकार घेतल्यावर अन्य ब्राह्मणांनी त्यांच्याशी शास्त्र चर्चा केली. परंतु याज्ञवल्क्य ऋषींनी त्यांना निरुत्तर केले.

त्यांच्या पांडित्याला घाबरून प्रश्न विचारण्यास कुणीही ज्ञानी पुढे येईना त्यावेळी राजा जनकाने गार्गी हिला त्यांना प्रश्न विचारण्यासाठी पाचारण केले. यावरून गार्गीच्या पांडित्याची कल्पना येते. गार्गी जनकाच्या राजदरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न होती.

आत्म्यावरील काही दर्जेदार प्रश्न तिने याज्ञवल्क्यांना विचारले आणि त्यांना आव्हान दिले. बृहदारण्यकोपनिषदात (3.6, 8) गार्गी-याज्ञवल्क्य संवाद आले आहेत. जनकाच्या यज्ञात जमलेल्या ब्रह्मवाद्यांच्या सभेत तिने अनेक तात्त्विक प्रश्न विचारले. पहिल्याच प्रश्नाची दोन प्रश्नांत निराळी मांडणी करून ते प्रश्न, पराक्रमी पुरुषाने सोडलेले दोन तीक्ष्ण बाणाप्रमाणे असे विचारले की सारी सभा चकित झाली. तिच्या प्रश्नांना याज्ञवल्क्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. तेव्हा ती सभेत उपस्थित विद्वानांना म्हणाली की, याज्ञवल्क्य तत्त्वज्ञानाच्या विषयात अजिंक्य आहेत. त्यांना प्रणाम करून तुम्ही मोकळे व्हा! या तिच्या निर्णयावर याज्ञवल्क्य यांचे ज्ञानीपण सिद्ध झाले. याज्ञवल्क यांना आपला गुरू मानून त्यांची प्रशंसा तिने केली. यातून तिचा वाक्चातुर्य हा गुण प्राकर्षाने दिसून येतो. तिला स्वतःमधील ज्ञानाचा अजिबात गर्व नव्हता. ज्ञानी व्यक्तीने अहंकारी बनू नये. तर ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे त्यास आपला गुरू मानावे, हा आदर्श तिने घालून दिला. हे करताना तिच्या अगाध ज्ञानाची, दुर्दम्य जिज्ञासेची आणि वादविवादाच्या सामर्थ्याची छाप तिने सर्वांवर पाडली. गार्गीचा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील अधिकार सर्वमान्य होता. त्यामुळे राजा जनकाने ब्रह्मयज्ञाच्या परिषदेला तिला सन्मानाने आमंत्रण दिले होते. तिच्या मर्मग्राही प्रश्नांनी आणि विद्वत्तेने सर्व ऋषी दिपून गेले.

समग्र जगताच्या अस्तित्वाच्या उत्पत्तीबद्दल गार्गीने अनेक स्तोत्रे रचली. ‘योग याज्ञवल्क्य’ या योगमार्गावरील ग्रंथात गार्गी आणि याज्ञवल्क्य ऋषी यांचा संवाद आहे. अशी वाक्चातुर्य असलेली गार्गी राष्ट्राची युगप्रवर्तक विचारवंत होती. यातून गार्गी या विदुषीची लोकमान्यता, राजमान्यता, मोठेपणा दिसतो.

2) मैत्रेयी – मैत्रेयी या विदुषीची कथा बृहदारण्यक उपनिषदात आली आहे. मैत्रेयी मित्र ऋषींची कन्या आणि महर्षी याज्ञवल्क्य यांची दुसरी पत्नी होती. मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी होती. मैत्रेयीने पती याज्ञवल्क्यांच्या आध्यात्मिक विकासाला आपल्या ‘ब्रह्मवादिनी’ या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूने हातभार लावला. आध्यात्मिक क्षेत्रातील तिची प्रगल्भता एवढी होती की सांसारिक वैभवाऐवजी आत्मिक ज्ञानाला तिने सर्वस्व मानले.

याज्ञवल्क्य यांनी गृहस्थाश्रम सोडून वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आपल्या दोन्ही पत्नींना समोर बोलावून आपल्या संपत्तीला दोन समान हिश्यात वाटण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. पत्नी कात्यायनीने पतीच्या प्रस्तावाचा स्वीकार केला. परंतु शांत स्वभावाच्या मैत्रेयीला ज्ञान, चिंतन आणि शास्त्रार्थ या गोष्टींमध्ये रुची होती. मैत्रेयीचा विचार होता की धनसंपत्तीने आत्मज्ञान प्राप्त होत नाही म्हणून तिने पतीची संपत्ती नाकारली. पतीबरोबर ज्ञान आणि अमरत्व प्राप्त करण्यासाठी वनामध्ये गेली. पृथ्वीवरील वैभवापेक्षाही अमरत्वाचे ज्ञान मैत्रेयीला अधिक महत्त्वाचे वाटले.

‘बृहदारांनी उपनिषद’मध्ये मैत्रेयीचे पती याज्ञवल्क्य यांच्याबरोबर ‘आत्मा आणि ब्राह्मण’ या विषयावर प्रभावी संवाद आहेत. मैत्रेयीने तत्त्वज्ञानावर सखोल अभ्यास केला. त्याकाळात धर्म आणि शिक्षण या क्षेत्रात मैत्रेयीने विशेष स्थान प्राप्त केले होते. आज स्री शिक्षणाचा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरत आहे. परंतु हजारो वर्षांपूर्वी मैत्रेयीने आपल्या विद्वत्तेने स्रीजातीचा मान वाढवला आणि हे करताना दाखवून दिले की पत्नी धर्माचे पालन करतानाही स्री शिक्षण घेऊ शकते. ज्ञान प्राप्त करू शकते. मैत्रेयीस भारतीय विदुषींचे प्रतीक मानले जाते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या